एकात्मिक शेतीतूनधुमाळ कुटुंबीयांची प्रगती

माणिक रासवे
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

बाभूळगाव (जि. परभणी) येथील धुमाळ बंधूंनी शेतीला दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन व्यवसायाची जोड देत एकात्मिक शेतीचे मॉडेल उभे केले. योग्य पद्धतीने वर्षभराचे पीक नियोजन, एकत्रित कुटुंब पद्धती आणि एकात्मिक शेती असा सुरेख मिलाफ धुमाळ बंधूंनी साधला आहे.

बाभूळगाव (जि. परभणी) येथील बाळाजी धुमाळ यांना विठ्ठल, दासराव, कैलास, बालाजी अशी चार मुले. गाव शिवारात धुमाळ कुटुंबाची जमीन आहे. यापैकी पंधरा एकर बागायती, तर दहा एकर हलकी, मुरमाड आणि एक एकर माळ जमीन आहे. दहा एकराच्या सिंचनासाठी विहीर आणि अर्धा एकरावर शेततळे अशी सुविधा धुमाळ बंधूंनी उभारली. हंगाम आणि पाणी उपलब्धतेनुसार कापूस, सोयाबीन, मूग, तूर, भूईमूग, कांदा, मिरची, बटाटा, चारा पिकांचे दरवर्षी नियोजन ठरते. अडीच एकरावर पेरू आणि केसर आंबा फळबाग लागवड आहे. धुमाळ बंधूंनी शेतीला दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालनाची जोड दिली. पुरक व्यवसायांमुळे गेल्या दोन वर्षांच्या दुष्काळातही धुमाळ कुटुंब शेतीमध्ये टिकून आहे. कृषी विभाग तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनामुळे पारंपरिक शेतीत बदल करून आधुनिक शेतीकडे धुमाळ बंधूंची वाटचाल सुरू आहे. एकमेकांबद्दल आदर आणि जिव्हाळा यामुळे धुमाळ कुटुंबाची एकी टिकून आहे.

हंगाम, पाण्यानुसार शेतीचे नियोजन -
दरवर्षी धुमाळ बंधू सुमारे १५ एकरावर बीटी कापूस, तीन एकर मूग, दोन एकर सोयाबीन आणि पाच एकरावर मूग लागवड करतात. पीक लागवड आणि व्यवस्थापनाबाबत कृषी विभाग आणि परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांचा सल्ला घेतला जातो. विद्यापीठातर्फे आयोजित शिवारफेरीमध्ये जाऊन सुधारित तंत्रज्ञानाची माहिती घेऊन धुमाळ बंधू पीक व्यवस्थापन करतात. त्यामुळे कपाशीचे एकरी १० ते १२ क्विंटल, सोयाबीनचे सात क्विंटल आणि मुगाचे तीन क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. कमी पावसामुळे पीक उत्पादनावर काहीवेळा परिणाम होतो. पाण्याची उपलब्धता असेल तर हंगामानुसार चार एकर कांदा, चार एकर भुईमुगाची लागवड असते. पीक फेरपालटीवर धुमाळ बंधूंचे लक्ष असते. बाजारपेठेनुसार पीक नियोजन केले जाते. योग्य दर देणाऱ्या व्यापाऱ्यांना कापूस, कांदा, सोयाबीनची विक्री केली जाते. त्यामुळे अपेक्षित नफा शिल्लक रहातो. स्वतः धुमाळ बंधू परभणी शहरात केसर आंबा आणि सरदार पेरूची हात विक्री करतात. फळबागेतून खर्च वजा जाता दरवर्षी पन्नास हजारांचे उत्पन्न मिळते.

शेडनेटची उभारणी -
दोन वर्षांपूर्वी धुमाळ बंधूंनी दहा गुंठे क्षेत्रावर शेडनेटची उभारणी केली. त्यासाठी कर्ज घेतले नाही. जानेवारीमध्ये टोमॅटो लागवड केली. परंतु, चांगला दर मिळाला नाही, त्यामुळे खर्च वजा जाता पंधरा हजारांचे उत्पन्न मिळाले. जूनमध्ये मेथी लागवडीतून पंधरा हजारांचे उत्पन्न मिळाले. आॅक्टोबरमध्ये काकडी लागवड केली आहे. सुधारित तंत्रातून पीक उत्पादन वाढविण्याचा धुमाळ बंधूंचा प्रयत्न असतो. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानअंतर्गत पॅक हाउसची उभारणी त्यांनी केली आहे.

शेळीपालनाने दिला आर्थिक आधार -
सहा वर्षांपूर्वी धुमाळ बंधूंनी एक गावरान जातीची शेळी घेतली. पुढे या शेळीपासून टप्‍प्याटप्‍प्याने सहा शेळ्या झाल्यानंतर त्यांनी त्या अर्धेलीने सांभाळण्यास दिल्या. आता लहान मोठ्या ५० शेळ्या त्यांच्याकडे आहेत. बालाजी धुमाळ यांच्याकडे शेळीपालनाची जबाबदारी आहे. दरवर्षी बोकडांची विक्री केली जाते. यातून खर्च वजा जाता दीड लाखांचे उत्पन्न मिळते.

दूध, तूप विक्रीतून वाढविला नफा -
गेल्या दहा वर्षांपासून धुमाळ कुटुंबीय पशुपालनात आहे. धुमाळ यांच्याकडे १५ म्हशी, रेडके आहेत. त्यापैकी दोन जाफराबादी, एक मुऱ्हा आणि बाकीच्या गावरान आहेत. सध्या नऊ म्हशी दुधात असून दररोज ५० लिटर दूध मिळते. परभणी शहरात घरगुती तसेच हाॅटेल व्यावसायिकांना प्रतिलिटर ५० रुपये दराने सुमारे ४० लिटर दुधाची विक्री होते. दर चार दिवसाला एक किलो तूप तयार केले जाते. थेट ग्राहकांना ६०० रुपये प्रतिकिलो या दराने तुपाची विक्री होते. धुमाळांच्याकडे चार गावरान गाई आहेत. तीन गाईंचे दररोज सात लिटर दूध मिळते. हे दूध ४० रुपये लिटरप्रमाणे गावात विकले जाते. दरमहा दूध, तूप विक्रीतून खर्च वजा जाता पंधरा हजारांचे उत्पन्न मिळते. कैलास धुमाळ हे परभणी शहरात दुधाचे रतीब घालतात. गायीपासून गोऱ्हे मिळतात, त्यामुळे शेतीकामासाठी बैलजोडी विकत घ्यावी लागत नाही. पशुपालनामुळे धुमाळांच्याकडे दरवर्षी २० ट्राॅली शेणखत उपलब्ध होते. दरवर्षी आठ एकर जमिनीत हे शेणखत मिसळले जाते. त्यामुळे सुपीकता टिकून आहे.

कोंबडीपालनाची साथ -
दुग्ध व्यवसाय, शेळीपालनाचा विस्तार होत असताना दोन वर्षांपासून धुमाळ कुटुंबीयांनी गावरान कोंबडी पालन सुरू केले. सध्या त्यांच्याकडे ४० गावरान कोंबड्या आहेत. अंडी आणि कोंबडी विक्रीतून त्यांना वर्षाकाठी २० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते.

अशी आहे कामाची विभागणी -
धुमाळ यांच्या कुटुंबामध्ये एकूण १९ सदस्य आहेत. बाळाजी धुमाळ आणि कैलास हे शेतीकामाचे नियोजन करतात. कैलास दररोज परभणी येथे दूध विक्रीस नेतात. दासराव यांच्याकडे गायी-म्हशीची देखभाल आणि दूध काढण्याची जबाबदारी आहे. बालाजी यांच्याकडे शेळीपालनाची जबाबदारी आहे. विठ्ठल यांच्याकडे शेतीकामांची जबाबदारी असते. कुटुंबातील महिला सदस्या पीक आंतरमशागत, पीक काढणीचे नियोजन सांभाळतात. गरज पडल्यास शेतीकामासाठी मजूर घेतले जातात. धुमाळ कुटुंबीयांना सालगडी ठेवण्याची आजवर गरज पडली नाही. कुटुंबाच्या रोजच्या खर्चासाठी दुग्धव्यवसायातून पैसा मिळतो. बियाणे, खते, कीटकनाशके, किराणा सामान आदी सर्व व्यवहार रोखीने केला जातो. शेळी, कोंबडीपालनामुळे आर्थिक हातभार लागतो. त्यामुळे शेतीमालाचे उत्पन्न शिल्लक रहाते. शिल्लक रकमेतून धुमाळ कुटुंबीय टप्‍प्याटप्‍प्याने जमीन खरेदी करतात.

संपर्क - कैलास धुमाळ - ९७६७९७१५६१

 

Web Title: farmers success story