प्रशिक्षण, अनुभवातून सुधारली शेती...

प्रशिक्षण, अनुभवातून सुधारली शेती...

डॉ. दीपक मुळीक हे पुण्यामध्ये वैद्यकीय व्यवसाय करतात. वैद्यकीय व्यवसाय सांभाळत त्यांनी सांगली जिल्ह्यातील नेर्ली (ता. कडेगाव) येथील वडिलोपार्जित शेतीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. सुधारित तंत्राचा वापर करीत शेतीमध्ये वेगळेपण जपले आहे.

सांगली जिल्ह्यातील कडेगाव हा अवर्षणग्रस्त तालुका. अलीकडे या तालुक्‍यात सरकारी सिंचन योजनांचे पाणी फिरल्याने परिस्थिती हळूहळू बदलू लागली आहे. या परिसरातील नेर्ली गावामध्ये डॉ. दीपक रंगराव मुळीक यांची शेती आहे. शेतीविकासाबाबत माहिती देताना डॉ. दीपक मुळीक म्हणाले, की आमची वडिलोपार्जित दहा एकर शेती. आमचा भाग जिरायती असल्यामुळे ज्वारी, सोयाबीन या हंगामी पिकांतून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. मी शिकण्यासाठी पुण्यात काकांकडेच होतो. मी पुण्यात एम.डी. (होमिओपॅथी) हे शिक्षण पूर्ण केले. पुण्यामधील वारजे परिसरात मी आणि माझ्या डॉक्टर पत्नीने दवाखाना सुरू केला. हळूहळू वैद्यकीय व्यवसायात स्थिरावलो. हे करत असताना शेतीविकासाचे नियोजन डोळ्यांसमोर होतेच.

कुटुंबाची मिळाली साथ ः
घरची परिस्थिती बेताची असल्याने घरची आर्थिक जबाबदारी डॉ. मुळीक यांच्यावरच होती. अशाही परिस्थितीत शेती सुधारण्याचे नियोजन सुरू होते. याबाबत डॉ. मुळीक म्हणाले, की पुणे येथील दवाखान्याच्या व्यग्रतेमुळे स्वतः शेतीमध्ये व्यवस्थापन करणे शक्य नव्हते. तरीही दवाखान्याच्या कामकाजाच्या मोकळ्या वेळेत मी शेतीविषयक नवीन माहिती घेण्यास सुरवात केली. पुण्यातील शेतकरी मित्रांच्या मदतीने अनेक ठिकाणी भेटी दिल्या. पॉलिहाउसमधील शेतीचा अभ्यास केला. यातील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतीवर जाऊन अडचणी आणि सुधारणा समजावून घेतल्या. त्यातून आपल्या शेतीमध्ये कोणता बदल करता येऊ शकतो याचा अंदाज बांधला. या बदलाबाबत मी कुटुंबातील सदस्यांशी चर्चा केली. परंतु, शेतीतील नवीन प्रयोग घरातील लोकांच्या पचनी पडतील का, ही भीती होती. यशस्वी झालो नाही, तर पुन्हा बुडत्याचा पाय खोलात, अशी अवस्था होणार होती. परंतु नवीन तंत्रज्ञानाच्या अवलंबाने शेतीमधून आर्थिक उत्पन्न वाढू शकते, हे कुटुंबातील सदस्यांच्या लक्षात आल्याने संमती मिळाली. त्यातूनच पॉलिहाउसमधील फुलशेतीची संकल्पना आकाराला आली.

पॉलिहाउसची केली उभारणी ः
चांगल्या जमिनीत पॉलिहाउसमधील शेतीसाठी घरच्या सदस्यांची सहमती नव्हती, त्यामुळे डॉक्‍टरांनी दीड एकर खडकाळ जमिनीची निवड केली. पॉलिहाउस उभारणीबाबत डॉ. मुळीक म्हणाले, की मी पहिल्यांदा खाचखळग्यांनी भरलेल्या जमिनीचे सपाटीकरण केले. एक एकरपैकी २० गुंठे क्षेत्रात पॉलिहाउस उभारणीचे नियोजन केले. वीस गुंठे क्षेत्रात तांबडी माती आणि शेणखत बाहेरून आणून मिसळले. चांगल्या दर्जाचे साहित्य वापरून पॉलिहाउसची उभारणी केली. उर्वरित २० गुंठे जागेत शेततळे करण्याचा विचार होता. परंतु खडकावर कागद टिकणार नाही म्हणून एक लाख ६० हजार लिटर साठवण क्षमता असलेला हौद बांधला. विहीर, कूपनलिका आणि कालव्याच्या पाण्याने हौद भरला जातो.

असे ठेवले शेतीचे नियोजन ः
पॉलिहाउस उभारणीचा निर्णय घेतल्यानंतर तो यशस्वी करणे गरजेचे होते. कुटुंबीय मदतीला होते; परंतु महत्त्वाची भूमिका डॉक्‍टरांची होती. पीक नियोजनाबाबत डॉ. मुळीक म्हणाले, की जून २०१३ मध्ये पाऊस येण्याच्या अगोदर पॉलिहाउसमध्ये योग्य आकाराचे खत- माती मिश्रणाचे वाफे तयार करून जरबेराच्या सहा जातींची रोपे लावली. गेल्या तीन वर्षांपासून पॉलिहाउसमध्ये सहा रंगांच्या फुलांचे उत्पादन सुरू आहे. जरबेरा रोपांची लागवड व्यवस्थित झाली. ठिबक सिंचन केले. मी न चुकता दर शनिवारी रात्री गावाकडे येतो. रविवारी दिवसभर पीक पाहणी करून तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पाणी व्यवस्थापनाचे वेळापत्रक, कीड- रोगाच्या प्रादुर्भावानुसार फवारणीचे नियोजन करून रविवारी संध्याकाळी पुण्याला परततो. आजही दर रविवारी पीक व्यवस्थापनाचे पुढील आठवड्यातील नियोजन कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करून केले जाते. अनेकवेळा गावाकडचा प्रवास मी दुचाकी किंवा एसटी बसने केला. आता चारचाकी गाडीने जातो. गेल्या तीन वर्षांत पॉलिहाउसचे नियोजन व्यवस्थित झाले आहे. त्यामुळे एखाद्या आठवड्याला गावी जाणे लांबले तर बंधू सागर हे माझ्याशी चर्चा करतात. तसेच, पिकांचे व्हॉट्‌सॲपवर फोटो टाकतात. त्यानुसार मी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन मार्गदर्शन करतो. फुलांच्या विक्रीची जबाबदारी पुण्यात माझ्याकडेच आहे.

पिकाचा आर्थिक ताळेबंद डॉक्टरांनी काटेकोर ठेवला आहे, त्यामुळे अतिरिक्त खर्च मर्यादेत आहे. याबाबत डॉक्टर सांगतात, की जरबेराच्या एका झाडाला वर्षात ४० ते ६० फुले मिळतात. मी पुण्यातील व्यापारी बांधून घेतले आहेत. सरासरी एका फुलास २.५० ते ३ रुपये दर मिळतो. सण, दिवाळी, लग्न सराईत पाच रुपयांच्याही पुढे दर जातो. खर्च वजा जाता वर्षभरात मला तीन लाखांचा सरासरी नफा मिळाला आहे. काहीवेळा नुकसानही सोसावे लागले. पहिल्यांदा मी मुंबई, हैदराबादला फुले पाठवायचो; परंतु फसवणूक झाल्याने आता पुण्यामध्ये विक्रीचे नियोजन जमले आहे. गावाकडून भाजीपाल्याच्या गाडीतून मागणीनुसार फुलांचे बॉक्स पॅकिंग करून माझे बंधू सागर हे फुले पाठवतात. मी व्यापाऱ्यांशी बोलून विक्रीचे नियोजन करतो.

शेतीविकासाच्या दिशेने ः
शेतीविकासाबाबत डॉ. मुळीक म्हणाले, की फूल शेतीतील उत्पन्नातून मी उर्वरित शेती विकसित करण्यास सुरवात केली. सध्या २० गुंठे पॉलिहाउस, तीन एकर ऊस, दोन एकर चारा पिके आणि उर्वरित क्षेत्रात पाण्याच्या उपलब्धतेनुसार हंगामी पिकांची लागवड असते. उसाला ठिबक सिंचन केले आहे. पट्टा पद्धतीने ऊस लागवड आहे. पाचटाचे आच्छादन आहे. पूर्वी उसाचे एकरी ३० टन उत्पादन होते, आता ७० टनांवर पोचले आहे. सध्या पाच म्हशी आहेत, त्यामुळे शेतीला पुरेसे शेणखत मिळते. दुधाची विक्री गावातील डेअरीमध्ये केली जाते. सुधारित तंत्रज्ञाचा अवलंब केल्याने पीक उत्पादनात वाढ झाल्याने आर्थिक स्थिरता येऊ लागली आहे.

कुटुंबाला दिले प्रशिक्षण ः
डॉ. मुळीक यांनी आई, वडील आणि भावाला आष्टा गावातील पॉलिहाउस असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीवर दोन दिवस प्रत्यक्ष पीक व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले. भावाला पुण्याजवळील एका पॉलिहाउसमध्ये २० दिवस प्रशिक्षणासाठी ठेवले. त्यामुळे सर्वांना पॉलिहाउसची देखभाल, फुलांचे योग्य व्यवस्थापन, फुलांची तोडणी, बॉक्‍समध्ये पॅकिंग इत्यादी कामांची चांगली माहिती झाली. आता वडील रंगराव मुळीक, आई सौ. यशोदा, भाऊ सागर हे पॉलिहाउसची जबाबदारी सांभाळतात.

पहिले प्रशिक्षण, मग शेतीला सुरवात ः
पॉलिहाउसमधील फूल शेती ही संकल्पना निश्‍चित झाल्यावर डॉ. मुळीक यांनी दवाखाना बंद ठेवून तळेगाव दाभाडे येथील हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटरमधून दहा दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले. फुलांच्या जाती, व्यवस्थापन, विक्री यांची पूर्ण माहिती घेतली. काही पॉलिहाउसना भेटी देऊन प्रयोगशील शेतकऱ्यांचे नफा- तोट्याचे अनुभव जाणून घेतले. त्यामुळे प्रत्यक्ष शेतीमध्ये येणाऱ्या अडचणी अगोदर समजल्या, त्यावर मात करणे सोपे झाले.

संपर्क ः डॉ. दीपक मुळीक ः ८४१२०२९९२२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com