esakal | आधी शेतीपंपाची वीज जोडा, मग बीले भरु
sakal

बोलून बातमी शोधा

Agriculture

वीज तोडण्यासाठी आलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांचा विरोध

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सुपे : वीज बीले द्या. मुदतीत भरतो. पण आधी न कळवता खंडीत केलेली वीज चालू करा. तो पर्यत आम्ही येथून हलणार नाही. अशी भूमिका बारामती तालुक्यातील सुपे परिसरातील शेतकऱ्यांनी वीज कार्यालयापुढे केलेल्या ठिय्या आंदोलनावेळी घेतली आहे. आज सायंकाळपर्यंत यावर तोडगा निघाला नव्हता.

वीज कंपनीने सुपे परिसरातील शेती पंपाची वीज शेतकऱ्यांना न कळवता बुधवारी सायंकाळपासून खंडीत केल्याच्या निशेधार्त गुरूवारी शेतकऱ्यांनी सुपे वीज मंडळ कार्यालयाच्या गेट समोर ठिय्या आंदोलन सुरू केले. मार्च पासून बीले दिलीच नाहीत तर भरणार कसे. न सांगता वीज तोडली, न सांगता वीज जोडा. बीले द्या, भरतो. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा पवित्रा आंदोलक शेतकऱ्यांनी घेतला. दरम्यान, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (Pune news)

हेही वाचा: शेतकऱ्यांकडे 6775 कोटींची थकबाकी अन् 425 कोटींची वसूली

वीजे अभावी हातातोंडाशी आलेली पीके जळून नुकसान होईल. म्हणून आधी शेतीपंपाचा वीज पुरवठा सुरळीत करा. बीले द्या. बीले मिळालीच नाहीत तर भरणार कसे. जे शेतकरी बीले भरतील त्यांचा वीज पुरवठा चालू ठेवा. बीले भरणार नाहीत त्यांची वीज तोडा. दोन-चार दिवस असेच गेले तर पाण्याअभावी पीके जळून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होईल. अशी प्रतिक्रिया पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी प्रशासक दिलीप खैरे, बारामती बाजार समितीचे माजी संचालक पोपट खैरे यांच्यासह काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा: बिबट्यांचा सुळसुळाट; तरुणांनी घेतला आक्रमक पवित्रा

दरम्यान, वीज मंडळाच्या सोमेश्वर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता सचिन म्हेत्रे म्हणाले - सिंगल फेज चालू आहे. थकबाकीमुळे शेती पंपाची वीज खंडीत केली आहे. मार्चपासून बीलांबाबत संदेश दिले आहेत. सुमारे ८० टक्के बीले दिली आहेत. उर्वरित बीलांचे वाटप चालू आहे. शेतकऱ्यांनी वीज बीलापोटी काही रक्कम भरावी त्यानंतर वीज तातडीने जोडली जाईल.

हेही वाचा: पुण्यातील महत्वाकांक्षी रिंग रोड व्यवहार्य आहे का?- हायकोर्ट

सुपे परिसरातील २४९ पैकी २०० रोहीत्राची वीज थकबाकीमुळे खंडीत केल्याचे म्हेत्रे यांनी सांगितले. ते म्हणाले - सोमेश्वर उपविभागांतर्गत सुमारे साडेचौदा हजार ग्राहक आहेत. सप्टेंबर २०२० अखेर सुमारे १०८ कोटी थकबाकी आहे. सवलतीच्या धोरणानुसार एकूण ८६ कोटींपेक्षा अधिक थकबाकी आहे. आतापर्यंत सुमारे १५ कोटींची वसुली झाली आहे. सुपे परिसरात सुमारे चार हजार ग्राहक आहेत.

loading image
go to top