शेतकरी कंपन्यांना वाहन खरेदीसाठी निम्मे अनुदान देणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

पणनमंत्री देशमुख, सोलापूरमध्ये शेतकरी आठवडे बाजार 

सोलापूर - "शेतकरी आठवडे बाजारात शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक करण्यासाठी पन्नास टक्के अनुदानावर वाहन देऊ, तसे प्रस्ताव शेतकरी कंपन्यांनी द्यावेत, त्याला तत्काळ मंजुरी देऊ, असे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी सोमवारी (ता.१०) येथे सांगितले. 

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थपान यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने सोलापुरातील केशवनगर येथील पोलिस वसाहतीच्या पाठीमागे शहरातील दुसऱ्या शेतकरी आठवडे बाजाराचे उदघाटन महापाैर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी प्रमुख पाहुणे मंत्री देशमुख बोलत होते. पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे, पणन मंडळाचे भास्कर पाटील, सतीश वाघमोडे आदी उपस्थित होते. 

श्री. देशमुख म्हणाले, की आठवडे बाजाराची संकल्पना सगळीकडेच लोकप्रिय आणि उपयुक्त ठरत आहे. शहरी भागातील लोकांनी आवर्जून याच बाजारातून भाजी खरेदी करावी, शेतकरी गट आणि कंपन्यांनी त्यासाठी आणखी सहभाग वाढवावा, जागतिक बॅंकेच्या अर्थसाह्यावर सुरू असलेल्या कंपन्यांना भागभांडवल निर्माण करणे आणि उत्पन्नाचा स्राेत निर्माण करण्यासाठी आठवडे बाजार फायदेशीर ठरत आहेत. महापालिकेनेही यासाठी पुढाकार घ्यावा, शहरातील मध्यवर्ती ठिकाणाच्या जागा या बाजारासाठी मोफत द्याव्यात. 

महापौर बनशेट्टी यांनीही महापालिकेच्या अशा जागा आम्ही शोधू आणि त्या शेतकरी कंपन्यांना देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्‍वासन दिले. याच कार्यक्रमात पोलिस आयुक्त सेनगावकर यांनी अरविंदधाम आणि मुख्यालय येथे जागा देऊ, असे सांगितले. 
 
Web Title: farmers agriculture vehicles