प्रयोगशीलवृत्तीने पीक नियोजनात केला बदल

विकास जाधव
सोमवार, 22 मे 2017

शेतकऱ्यांच्या मुलांच्या अंगात शेती भिनलेली असते. चांगली नोकरी असली तरी त्यांच्यातील शेतीबद्दलची आत्मियता कमी होत नाही. अशापैकी एक आहेत गिरवी (ता. फलटण, जि. सातारा) येथील वडिलोपार्जित शेती संभाळणारे राजेंद्र कदम. खत उत्पादक कंपनीमध्ये वरिष्ठ प्रबंधक म्हणून कार्यरत असलेले राजेंद्र कदम पीक बदलातून शेती शाश्वत करीत आहेत. 

शेतकऱ्यांच्या मुलांच्या अंगात शेती भिनलेली असते. चांगली नोकरी असली तरी त्यांच्यातील शेतीबद्दलची आत्मियता कमी होत नाही. अशापैकी एक आहेत गिरवी (ता. फलटण, जि. सातारा) येथील वडिलोपार्जित शेती संभाळणारे राजेंद्र कदम. खत उत्पादक कंपनीमध्ये वरिष्ठ प्रबंधक म्हणून कार्यरत असलेले राजेंद्र कदम पीक बदलातून शेती शाश्वत करीत आहेत. 

सातारा जिल्ह्यातील फलटण हा तसा दुष्काळी तालुका. मात्र या तालुक्यातील पूर्वेच्या भागात अलीकडे पाणी उपलब्ध झाल्याने शेती बागायती झाली. याच परिसरातील गिरवी गाव शिवारातील शेतकरी पाण्याच्या उपलब्धतेमुळे ऊस, मका, भाजीपाला आणि फळबागेकडे वळले. या गावात राजेंद्र सदाशिव कदम यांची वडिलोपार्जित शेती आहे. कदम सध्या आरसीएफ कंपनीत वरिष्ठ प्रंबधक म्हणून कोल्हापूर येथे कार्यरत आहेत. राजेंद्र यांचे बंधू सुहास हे पुण्यामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. राजेंद्र कदम यांना पहिल्यापासून शेतीची आवड होती. यामुळे नोकरीच्या व्यस्ततेतून त्यांनी शेतीनियोजनावर कायम लक्ष ठेवले. नोकरीच्या ठिकाणात बदल झाला तरी कधी आठ दिवसांतून तर कधी पंधरा दिवसांतून कदम शेतीला भेट देतात. 

शेतीनियोजनाला केली सुरवात  

शेतीच्या नियोजनाबाबत राजेंद्र कदम म्हणाले की, माझे वडील सदाशिव कदम हे व्यवसायानिमित्त पुण्यामध्ये स्थायिक झाले होते. मात्र सन १९७८ मध्ये कुटुंबाच्या विभाजनानंतर वडील गावी परतले. वडिलांना विभाजनानंतर सोळा एकर शेती व दोन विहिरीत पाण्याचा वाटा मिळाला. कमी पाण्याच्या उपलब्धतेनुसार आठ एकर क्षेत्रावर पीक लागवडीचे नियोजन असते. त्याकाळी वडिलांचा डाळिंब, ऊस, मका या पिकांच्या लागवडीवर भर होता. सन २००७ मध्ये वडिलांचे निधन झाल्यावर सर्व शेतीची जबाबदारी माझ्यावर आली. वडिलांच्या काळापासून शिवाजी बोडरे यांचे कुटुंब शेती वाट्याने करत होते. मीदेखील बोडरे यांना शेती खर्च आणि उत्पादनातील निम्मा वाटा देत शेती सुरू ठेवली. कंपनीच्या कामाच्या निमित्ताने अनेक प्रगतिशील शेतकरी संपर्कात येत होते. या शेतकऱ्यांच्याकडून सुधारित पीक पद्धतीची माहिती जमा करत गेलो. यातून मी माझ्या शेतीमध्ये बदल करू लागलो.
वडिलांच्या निधनानंतर डाळिंब बाग काढली होती. त्यामुळे पुन्हा एकदा डाळिंब लागवड करण्याचा विचार मनात सुरू होता. २०१० मध्ये मी हलक्या एक एकर क्षेत्रावर १२ बाय १२ फूट अंतरावर झिगझॅग पद्धतीने डाळिंबाच्या मृदुला जातीच्या रोपांची लागवड केली. प्रयोगशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन आणि योग्य नियोजनातून डाळिंबाची चांगली बाग तयार केली. पहिला बहर २०१२ मध्ये घेतला. यातून चार टन उत्पादन मिळाले. पहिल्या बहारापासून सुमारे दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. मात्र या दरम्यान दुष्काळी परिस्थितीमुळे विहिरीतील पाणी कमी झाले. पाणी पुरत नसल्याने नाईलाजास्तव डाळिंब बाग काढून टाकावी लागली. त्यामुळे दुष्काळी वर्षात बाजरी, मका लागवडीभर देत शेती सुरू ठेवली. त्यानंतर मात्र गेल्या तीन वर्षात पाण्याची उपलब्धता वाढेल तशी बागायत शेती वाढवली. 

ऊस, मका लागवडीवर भर
पीक बदलाबाबत माहिती देताना राजेंद्र कदम म्हणाले की, डाळिंबाची बाग काढल्यानंतर  मी पाण्याच्या उपलब्धतेनुसार ऊस, मका पिकांच्या लागवडीभर भर दिला. दरम्यानच्या काळात उसाला समाधानकारक दर मिळू लागल्याने ऊस लागवड क्षेत्रात वाढ केली. सध्या ७० गुंठे क्षेत्रात को- ८६०३२ जातीचा खोडवा आणि ७० गुंठे क्षेत्रात को -८६०३२ ची लागवड आहे. साडेचार फुटांची सरी सोडून लागवड केली. लागवडीपूर्वी बेणे प्रक्रिया केली जाते. माती परीक्षणानुसारच खतमात्रा दिली जाते. त्यामुळे खर्चात बचत होते. दर दोन वर्षांनी बेणे बदल करतो. त्यामुळे ऊस उत्पादनात वाढीत सातत्य आहे. जमिनीची सुपिकता टिकवून ठेवण्यासाठी शेणखत, लेंडीखत जमिनीत मिसळून दिले जाते. यंदाच्या वर्षीपासून पाचट आच्छादनावर भर दिलेला आहे. मला ऊस लागवडीचे एकरी ४५ टन तर खोडव्याचे ४० टन उत्पादन मिळते. उत्पादन इतरच्या तुलनेत कमी असले तरी नोकरी सांभाळू कमी व्यवस्थापनात ऊस उत्पादनवाढीचा प्रयत्न ठेवला आहे. 
फलटण तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय असल्याने चाऱ्यांची मागणी असते. यामुळे तीनही हंगामात टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या क्षेत्रात एक एकरावर मक्याची लागवड करतो. मक्यापासून धान्य किंवा चाऱ्याचे उत्पादन मिळते. मला एकरी मक्याचे तीस क्विंटल उत्पादन मिळते. फलटण बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना मक्याची विक्री केली जाते. चारा वाटेकऱ्यास दिला जातो. मला मक्यातून एकरी वीस हजाराचा नफा मिळतो. भांडवल असूनही दररोज शेतीमध्ये वेळ देता येणे शक्य नसल्यामुळे बोडरे यांना पीक लागवड, व्यवस्थापन खर्च आणि उत्पादनातील निम्मा वाटा दिला जातो. पीक लागवड आणि व्यवस्थापनासाठी लागणारी जमीन आणि पाणी उपलब्धता माझी अाहे. 

व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी 
प्रत्येक क्षेत्रानुसार पीक नियोजन, जमा-खर्चासाठी क्षेत्रनिहाय डायरी.
प्रयोगशील शेतकऱ्यांच्या चर्चेतून पीक व्यवस्थापनात बदल.
जमीन सुपिकतेवर भर, माती परीक्षणानुसार खतांचा वापर.
बाजारपेठेच्या मागणीनुसार पीक लागवडीचे नियोजन.
ऊस बेणे बदल, इतर पिकांच्या सुधारित, संकरीत जातींची निवड.
पाणी आणि रासायनिक खतांचा काटेकोर वापर.

प्रत्येक क्षेत्राची ठेवली नोंद  
राजेंद्र कदम यांची एकूण सोळा एकर शेती आहे. यामध्ये आठ एकर क्षेत्र हे दोन विहिरींवर बागायती केले आहे. विहीर सामाईक असल्याने प्रत्येकाच्या क्षेत्रानुसार पाण्याचे वाटे ठरलेले असल्यामुळे सप्ताहातील ठराविक दिवस पाणी मिळते. यामुळे ठिबक सिंचन न करता सध्या पाटपाणी द्यावे लागते. अजून आठ एकर जिरायती क्षेत्र आहे. हे क्षेत्र बागायती करण्यासाठी कदम यांनी शेततळ्याचे नियोजन केले आहे. नव्याने एक एकर डाळिंबाची लागवड ते करणार आहे. नोकरीच्या निमित्ताने कदम यांना दररोज शेतीकडे लक्ष देता येत नाही. या दरम्यान कामाचे नियोजन तसेच अर्थिक व्यवहार आई पाहाते. हिशेबासाठी प्रत्येक क्षेत्रानुसार डायरी केलेली आहे. या डायरीमध्ये वर्षभराचा खर्च आणि नफ्याची नोंद केली जाते. त्यामुळे वर्षभरात प्रत्येक पिकाला किती खर्च झाला आणि किती नफा झाला हे कळते. त्यानुसार पुढील वर्षी पीक नियोजनात बदल करणे सोपे जाते. 

राजेंद्र कदम, ९७६३४५८२७६.

Web Title: Changes made in experimental crop planning