कृत्रिम पावसाचा मंगळवारी प्रयोग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भाग तसेच मराठवाड्यात पावसाने दिलेली ओढ लक्षात घेऊन या भागात मंगळवारी (ता. २३) कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थांनी दिली.

मुंबई - पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भाग तसेच मराठवाड्यात पावसाने दिलेली ओढ लक्षात घेऊन या भागात मंगळवारी (ता. २३) कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थांनी दिली. सोलापूर, औरंगाबाद आणि बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे एकाचवेळी हा प्रयोग होईल, असे सांगण्यात आले.

शेती, विशेषतः दुष्काळग्रस्त भागात फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यातच यंदाही दुष्काळग्रस्त विदर्भ, मराठवाड्यात प्रतिकूल पावसाचा अंदाज स्कायमेट या खासगी संस्थेने व्यक्त केला आहे.

राज्यात पावसाचे आगमन उशिरा झाले आहे. जुलै महिन्याचा तिसरा आठवडा सुरू झाला, तरी राज्यातील काही भागांत अद्याप पाऊस सुरू झालेला नाही. पावसाने पाठ फिरविल्याने मराठवाड्यातील शेतकरी चिंताग्रस्त आहेत. त्यातच येत्या ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. येत्या हंगामातही दुष्काळी स्थिती कायम राहिली, तर शेतकरी आणि नागरिकांच्या तीव्र असंतोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. याचे पडसाद आगामी निवडणुकीतही उमटू शकतात. पावसाचा खंड लक्षात घेऊन सरकारने या भागात कृत्रिम पावसाचा निर्णय याआधीच घेतला होता. त्यासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर २३ जुलै रोजी सोलापूर, औरंगाबाद आणि शेगाव येथे एकाच वेळी कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाईल. राज्यातील पावसाचा अंदाज येताच राज्य शासनाकडून कृत्रिम पाऊस पाडण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तिन्ही भागांत कृत्रिम पाऊस पाडणाऱ्या कंपन्यांची विमाने आकाशात झेपावून ढगांवर फवारणी करतील. हा पाऊस तलाव क्षेत्रात व्हावा, असा सरकारचा प्रयत्न आहे. तलाव क्षेत्रात पाऊस झाला तर तो फायदेशीर ठरेल, असे सांगण्यात आले.

गेल्या वर्षी राज्यात पावसाचा मोठा खंड पडला. त्यामुळे नोव्हेंबर-डिसेंबरपासूनच दुष्काळाची तीव्रता वाढू लागली. राज्यात १९७२ पेक्षाही गंभीर दुष्काळी स्थिती होती. पिण्यासाठी पाणी आणि जनावरांकरिता चाऱ्याची देखील टंचाई आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Artificial rainfall experiments on Tuesday