बॅंका गजबजल्या; व्यवहार ठप्पच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

ग्रामीण भागातही रांगाच रांगा; बाजार समित्यांत अघोषित बंदच

ग्रामीण भागातही रांगाच रांगा; बाजार समित्यांत अघोषित बंदच
पुणे - केंद्र सरकारने ५०० व १००० रुपये चलनातून बाद केल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून ग्रामीण भागात अभूतपूर्व गोंधळ उडाला आहे. आधीच बॅंक व्यवहाराशी ‘सख्य’ असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झालेलीच दिसून आली. बाजार समित्यांपासून निविष्ठा खरेदी ते मजुरांचे पगार करण्यापर्यंत पैशांची चणचण निर्माण झाली. मोठा व्यवहार असलेल्या शेतकऱ्यांकडे असलेली अधिकची रक्कम बदलण्यासाठीची चिंताही सतावत होती. चलन बदलाच्या प्रक्रियेत जिल्हा बॅंकांचा सहभागाच्या गोंधळावरून अडचणीत भरच पडली. अशातच पीक विमा भरण्याची गुरुवारी (ता. १०) शेवटची मुदत होती, अनेकांना यापासून वंचित राहावे लागले. 

दुसऱ्या दिवशीचे पडसाद...

  • ग्रामीण भागात अपवाद वगळता फारसे व्यवहार झाले नाहीत
  • काही पोस्ट कार्यालयांत दुपारी १२पर्यंत नवीन नोटा उपलब्ध नव्हत्या 
  • महसूल, कृषी, सोसायट्यांतील विभागातील कामकाज मंदावले
  • कोल्हापुरात चलन देवाणघेवाणीच्या प्रश्‍नावरून कांदा, बटाटा सौदे रखडले
  • वऱ्हाडात बाजार समित्यांमधील व्यवहार ठप्प; ‘बंद’चे फलकही लावले
  • जळगाव जिल्ह्यात बॅंकांमध्ये अतिरिक्त काउंटरसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
  • शेतमाल खरेदीच न झाल्याने तरकरी आणि फळउत्पादकांना मोठा फटका
Web Title: bank transaction stop