व्यवसायवृद्धीसाठी गरज सामूहिक प्रयत्नांची

व्यवसायवृद्धीसाठी गरज सामूहिक प्रयत्नांची

सध्या जगात सुमारे ५ कोटी मधमाश्यांच्या वसाहती पाळल्या जात आहेत. अमेरिकेत ५० लाख वसाहतींपैकी ३० लाख वसाहती केवळ परागी भवनासाठी वापरल्या जातात. 

या सेवेसाठी मधमाशीपालकांना बागायतदारांकडून एका वसाहतीसाठी एका महिन्याला १०० ते १५० डॉलर भाडे मिळते. भारतीय बाजारपेठेत याचे मूल्य सुमारे (६४ प्रति डॉलर) ६४०० ते ९६०० रुपये प्रतिवसाहत प्रतिमहिना होते. या उद्योगात चीन आघाडीवर असून, चीनमध्ये सुमारे एक कोटी वसाहती आहेत. 

इस्राईलसारख्या सरासरी ७ इंच पाऊस पडणाऱ्या वाळवंटी देशात ८५ हजार मधमाश्यांच्या वसाहती असून, त्या सर्व केवळ परागसिंचनासाठी वापरल्या जातात.

भारतीय कृषी संशोधन परिषदेतील कृषी शास्त्रज्ञांच्या अहवालानुसार पराग सिंचनासाठी मधमाश्यांवर अवलंबून असणाऱ्या अशा १२ महत्त्वाच्या पिकांमध्ये परागसिंचन करण्यासाठी ६० लाख मधमाश्यांच्या वसाहतींची गरज असते. प्रत्यक्षात भारतात १२ लाख वसाहती आहेत आणि यापैकी सुमारे ९० टक्के वसाहती या मध्य भारतापासून वरील राज्यांत जास्त प्रमाणात आहेत. त्यातही उत्तरेकडील राज्यांत मधमाश्यांच्या वसाहतींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. 

महाराष्ट्राचा विचार केला तर मधमाश्यांच्या सुमारे ६ लाख पाळीव पेट्यांची गरज आहे. प्रत्यक्षात मात्र बोटावर मोजता येतील इतक्याच मधमाश्यांच्या वसाहती आज महाराष्ट्रात उपलब्ध आहेत. 

शासकीय विविध विभागांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार आज महाराष्ट्रात उपलब्ध असणाऱ्या मधमाश्यांच्या वसाहतींची संख्या ही १० हजार आहे.

मधमाश्यांमुळे परागीभवन होऊन उत्पादनात वाढ होणारी पिके
तेलबिया - करडई, तीळ, सोयाबीन, जवस, मोहरी, सूर्यफूल 
कडधान्ये - तूर, मूग, उडीद, मटकी 
भाज्या - वांगी, काकडी, भोपळा, कारली, तोंडली, पडवळ, कोबी, मुळा, गाजर, कांदा 
फळपिके - संत्री, मोसंबी, लिंबू, पेरू, कलिंगड, डाळिंब
चारापिके - लसूणघास, बरसीम 
तंतुमय पिके - कापूस 

सामूहिक प्रयत्नांची अावश्यकता
कोरडवाहू क्षेत्रात अाणि फळबाग क्षेत्रावर मधमाश्यांची संख्या वाढविण्याची अावश्यकता अाहे, त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज अाहे. 
सुमारे १ लाख अल्पभूधारक शेतकरी, भूमिहीन, शेतमजूर, आदिवासी इ. दुर्बल घटकांमध्ये मधमाश्यांपालनाबाबत जनजागृती करणे. व्यवसायाचे प्रशिक्षण आणि शासकीय योजनांतून किंवा बँकेच्या साह्याने अर्थसाह्य करून मदत करणे.
सुशिक्षित तरुण बेरोजगारांना मध, मेण आणि इतर पदार्थांचे संकलन, त्यावरील प्रक्रिया आणि मूल्यवर्धित पदार्थांची निर्मितीबद्दल माहिती देणे किंवा मदत करणे.
परागीभवनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करणे. 
जागृत शेतकऱ्यांना परागीभवनासाठी मधमाश्यांच्या पेट्या सशुल्क किंवा मोफत अर्थात मधपाळ आणि शेतकरी या दोघांच्या आर्थिक फायद्यानुसार उपलब्ध करून देणे. या उपक्रमासाठी महाराष्ट्रात अनेक सामाजिक संस्था कार्यरत अाहेत. यामध्ये मधमाशीपालन क्षेत्रातील नामवंत शास्त्रज्ञ, मधमाशीपालनाचे अभ्यासक, मधमाशीपालनासाठी साह्य करणाऱ्या विविध सामाजिक संस्था, महाराष्ट्र बी डेव्हलपमेंट फोरमची स्थापना झाली 
अाहे. 

मध आणि मेणापेक्षा परागीभवन महत्त्वाचे
गहू, ज्वारी, बाजरी, भात इत्यादी तृणधान्ये स्वपराग फलित किंवा वाऱ्यामार्फत फलित होतात. ही पिके पराग सिंचनासाठी कीटकांवर अवलंबून नसतात. मात्र ज्वारी, बाजरी, मका या पिकांमध्ये परागीभवनासाठी मधमाश्यांच्या पेट्या ठेवल्यास उत्पादनात वाढ दिसून आली आहे. 

गळीत धान्ये, कडधान्ये, तंतुमय पिके, मसाल्याची पिके, फळपिके ही परागीभवनासाठी मधमाश्यांसारख्या कीटकांवर अवलंबून असतात. या पिकांच्या लागवडीसाठी उत्तम बियाणे, खते, पाणी अाणि पीक संरक्षणावर मोठा खर्च झालेला असतो. ही पिके फुलोऱ्यात अाल्यावर मधमाश्यांसारखी उपयुक्त कीटक पुरेशा संख्येने उपलब्ध नसतील तर काही फुले अफलित राहतात, त्यामुळे वापरलेल्या निविष्ठा वाया जातात अाणि अपेक्षित उत्पादन मिळत नाही अाणि नुकसान होते. 

अमेरिकेतील कृषी शास्त्रज्ञांनी दिलेल्या अहवालाप्रमाणे मधमाश्यांनी परागीभवन केल्यामुळे मिळालेल्या उत्पादनाचे मूल्य हे मधमाश्यांनी तयार केलेल्या मध आणि मेणाच्या मूल्यापेक्षा १५ ते २० पट अधिक असते.

महाराष्ट्रात सह्याद्रीच्या पर्वत रांगांतून सदापर्णी, निमसदापर्णी आणि गडचिरोली, चंद्रपूर येथील दमट पानझडीची वने ही भारतीय सातेरी मधमाश्यांची कायमची वस्तीस्थाने आहेत. ही ठिकाणे मधमाश्यांच्या वसाहतींचा कायमचा स्रोत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com