मुगासाठी प्रसिद्ध जळगावची बाजारपेठ

चंद्रकांत जाधव
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दरवर्षी मुगाची मोठी आवक होते. जळगाव शहर व लगतच्या भागात सुमारे २५ उत्तम दर्जाच्या डाळमिल्सध्ये मुगाला सप्टेंबर ते डिसेंबरदरम्यान मोठी मागणी असते. जिल्ह्यातीलच नव्हे तर औरंगाबाद, जालना, लातूर, बुलडाणा या भागांतूनही सप्टेंबरपासून चांगली आवक सुरू होते. मुगाला चांगला उठाव असल्याने आश्‍वासक उलाढाल जळगावच्या बाजारात होते.

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दरवर्षी मुगाची मोठी आवक होते. जळगाव शहर व लगतच्या भागात सुमारे २५ उत्तम दर्जाच्या डाळमिल्सध्ये मुगाला सप्टेंबर ते डिसेंबरदरम्यान मोठी मागणी असते. जिल्ह्यातीलच नव्हे तर औरंगाबाद, जालना, लातूर, बुलडाणा या भागांतूनही सप्टेंबरपासून चांगली आवक सुरू होते. मुगाला चांगला उठाव असल्याने आश्‍वासक उलाढाल जळगावच्या बाजारात होते.

मूग हे खरिपातील मुख्य पीक आहे. मुगासाठी जळगाव बाजार समिती उत्तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या बाजार समितीत सुमारे ५० अडतदार आहेत. यातील सुमारे १५ अडतदारांकडे मुगाची मोठी उलाढाल दरवर्षी होते. दरवर्षी गणेशोत्सवानंतर किंवा नवरात्रोत्सवाच्या सुरवातीला मूग बाजारात येण्यास सुरवात होते. जिल्ह्यात सर्वाधिक आवक जळगावच्या बाजारात होते. कारण, जळगाव शहरासह लगत सुमारे २५ डाळमिल्स आहेत. त्यांच्याकडून सप्टेंबर ते जानेवारी या दरम्यान मोठी मागणी राहते. मीलचालक बाजार समितीमधील अडतदार, व्यापारी यांच्याकडून मुगाची थेट खरेदी करतात. 

यंदा पिकावर परिणाम
मूग कमी पाण्यात येणारे हमीचे पीक आहे. काळ्या कसदार जमिनीत अगदी कमी पावसातही ते येते. यंदा खानदेशात अति पावसामुळे मुगाचा दर्जा घसरला. एकरी सव्वा ते दीड क्विंटल उत्पादन शेतकऱ्यांना साध्य झाले. त्यामुळे यंदा जळगावच्या बाजारातील आवक मागील वर्षाच्या तुलनेत प्रतिदिन ५०० ते ६०० क्विंटलने कमी आहे. 

येथून आवक
लातूर, बुलडाणा जिल्ह्यांतील खामगाव, जळगाव जामोद, जालना, औरंगाबाद जिल्ह्यांतील फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, फर्दापूरचा भाग आदी भागांतील व्यापारी मुगाची पाठवणूक येथे करीत आहेत. या भागातून सप्टेंबरमध्ये प्रतिदिन सुमारे दीड हजार क्विंटल आवक झाली. स्थानिक जळगाव, जामनेर, एरंडोल, यावल, भुसावळ आदी भागांतील शेतकऱ्यांकडून सप्टेंबरमध्ये प्रतिदिन सरासरी ५०० क्विंटल आवक झाली.

कमी खर्चाचे, हमीचे पीक - खानदेशात मुगाची दरवर्षी सुमारे ५० हजार हेक्‍टरवर मुगाची पेरणी जूनमध्ये किंवा पावसावर केली जाते. जळगाव जिल्ह्यात यंदा २५ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. १५ जून ही मूग पेरणीची अंतिम तारीख असते. परंतु, उत्तम व्यवस्थापन करणारे शेतकरी २० ते ३० जूनपर्यंत पावसावर पेरणी करून चांगले उत्पादन साध्य करतात. एकरी पाच किलो बियाणे लागते. अनेक शेतकरी घरी जतन केलेले तर काही शेतकरी विद्यापीठांनी प्रसारित केलेल्या वाणांचा उपयोग करतात. मूग हे पीक जमिनीत नत्र स्थिरीकरण करण्यास मदत करते. त्यामुळे जमीन सुपीकतेसाठी या पिकाला शेतकरी प्राधान्य देतात.  या पिकाला फवारणीही फारशी लागत नाही. रासायनिक खतांचा अत्यंत अल्प वापर न करताही हे पीक साध्य करणारे शेतकरी आहेत. 

मुगाला जोडलेली पीक पद्धती - काढणी मजुरांकरवी होते. त्यासाठी एकरी एक हजार रुपये खर्च येतो. यंत्राद्वारे मळणीसाठी क्विंटलमागे १५० ते २०० रुपये लागतात. मुगाचे क्षेत्र दसरा सणापूर्वीच रिकामे होते. त्वरीत कोरडवाहू शेतकरी संबंधित क्षेत्रात ज्वारी (दादर), हरभरा पेरतात. मुगावर कोरडवाहू रब्बी हंगाम हमखास साध्य होतो. तर जळगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर आदी भागांतील केळी उत्पादक कांदेबाग केळीसाठी (सप्टेंबर, ऑक्‍टोबरमधील लागवड) नियोजित क्षेत्रावर खरिपात मूग पेरतात. यामुळे जमीन मऊ, सेंद्रिय कर्बयुक्त बनते. यंदा पाऊसमान जास्त राहिल्याने एकरी एक ते दीड क्विंटल उत्पादन आले आहे. एरवी ते दोन ते अडीच क्विंटलपर्यंतही मिळते असे घाडवेल (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील मूग उत्पादक देवेंद्र पाटील म्हणाले.

असे आहेत दर (प्रतिक्विंटल)
  मुगाचे दर मागील दोन वर्षे वधारले आहेत. 
  सन २०१७ - ३००० ते ४००० रु.
  २०१८- ३५०० ते ५०००,
  २०१९- ४००० ते ६००० रु. अर्थात दर्जेदार मुगाला कमाल ६००० रुपयांपर्यंत दर आहे.
  सप्टेंबरच्या सुरवातीला काही शेतकऱ्यांना ६२५० रुपयेही दर मिळाला. 
  कमी उत्पादन व आवक गतीने होत नसल्याने दर टिकून आहेत.

अशी राहिली आवक ( प्रतिदिन सरासरी)
  सन २०१७- सप्टेंबर- तीन हजार क्विंटल, ऑक्‍टोबर ते डिसेंबर-दीड हजार क्विं.
  २०१८- सप्टेंबर- तीन हजार क्विंटल, ऑक्‍टोबर- साडेतीन हजार क्विंटल
  २०१८ मध्ये नोव्हेंबर व डिसेंबर- एक हजार क्विंटल.
  यंदा सप्टेंबर- दोन हजार क्विंटल 

डाळ मिल्सना दररोजची गरज
डाळमिल्सना दररोज मुगाची गरज असते. दिवाळीच्या वेळेस डाळनिर्मितीचे काम वेगात सुरू होते. त्यापूर्वी या मिल्स हंगाम लक्षात घेऊन डाळींची मागणी करून साठा करतात. जळगाव व लगतच्या मिल्सना सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान दररोज दीड हजार क्विंटल मुगाची गरज असते. ती लातूर, औरंगाबाद, बुलडाणा भागांतील मुगाद्वारे पूर्ण होते. कारण, जळगावमध्ये उत्पादित मूग अमळनेर, चोपडा, धुळ्यातील शिरपूरपर्यंत विक्रीसाठी जातो. तुटवडा भासू नये यासाठी काही व्यापारी जूनमध्येच औरंगाबाद, बुलडाणा भागांतील व्यापाऱ्यांकडे आगाऊ नोंदणी करतात. तेथून स्वच्छता, प्रतवारीनंतर मूग जळगावच्या बाजारात येतो. त्याची तोलाई करून तो थेट मिल्सकडे रवाना होतो. 

जळगावच्या बाजारातील उलाढाल
  सन२०१७- सप्टेंबर- सुमारे ३१ कोटी.
  २०१८- ४१ कोटीं.
  दरवर्षी ऑक्‍टोबरमध्ये दिवाळीनंतर ८ ते १० दिवस उलाढाल बऱ्यापैकी राहते. नंतर कमी होते.

अन्य बाजार समित्यांतही आवक 
खानदेशात मुगाची सर्वत्र पेरणी होते. साहजिकच आवक जळगावसह अन्य बाजारातंही होते. मुगासाठी जळगाव जिल्ह्यात अमळनेर, चोपडा, धुळे जिल्ह्यांतील शिरपूर, दोंडाईचा (ता. शिंदखेडा) तर नंदूरबार जिल्ह्यातील नंदुरबार व शहादा बाजार समित्या प्रसिद्ध आहेत.

देवेंद्र पाटील, ७३५०९९४८१५ 
जगदीश वाणी - ९४२२२७९५४६
अडतदार, जळगाव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The famous Jalgaon market for Mug