कुकर, पॉलिशिंग यंत्रसेवेतून साधली व्यावसायिक संधी 

agrowon
agrowon

युवा हळद उत्पादकाने शोधले पूरक उत्पन्न 

सातारा जिल्ह्यात सर्वाधिक हळद वाई तालुक्यात केली जाते. येथे सांगलीनंतर वाई बाजार समितीत खरेदीचे व्यवहार होतात. तालुक्यातील निकमवाडी हे छोटेसे गाव. या गावातही मोठ्या प्रमाणात हळद पीक घेतले जाते. येथील राजेश धनंजय निकम हा तरुण शेतकरी. कुटुंबाची एकूण पाच एकर शेती. 

त्यात दीड एकर हळद व बाकी ऊस, फूलशेती व भाजीपाला असतो. तीन भावांचे हे कुटुंब आहे. व्यवसायांच्या निमित्ताने थोरले भाऊ प्रमोद व लहान बंधू प्रशांत पुण्यात असतात. राजेश कला शाखेचे पदवीधर आहेत. सन २००३ मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वडिलांच्या बरोबरीने त्यांनी शेती करण्यास सुरवात केली. घरी अनेक वर्षांपासून हळद हे पीक घेतले जात होते. त्यामुळे लहानपणापासूनच राजेश यांनाही या शेतीतील माहिती होती. 

काळाची गरज अोळखली 
हळदशेतीतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तिचे काढणीपश्चात हाताळणीचे काम. हळदीला दर चांगला हवा असेल तर ती शिजवावी लागते. पॉलिशिंग करावे लागते. पूर्वी हळद जुन्या पद्धतीने काहिलीच्या साह्याने शिजवली जायची. या पद्धतीत काढणीनंतर हळद काहिली असेल त्या ठिकाणी घेऊन जावी लागे. ती शिजवण्यासाठी जळाऊ इंधन (लाकूड) घेऊन जावे लागे. एकसमान न शिजता कमी- जास्त शिजली जायची. साहजिकच तिच्या गुणवत्तेवर परिणाम व्हायचा. सुमारे १२ तासांत अवधीत पाच ते सात क्विंटल हळदच शिजली जायची. यात वेळ, श्रम, मनुष्यबळ वाया जात होते. मात्र पर्याय नसल्याने हीच पद्धत वापरावी लागे. दरम्यान २०१४ तालुक्यातीलच कवठे येथे हळद शिजवण्याचा कुकर व पॅालिश ड्रम यांची माहिती मिळाली. यांत्रिकीकरण केले तर सर्वच बाबींमध्ये बचत होणार होती. राजेश यांनी त्याठिकाणी जाऊन त्याची माहिती घेतली. 

यंत्रांची खरेदी 
पूर्ण विचारांती २०१५ मध्ये कुकर दोन लाख रुपये तर पॅालिश ड्रम दीड लाख याप्रमाणे एकूण साडेतीन लाख रुपयांचा खर्च करून यंत्रे घरी आली. घरचा टॅक्ट्रर असल्याने त्यासाठी टॅक्ट्रर घ्यावा लागला नाही. दोन्ही यंत्रे चालवण्यासाठी सर्व प्राथमिक माहिती घेत कामास प्रारंभ केला. 

व्यवसायाचे स्वरूप 
स्वतःच्या शेतीतील हळद या पद्धतीने पॉलिश होऊन तिचा दर्जाही चांगला मिळू लागला. अन्य शेतकऱ्यांचीही देखील हीच गरज होती. त्यामुळे या संधीचे रूपांतर राजेश यांनी व्यवसायात करायचे ठरवले. त्यानुसार सेवाही देण्यास सुरवात केली. योग्य दर, खात्रीशीर, तत्पर सेवा या गुणांमुळे राजेश यांचे शेतकरी ग्राहकही वाढण्यास मदत झाली. 

राजेश यांचा व्यवसाय दृष्टिक्षेपात 
- परिसरातील ७ ते ८ गावांमधून ५० ते ७० शेतकरी राजेश यांच्याकडून हळद शिजवून पॅालिश करून घेतात. 
- गेल्यावर्षी ६०० क्विंटल हळदीवर ही प्रक्रिया झाली. प्रति कुकरला ३०० रुपये सुमारे एक लाख ८० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. पॅालिशींगद्वारे चांगले उत्पन्न मिळाले. यंदा आतापर्यत ३०० क्विंटल हळद शिजवली असून अूजन हंगाम शिल्लक असल्याने गेल्यावर्षी एवढी हळद शिजवली जाईल. 

अशी दिली जाते सेवा 
- ट्रॅक्टरद्वारे राजेश शेतकऱ्यांकडे यंत्रे घेऊन जातात. कुकरमध्ये हळद शिजवल्यानंतर सुमारे १८ दिवस ती सुकवावी लागते. त्यानंतर पॉलिशिंग केले जाते. 

अर्थशास्त्र 
कुकरला दोन ड्रम असतात. यातील एका ड्रमसाठी ३०० रुपये असे दोन ड्रम्ससाठी ६०० रुपये दर शिजवण्याचा घेतला जातो. यातील ३०० रुपये राजेश यांना तर ३०० रुपये मजुरीसाठी जातात. तसेच पॅालिशड्रम मध्ये एकावेळी सुमारे १० क्विंटल माल बसतो. काडीकचरा वगळून, निवडून पाऊण तासात सुमारे सहा ते सात क्विंटल पॉलिश हळद तयार होते. एक ड्रममध्ये दहा क्विंटल माल बसतो. त्यानुसार पॉलिशिंग कामानंतर प्रति ड्रम राजेश यांना पाचशे ते सहाशे रुपये मिळतात. इंधन तसेच अन्य खर्च दोनशे रुपये जाऊन चारशे रुपये शिल्लक राहतात. 

कुकरमध्ये सुमारे ५०० किलो शिजवण्यासाठीचा कच्चा माल बसतो. शिजवणे, पॉलिशिंग यानंतर १०० किलो पॉलिश्ड हळद तयार होते. पूर्वी रात्रभर शिजवण्याचे करावे लागणारे काम आता काही तासांवर आले आहे. पॉलिश केलेल्या हळदीला आकार, प्रतवारी यानुसार पॉलिश न केलेल्या हळदीपेक्षा क्विंटलला ३००० रुपयांचा जादा दर मिळतो. माझ्याकडे सेलम वाण असून एकरी ३० क्विंटलपर्यंत उत्पादन मी घेतो. राजेश निकम 

कुकरचे फायदे 
- हळद एकसारखी शिजते, खराब होत नाही. साहजिकच दर्जा चांगला मिळतो. 
- वेळ, इंधनाची मोठी बचत होत असते. हळदीच्या पाल्याचे इंधन असल्याने अन्य जळण वापरण्याची गरज भासत नाही. 
- जुन्या पद्धतीने हळद शिजवण्यासाठी मजूर जास्त लागायचे. त्या तुलनेत यंत्राद्वारे शिजवल्याने 
मजूरबळ कमी लागते. त्यावरील खर्च कमी होतो. 
- जुन्या पद्धतीत शेतकऱ्यांना हळद घेऊन जाऊन शिजवावी लागे. आता यंत्रेच त्यांच्या बांधापर्यंत येतात. त्यामुळे वाहतूक खर्चात बचत होते. 

पॅालिशड्रमचे फायदे 
- शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर सेवा मिळते. 
- पूर्वी ड्रमसारख्या अवजाराद्वारे मजुरांच्या सहाय्याने हाताने हॅंडल मारून पाॅलिश व्हायचे. आता 
ट्रॅक्टरची ऊर्जा वापरून हे काम होते. यातून मजुरीखर्चात व वेळेत बचत होते. कमी कालावधीत जास्त हळद पॅालिश होते. 
- पॅालिशिंग सुरू असताना अन्य कामे करता येतात. जुन्या पद्धतीत ते शक्य होत नाही. 

मदत व मार्गदर्शन 
राजेश यांचा वडिलांचे मार्गदर्शन व बंधूंची मदत होते. उपविभागीय कृषी अधिकारी विजय माईनकर, तालुका कृषी अधिकारी रवींद्र कांबळे, शशीकांत घाडगे, एल.एस. धायगुडे, दिलीप चव्हाण, अमोल चव्हाण यांचे व्यवसायासाठी मार्गदर्शन मिळाले आहे. यंत्रांच्या अनुदानासाठी प्रस्ताव दिला आहे. 

राजेश निकम - ९८५००९८७७४ 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com