शेतकरी गट झाला जवसातील हुकमी एक्‍का

विनोद इंगोले
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

आरोग्यदायी जवसाची वाढती मागणी लक्षात घेत ही बाजारपेठ ‘कॅश’ करण्याचा प्रयत्न चिखलापार (जि. नागपूर) येथील गजानन महाराज शेतकरी समूह गटाने केला आहे. पुण्यातील एका विद्यापीठाला त्या माध्यमातून जवस पुरवले जाते. सोबतच काही कृषी संस्थांसाठीही बीजोत्पादन करून त्याद्वारेही आर्थिक उत्पन्न जोडण्यात हा गट यशस्वी झाला आहे. 

आरोग्यदायी जवसाची वाढती मागणी लक्षात घेत ही बाजारपेठ ‘कॅश’ करण्याचा प्रयत्न चिखलापार (जि. नागपूर) येथील गजानन महाराज शेतकरी समूह गटाने केला आहे. पुण्यातील एका विद्यापीठाला त्या माध्यमातून जवस पुरवले जाते. सोबतच काही कृषी संस्थांसाठीही बीजोत्पादन करून त्याद्वारेही आर्थिक उत्पन्न जोडण्यात हा गट यशस्वी झाला आहे. 

नागपूर जिल्ह्यात उमरेडपासून सुमारे २२ किलोमीटरवर पांझरापार चौरस्ता भागात डॉ. नारायण लांबट यांची शेती आहे. चिखलापार (जि. नागपूर) येथील गजानन महाराज शेतकरी समूह गटाचे मुख्य काम तेच पाहतात. ते कृषिभूषण तर त्यांच्या पत्नी सौ. माया जिजामाता कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित आहेत. गटात सुमारे २०० सदस्य आहेत. उमरेड, कुई आणि भिवापूर तालुक्‍यात हे शेतकरी विस्तारले आहेत. आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळताना शेतीचा व्यासंगही त्यांनी जपला. त्याच अनुषंगाने त्यांचा संपर्क डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाशी (अकोला) आला. त्याद्वारे विद्यापीठाची प्रात्यक्षिके लांबट यांच्या शेतापर्यंत पोचली.  

जवस शेतीची परंपरा 
लांबट यांच्याकडे अनेक वर्षांपासून जवस शेती होते. मात्र, २०१४ पासून या पिकाकडे त्यांनी विशेषत्वाने लक्ष देण्यास सुरवात केली. सध्या ते एकरी ५ क्विंटलपर्यंत उत्पादन घेतात. सन २०१३ च्यादरम्यान अकोला येथील कृषी विद्यापीठांतर्गंत नागपुरातील जवस संशोधन केंद्रातील तत्कालीन वरिष्ठ संशोधक डॉ. प्रकाश घोरपडे यांच्या संपर्कात लांबट आले. त्यानंतर केंद्र सरकारच्या एका प्रकल्प समितीवरही ते नियुक्‍त झाले. या प्रकल्पात चंद्रपूरसह पूर्व विदर्भातील काही आदिवासी गावांमध्ये जवस लागवडीला प्रोत्साहन देण्याकरिता बियाणे वाटप व्हायचे. लांबट यांच्या पुढाकारातून भिवापूर, उमरेड तालुक्यांत जवस लागवडीला प्रोत्साहन मिळाले. 

शेतकऱ्यांना मोफत बियाणे
जवस लागवडीला प्रोत्साहन म्हणून एका योजनेतून जवसाचे बियाणे शेतकऱ्यांना एकरी १० किलोप्रमाणे बियाणे वाटप केले गेले. मात्र, बहुतांश शेतकऱ्यांनी लागवड केली नाही. केवळ मोफत मिळते म्हणून अनेक जण घेऊन गेले असाही अनुभव आला.

समूहाची स्थापना
सन २०१३ साली जवस उत्पादकांचा गजानन महाराज शेतकरी समूह गट स्थापन करण्यात आला. या गटातर्फे आज जवस उत्पादन व बीजोत्पादन असे दोन्ही कार्यक्रम राबवले जातात. कृषी विभागाच्या आत्मा अंतर्गंत गटाची नोंदणी करण्यात आली आहे. यात लांबट यांच्या व्यतिरिक्त सचिव पंकज प्रल्हाद मुंगले, उपाध्यक्ष बळिराम मेंडोले, कोशाध्यक्ष मुकुंदा पाटील, वासुदेव मेश्राम, डॉ. मधुकर वऱ्हाडे, माया नारायण लांबट, सल्लागार माजी मंत्री डॉ. श्रावण पराते आदींचा समावेश आहे.  
 : डॉ. नारायण लांबट, ९९२३०१५२४७

जवसाचे मार्केट 
यंदा साडेसहा हजार रुपये प्रतिक्‍विंटलचा दर उमरेड व भिवापूर बाजार समितीत जवसाला मिळाला. मात्र, गटाला त्यापेक्षाही शाश्वत ग्राहक स्त्रोत पुणे येथील भारती विद्यापीठाच्या रूपाने मिळाला आहे. त्यामुळे त्यांनाच जवसाचा पुरवठा करण्यावर अधिक लक्ष दिले जाते. जवस हे अत्यंत आरोग्यदायी, हृदयविकाराला प्रतिबंध करणारे म्हणून अोळखले जाते. भारती विद्यापीठात जवस व त्याची आरोग्यदायी उत्पादननिर्मिती या विषयावर प्रकल्प राबवला जात आहे. विद्यापीठाने जवसापासून बिस्कीटे, केक, अंडी आदी मूल्यवर्धीत पदार्थ तयार केले आहेत. त्यासंबंधी सल्लागार म्हणून डॉ. प्रकाश घोरपडे कार्यरत आहेत. त्यांच्यामार्फत गटाला जवसासाठी बाजारपेठ उपलब्ध झाली. 

लांबट म्हणाले की, विद्यापीठाला वर्षाला १०० टन जवसाची गरज आहे. मात्र, आम्ही गेल्या दोन वर्षांपासून एकूण सुमारे २० टनांपर्यंतच पुरवठा करू शकलो आहे. विद्यापीठाकडून किमान हमीभाव क्विंटलला पाचहजार रुपये मिळतो. बाजारातील दर त्याहून वाढले तर त्या दरावर ठराविक बोनस रक्कम दिली जाते. वाहतूक व तत्सम खर्चाचा भार विद्यापीठाकडून उचलला जातो. उत्पादक शेतकऱ्यांची यादी पाठविली जाते. त्यानंतर विद्यापीठाकडून त्या शेतकऱ्यांच्या नावे धनादेश काढला जातो.

मोफत निविष्ठांद्वारे प्रोत्साहन 
या उपक्रमात जवस उत्पादक व विद्यापीठ यांच्यात समन्वयक म्हणून लांबट जबाबदारी सांभाळतात. त्यासाठी आपण कोणतेही शुल्क आकारत नाही असे ते म्हणतात. शेतकऱ्यांकडून जवस खरेदी केल्यानंतर त्यांच्या पॅकहाउसमध्ये साठवले जाते. येथे पॅकिंग व ग्रेडिंगची व्यवस्थादेखील उभारली आहे. माल जास्त असल्यास मात्र त्यावर साठवणुकीचे काही शुल्क घेतले जाते. त्याचबरोबर शेतीविषयी सांगायचे तर शेतकऱ्यांना शासकीय योजनेद्वारे मोफत बियाणे दिले जाते. सुमारे १५० एकरांवर हे बियाणे देण्यात आले आहे. यात सुमारे १५० शेतकरी सहभागी आहेत. जवस पिकाच्या शेतीबाबत शेतकरी फारसा उत्साही असत नाही. त्यामुळे मोफत निविष्ठा देऊन त्याला त्यासाठी तयार करावे लागते असे लांबट म्हणाले. 

जवस शेतीतील ठळक बाबी  
लांबट या पिकातील आपले अनुभव सांगताना म्हणतात की, पिकेव्हीएनएल-२६० हे वाण वापरले जाते. ऑक्‍टोबरअखेर ते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत त्याची लागवड करता येते. एकरी दहा किलो बियाणे लागते. पेरणीनंतर ४० दिवसांनी एक व ६० ते ७० दिवसांनी दुसरी याप्रमाणे पाण्याच्या दोन मुख्य पाळ्यात हे पीक येते. तेलबियावर्गीय पीक असल्याने एकरी सहा किलो सल्फर पेरणीवेळी दिले जाते. निंबोळी अर्क फवारून किडींचे नियंत्रण केले जाते. दोन ओळीतील अंतर एक फुटापर्यंत ठेवल्याने डवरणी शक्‍य होते. त्यामुळे तणनियंत्रणातील मजुरीचा खर्च वाचतो. पिकाला पाटपाण्याऐवजी तुषारसंचाच्या मदतीने पाणी दिल्यास उत्पादकता अधिक मिळते. गव्हाच्या तुलनेत या पिकाची पाण्याची गरज कमी आहे. एकरी सहा ते सात हजार रुपये उत्पादन खर्च येतो. एकरी उत्पादन ४ ते ६ क्‍विंटलपर्यंत मिळते. 

बीजोत्पादनातूही उत्पन्न 
एका बियाणे कंपनीकडूनही गजानन महाराज शेतकरी समूह गटाला बीजोत्पादनासाठी बियाणे पुरविण्यात आले आहे. त्यापासून पायाभूत व प्रमाणीत बियाणे उत्पादन केले जाणार आहे. यापूर्वी गटातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून ६४० एकरांवर बीजोत्पादनाचा प्रयोग करण्यात आला. त्याची विक्री आमच्या समूहाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. त्याचबरोबर नागपूर कृषी महाविद्यालयाला १५० एकर, गडचिरोली कृषी विज्ञान केंद्र २५ एकर, सिंदेवाही प्रादेशिक संशोधन केंद्र व भंडारा कृषी विभाग (आत्मा) प्रत्येकी १२५ एकर, रामकृष्ण बजाज कृषी महाविद्यालय (जि. वर्धा) ४० एकर एवढ्या क्षेत्रासाठी गटातर्फे जवस बीजोत्पादन घेण्यात आले आहे. त्यास क्विंटलला १० हजार रुपये दर मिळतो. एकरी १० किलो बियाणे लागते. सध्या सुमारे ३० एकरांवर सहा शेतकरी हा उपक्रम राबवत असल्याचे लांबट म्हणाले. 

Web Title: farmer group linseed