bhima-river file pic
bhima-river file pic

भीमा नदीचे प्रदूषण चिंताजनक 

कोरेगाव भीमा - मुळा-मुठा नदीपाठोपाठ भीमा नदी व तिच्या उपनद्यांच्या प्रदूषणाची पातळी धोकादायक पद्धतीने वाढत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांसह संबंधित सर्वच घटकांनी आवश्‍यक उपाययोजनांबाबत वेळीच खबरदारी न घेतल्यास मानवी आरोग्याच्या दृष्टीने ही अतिशय चिंतेची बाब ठरणार आहे. 

पुणे जिल्ह्यात झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे पुणे शहर व परिसरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढती लोकसंख्या व उंचावलेल्या राहणीमानामुळे पाण्याची मागणी वाढली असून, एकूण पाणीपुरवठ्याच्या 70 ते 80 टक्के सांडपाण्याचीही निर्मिती होते. नागरीवस्तीतून निर्माण होणारे हे सांडपाणी आणि औद्योगिक सांडपाणी व घनकचऱ्यातून निघणारे लीचेट प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष नदीच्या पाण्यात मिसळते. त्यामुळे भीमा नदीसह उपनद्यांचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. 

पुणे जिल्ह्यात असलेल्या नऊ औद्योगिक वसाहती व नदीकाठी वसलेले अनेक उद्योगधंदे यातून निर्माण होणारे सांडपाणीही प्रक्रिया न करताच प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष नदीत मिसळल्यास प्रदूषणाचा धोका आणखी वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्याकरिता सर्व उद्योगांनी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सयंत्रणा तातडीने बसविल्या पाहिजेत. कोरेगाव भीमा येथे नदीच्या पाण्याच्या तपासणीत हे पाणी प्रक्रिया करूनच वापरण्यास व पिण्यास योग्य राहील. प्रक्रिया सयंत्रणामध्ये निर्जंतुकीकरणाची आवश्‍यक सयंत्रणा बसविणे अत्यावश्‍यक आहे, असा अहवाल दिला होता. 

भीमा नदीचे हे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना आवश्‍यक आहेत; अन्यथा वाढत्या प्रदूषणाबरोबर पाणी शुद्धीकरणासाठी येणारा खर्च व मानवी अनारोग्याचा धोका वाढतच जाणार आहे. यासाठी स्थानिक नागरिक, प्रशासनासह संबंधित सर्वच घटकांचे एकत्रित प्रयत्न आवश्‍यक आहेत. 

या उपाययोजना कराव्यात 
- घरगुती व औद्योगिक वापराचे सांडपाणी प्रक्रिया करून नदीत सोडावे. 
- नागरी घनकचऱ्यामुळे होणारे प्रदूषण वेळीच रोखावे. 
- प्रदूषणाच्या ठिकाणीच नियंत्रण आणावे. 
- मलनिस्सारण प्रक्रियेसाठी गावागावांत सक्षम यंत्रणा उभाराव्यात. 
- प्रदूषण नियंत्रणाची दीर्घकालीन उपाययोजना करावी. 
- गाळ काढणे, यांत्रिक घुसळण करणे, जैविक पुनर्जीवन, प्रत्यक्ष सफाई करणे, यासह विविध उपाययोजना नदीकाठच्या गावांत राबवाव्यात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com