विदर्भात यशस्वी खजूरशेती

विदर्भात यशस्वी खजूरशेती

नागपूर येथे स्थायिक झालेले सावी थंगावेल यांनी दहा वर्षांपूर्वी धाडसाने खजूर लागवडीचा प्रयोग केला.  एकरी सुमारे ६० झाडे असलेल्या या बागेतून प्रति झाड १२५ ते १५० किलोपर्यंत फळ घेण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. विशेष म्हणजे, या खजुराला बाजारपेठ मिळविण्यातही ते यशस्वी झाले आहेत. इस्राईल किंवा अरबी देशांतील हे मुख्य पीक विदर्भातील जमिनीत रुजवून महाराष्ट्रासाठी नव्या पिकासाठी दिशा तयार केली आहे. 

मूळचे तमिळनाडू येथील सावी थंगावेल विदर्भात म्हणजे नागपुरात नोकरीच्या निमित्ताने आले.  येथे त्यांनी रुग्णालय व्यवस्थापकाची नोकरी पत्करली. सेवानिवृत्तीनंतर नागपुरातच स्थायिक होण्याचा व शेतीतच रमण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यांनी ४० एकर शेती खरेदी केली होती. मिहान प्रकल्पात ती गेली. धीर न सोडता नागपूरपासून ३० एकरांवर मोहगाव झिल्पी परिसरात पाच एकर शेती नव्याने खरेदी केली. मुलगा स्वरनची मदत घेत सावी आपली शेती कसतात.  

खजुराचा प्रयोग 
सावी यांनी शेतीत नवे काही करण्याचे ठरविताना चक्क इस्राईल, अरब देशांचे मुख्य पीक असलेल्या खजुराची निवड केली. ही गोष्ट सुमारे १० वर्षांपूर्वीची. गुजरात, राजस्थान, तमिळनाडू भागात खजुराचे उत्पादन होते. गुजरातमधील काही शेतकऱ्यांच्या शेतीला भेटी दिल्या. पिकाचे अर्थकारण अभ्यासत दोन एकरांत खजूर लावण्याचे धाडस केले. आज दोन एकरांव्यतिरिक्त १० एकरांत खजुराची नवी बागही त्यांच्याकडे फुलते आहे. 

पाणी व्यवस्थापन
सावी यांनी ठिबक सिंचन केले आहे. हंगामानुसार आठवड्यातून एकदा ते दोनदा पाण्याची गरज भासते. मात्र, एकूण गरज अत्यंत कमी आहे. यंदा दुष्काळात विदर्भात अनेक ठिकाणी संत्रा बागा वाळून गेल्या. माझी खजुराची बाग मात्र हिरवी व फुलोऱ्यावर होती, असे त्यांनी सांगितले.  

उत्पादन 
   दरवर्षी झाडाचे वय वाढेल तसे उत्पादन   वाढते.
   सध्या प्रतिझाड मिळणारे उत्पादन- १२५ ते १५० किलो (अर्थात १० वर्षांचे)-
   एकरी झाडांची संख्या- सुमारे ६० 

पॅकिंग आणि ब्रँडिंग
सुरवातीला प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये खजूर नागपुरातील रस्त्यावर स्टॉल मांडला जायचा. परंतु, प्लॅस्टिक पिशवीकडे ग्राहक फारसे आकर्षित होत नसल्याने बॉक्‍स पॅकिंग व लेबलिंगचा निर्णय घेतला. अर्धा किलो पॅकिंगमधून विक्री होते. शंभर रुपये त्याचा दर असतो. datesnagpur.com या नावाने वेबसाइट विकसित केली आहे. त्या माहितीच्या आधारे दररोज शेतकरी प्रयोग पाहण्यासाठी येतात. कृषितज्ज्ञ, अधिकाऱ्यांनीही प्रत्यक्ष भेट देत सावी यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. विदर्भात वर्धासारख्या काही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी हा प्रयोग केला आहे.

शेती झाली प्रयोगशाळा
सावी यांनी केळीच्या पाच जाती, पेरू, आंबा, ड्रॅगन फ्रुट, चिकू, नारळ, अंजीर, लिंबू, कोलकता पान, स्ट्रॉबेरी आदींच्या माध्यमातून शेतीला प्रयोगशाळा बनवली आहे. बटेर व टर्की पक्ष्यांचे संगोपनही केले आहे. त्यांना नागपूर मार्केट उपलब्ध असल्याचे ते सांगतात.  

सावी यांची शेती व अनुभव 
   डिसेंबर, जानेवारीत तापमान १५ अंशांपर्यंत खाली आले पाहिजे. त्यानंतरच फेब्रुवारीत फूलधारणा होते.
   मार्च-एप्रिलमध्ये तापमानवाढीमुळे गोडपणा व फळांचा आकार वाढीस लागण्यास मदत 
   तमिळनाडू भागात डिसेंबर, जानेवारीत तापमान खाली येत नसल्याने फटका बसून अनेक शेतकऱ्यांना बागा काढून टाकाव्या लागल्या, असे सावी यांचे निरीक्षण आहे. 
   किडी-रोगांचा प्रादुर्भाव फारसा नाही. 
   उतीसंवर्धित रोपांची लागवड. इंग्लंडमध्ये रोपे तयार होतात. ही रोपे सावी यांनी गुजरातमधून आणली.जातीचे नाव ‘बरी’ असल्याचे ते सांगतात. 
   प्रतिरोपाचा दर ३४०० ते ३५०० रुपये    
   फळधारणा होईपर्यंत आंतरपीक घेणे शक्य 
   लागवडीनंतर चार वर्षांनी उत्पादनास सुरुवात  
   प्रतिझाड ५० किलोपर्यंत शेणखताचा दरवर्षी वापर
   रासायनिक खतांची व किडी-रोगांसाठी फवारणीची जवळपास गरज नाही 
   बागेत मेल व फिमेल अशा दोन्ही झाडांची लागवड करावी लागते 
   सध्या फळांचा हंगाम सुरू आहे. साधारण पावसात फुलोऱ्याचे नुकसान होत नाही. मात्र, फार प्रचंड पावसात नुकसान होऊ शकते. 

मार्केटिंग 
झिल्पी तलाव, भीमकुंड तलाव अशी दोन पर्यटनस्थळे या भागात आहेत. साहजिकच   पर्यटकांची येथे रेलचेल राहते. त्यामुळे मार्केटिंगसाठी विशेष प्रयत्न करावे लागले नाहीत. स्थानिक स्तरावर २०० रुपये प्रतिकिलोने दराने तर नागपुरात घाऊक दरात म्हणजे १४० रुपये दराने पुरवठा केल्याचे सावी सांगतात. यंदा वातावरण अधिक पोषक असल्याने विदर्भात खजूर लवकर परिपक्‍व होत मार्केटला गेला. तर, गुजरातचा माल येण्यास आणखी १५ दिवसांचा कालावधी आहे. वातावरण हा घटक खजूर उत्पादनात सर्वाधिक प्रभावी ठरतो, असे ते सांगतात. 

विद्यापीठात खजूर लागवडीचा प्रयोग 
नागपूर कृषी महाविद्यालयात खजूर लागवडीचा प्रयोग सुरू करणार आहोत. 
आणंद कृषी विद्यापीठातून (गुजरात) त्यासाठी उतीसंवर्धित रोपे आणणार आहोत. लागवडीचा काळ, फुलोरा अशा विविध अवस्थांत कोणते तापमान, हवामान अनुकूल आहे, याचा अभ्यास करणार आहोत. थांगवेल यांच्या प्रयत्नांची नोंद घेतली आहे. त्यांच्यासारखे अजून काही शेतकरी विदर्भात आहेत. त्यांच्याकडील प्रयोगांवरही देखरेख ठेवून अभ्यासाच्या नोंदी ठेवणार आहोत.
- डॉ. प्रकाश नागरे, अधिष्ठाता, उद्यानविद्याशास्त्र, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

 : सावी थंगावेल, ९८२२७४३२२८

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com