चिखलीकरांनी जपली मिरचीसह विविध पिकांत प्रयोगशीलता

विनोद इंगोले 
रविवार, 21 मे 2017

पूरक व्यवसायाचाही शेतीला आधार 
चिखली (ता. जि. भंडारा) हे गाव मिरचीसाठी प्रसिद्ध आहे. त्यांना मिरचीचे मार्केटही गावात आहे. या पिकाबरोबरच मुख्य व पारंपरिक धान (भात) पिकात सेंद्रिय शेतीचे प्रयोग शेतकऱ्यांनी सुरू केले आहेत. जोडीला पूरक दुग्ध व्यवसायातही आघाडी घेतली आहे. त्यातून गावातील शेतीचे अर्थकारण समृद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. 

भंडारा जिल्ह्यातील चिखली गाव हे मिरची पिकासाठी प्रसिद्ध आहे. गावची लोकसंख्या सुमारे १२०० पर्यंत आहे. गावात सुमारे ९० ते १०० एकरांपर्यंत त्याचे क्षेत्र असते. हे क्षेत्र मागे-पुढे होते. शेतकरी जून-जुलैच्या दरम्यान बियाणे टाकतात. साधारण आॅगस्टच्या दरम्यान रोपांची लागवड होते. पुढे हे पीक अधिक कालावधीसाठी चालत राहते. मिरची घेण्याचा फायदा गावातील शेतकरी तानाजी गायधने यांनी असा सांगितला की, आम्हाला मार्केट बांधावर मिळते. मिरची व्यवहारासाठी मौदा (जि. नागपूर) येथील बाजारही प्रसिद्ध आहे. या बाजारात दिल्लीच्या व्यापाऱ्यांची रेचलेल राहते. गावातूनच वजन करून स्थानिक व्यापाऱ्यांपर्यंत माल पोचविला जातो. त्याकरिता गावात दररोज सायंकाळी वजन काटे लावले जातात. गावातून एकत्रितपणे मिरची बाजारात नेली जात असल्याने वाहतुकीवरील खर्चाचा बोजा कमी होतो. व्यापाऱ्यांचे मध्यस्थही गावात येऊन खरेदी करतात. केवळ हमालीचाच काय तो खर्च होतो. वाहतुकीचा खर्च वाचतो. 

लाल मिरचीचाही फायदा 
मिरचीचे सरासरी उत्पादन दहा क्‍विंटलपर्यंत असल्याचे गावातील शेतकरी खेमराज वाघमारे यांनी सांगितले. गायधने म्हणाले की, काही वेळा हिरव्या मिरचीला अपेक्षित दर मिळत नाही. अशावेळी लाल मिरची विक्रीचा निर्णय घेतला जातो. हिरव्या मिरचीला किलोस १० रुपयांपासून ते २५ रुपयांपर्यंत दर मिळतो. तर लाल मिरचीस हाच दर ६० ते ७० रुपये तर काही वेळा तो १०० रुपयांपर्यंत मिळतो. शहापूर व कळमना (नागपूर) येथे लाल मिरचीला चांगले मार्केट आहे. तेथे मध्य प्रदेशातील व्यापारी येऊन खरेदी करतात. अनेक वर्षांपासून गावातील शेतकऱ्यांचे मिरची घेण्यावर सातत्य अाहे. सुरवातीला लांब आकाराची मिरची घेतली जायची. आता मार्केटच्या मागणीनुसार त्यात बदल केला आहे. मिरचीतून एकरी २० हजारांपासून ते ४० हजार रुपये व त्यापुढेही नफा मिळतो. सर्व अर्थकारण आवक, मालाची टंचाई व हवामान यावर अवलंबून असते. 

पेंच प्रकल्पातील पाण्याचा उपयोग 
पेंच प्रकल्पाचे पाणी शेती बागायती करण्यासाठी वापरले जाते. गावशिवारात असलेल्या कालव्यातील पाणी उपसा करीत ते पिकांना दिले जाते. खेमराज यांची स्वतःची तीन एकर शेती असून या संपूर्ण क्षेत्रावर ते मिरचीच घेतात. काही शेतकरी आता ठिबककडे वळले आहेत. 

दुग्ध व्यवसायात पुढारलेपण 
चिखलीच्या शेतकऱ्यांनी पूरक दुग्ध व्यवसायातही चांगले लक्ष घातले आहे. गावातील अनेकांच्या घरी एक ते दोन दुधाळ जनावरे आहेत. गावात सुमारे २०० ते २५० लिटरपर्यंत दूध संकलन होते. त्यामुळेच एका खासगी कंपनीचे दूध संकलन केंद्र सुरू झाले आहे. महिन्याकाठी लागणाऱ्या पैशांची सोय या व्यवसायातून होते. 

धानाची सेंद्रिय शेती 
भात (धान) हे चिखलीकरांचे मुख्य पीक. मात्र रासायनिक खतांचा वापर या पिकात अलीकडील काळात वाढला होता. त्यामुळे मागील वर्षापासून सुमारे ५० एकरांवर सेंद्रिय शेतीचा प्रकल्प ‘आत्मा’ यंत्रणेच्या सहकार्याने राबविला जात आहे. यात ५० शेतकऱ्यांचा समावेश आहे. गावातील आदर्श शेतकरी गटाच्या माध्यमातून ही सेंद्रिय चळवळ सुरू झाली आहे. तानाजी गोपाळ गायधने समूहाचे अध्यक्ष आहेत. 
रासायनिक पद्धतीत एकरी २० ते २२ क्विंटल उत्पादन येथील भात उत्पादक घेतात. सेंद्रिय पद्धतीत उत्पादन फार वाढलेले दिसले नसले तरी निविष्ठा खर्चात सुमारे ४० ते ५० टक्के बचत झाल्याचे गायधने म्हणाले. सेंद्रिय शेतीसाठी व्हर्मी कंपोस्ट युनिट, एस-९ कल्चर, अझोला युनिट आदी साहित्य ‘आत्मा’ यंत्रणेकडून पुरविण्यात आले. 

जवस लागवड 
कृषी विभागाच्या माध्यमातून गेल्या वर्षी २५ एकरांवर पीकेव्ही एनएन-२६० या जवस वाणाच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यात आले. त्याच्या खरेदीचा करारदेखील पाच हजार रुपये प्रति क्‍विंटल या दराप्रमाणे पुण्यातील एका व्यवसायिकाशी करण्यात आला. आत्माचे प्रकल्प संचालक प्रज्ञा गोळघाटे (भगत), तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे यांच्यासह तालुका कृषी अधिकारी श्री. पात्रीकर यांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळते. 

भात उत्पादनासोबतच पिकांची विविधता 
गावशिवारात सरासरी ४०० एकरांवर धानाची (भात) लागवड होते. त्याचबरोबर वांग्याचे पीकदेखील घेतले जाते. विक्री साकोली, लाखनी, भंडारा आणि नागपूर येथे केली जाते. 

सलग तुरीचा प्रयोग 
विविध प्रयोग करण्याची चिखलीतील शेतकऱ्यांची सवय आहे. गायधने व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी मागील वर्षी सलग तूर घेण्याचा प्रयोग केला. यापूर्वी हे पीक गावात शेतीच्या बांध्यापुरते मर्यादित होते. या प्रयोगात एकूण क्षेत्र १५ ते १७ एकर होते. एकरी उत्पादन सुमारे ७ ते ९ क्विंटलपर्यंत आले. मात्र दर काही समाधानकारक मिळाला नसल्याचे गायधने यांनी सांगितले. 

माझ्याकडे बारा एकर शेती असून मिरची, वांगी, धान या पिकांची लागवड करतो. पूर्वी रासायनिक शेतीवर भर होता. आता सेंद्रिय शेती कसण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या माध्यमातून बऱ्याच अंशी उत्पादन खर्च कमी होऊ लागला आहे. 
- सौ. नीलाबाई गणपत मेहेर 

आमच्या कुटुंबीयांद्वारे गेल्या सात वर्षांपासून मिरची लागवड होते. बाजारपेठ उपलब्ध असल्याने या पिकाच्या लागवडीत सातत्य ठेवले आहे. धानापासून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने पर्यायी पिके घेण्यावर भर दिला आहे.' 
अशोक आखरे 

तंटामुक्‍त आणि व्यसनमुक्त गाव 
शेतीमध्ये प्रयोगशीलता जपत शेतीक्षेत्रात गावाला पुढारलेपणा प्राप्त करून देणाऱ्या चिखली गावाने ग्रामविकासातील पूरक उपक्रमांच्या अंमलबजावणीतही आघाडी घेतली आहे. तंटामुक्‍तीसाठी २००४-०५ या वर्षात गावाला दोन लाख रुपयांचा तालुकास्तरीय पुरस्कार मिळाला होता. व्यसनमुक्‍त गाव म्हणूनही गावाने परिसरात लौकीक प्राप्त केला आहे. ग्रामपंचायतीने व्यसनमुक्‍त गावाचा ठराव घेतला. सामूहिक प्रयत्नांना अल्पावधीतच यश आले. गावातील काही घरांवर तर दारू पिऊन येऊ नये अशा पाट्याच लावण्यात आल्या आहेत. परमात्मा संस्था, त्यासोबतच गायत्री परिवार व वर्षाकाठी गावात होणारा भागवत सप्ताह या माध्यमातूनही व्यसनमुक्‍तीसाठी प्रबोधन करण्यात आले. 

स्वच्छतेचा आदर्श 
राज्य शासनाचा स्वच्छता अभियान, निर्मल ग्राम पुरस्कार यांनी गावाला गौरविण्यात आले आहे. संपूर्ण गावात सिमेंट रस्ते आहेत. गावालगत असलेला नाला, उपनलिका येथून पाणी उपसा करून तो मुख्य टाकीपर्यंत पोचविला जातो. सकाळ-संध्याकाळ अशा दोन वेळा गावाला पाणीपुरवठा होतो. गावात प्रवेश करताच ग्रामस्थांनी सामूहिक प्रयत्नातून फुलविलेली बाग नजरेस पडते. 

खेमराज वाघमारे - ९९२३५०३३६५. 
तंटामुक्‍त समिती अध्यक्ष 

तानाजी गायधने - ८००७२८५३०५. 
अध्यक्ष, आदर्श शेतकरी समूह 
 

Web Title: chikhli agro chili farming