कवडीमोल टोमॅटोचा शेतातच केला 'लाल चिखल'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

ही कृती कोसळलेल्या बाजारभावाने शेतकऱ्यांच्या मानसिकतेत होणाऱ्या बदलाचे प्रतीक दर्शविणारी ठरली आहे. टोमॅटो पिकाला सद्य:स्थितीत प्रतिकिलोला केवळ दोन ते तीन रुपये बाजारभाव मिळत आहे. कांद्यापाठोपाठ आता टोमॅटो उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे.

गुनाट : रात्रंदिवस काबाडकष्ट करून जिवापाड जपलेल्या टोमॅटो पिकाला व्यापाऱ्यांना कवडीमोल बाजारभावाने विकण्यापेक्षा शेतातच गाडले तर काय वाईट, या विचाराने न्हावरे (ता. शिरूर) येथील एका शेतकऱ्याने आपल्या टोमॅटो पिकात रोटर फिरवला.

संबंधित शेतकऱ्याची ही कृती कोसळलेल्या बाजारभावाने शेतकऱ्यांच्या मानसिकतेत होणाऱ्या बदलाचे प्रतीक दर्शविणारी ठरली आहे. टोमॅटो पिकाला सद्य:स्थितीत प्रतिकिलोला केवळ दोन ते तीन रुपये बाजारभाव मिळत आहे. कांद्यापाठोपाठ आता टोमॅटो उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे.

गुनाट-न्हावरे शिवेवर सागर साठे या शेतकऱ्याने टोमॅटो पीक पाऊण एकर क्षेत्रावर घेतले होते. शेतीची मशागत, रोपे, औषध फवारणी, मजुरी असा जवळपास पस्तीस ते चाळीस हजार रुपये खर्चही केला. फळांची धारणाही चांगल्या प्रतीची झाल्यावर आता दोन पैसे हाती येतील, अशी साठे कुटुंबीयांना आशा होती. परंतु त्याच वेळी टोमॅटोचे भाव कोसळले. मालाची प्रत चांगल्या दर्जाची असतानाही बाजारात व्यापारी वर्ग किलोला दोन ते तीन रुपये खरेदीनेच माल घेत आहेत. कवडीमोल बाजारभावाने या शेतकऱ्याचे कष्ट मातीमोल झाले. त्यामुळे बाजारभावाअभावी साठे यांनी आपल्या टोमॅटो पिकात रोटर फिरवण्याचा निर्णय घेतला.

या संदर्भात सागर साठे यांनी सांगितले, ""व्यापारी किलोला दोन ते तीन रुपये बाजारभावाने टोमॅटो खरेदी करत आहे. परंतु हाच माल ग्राहकांना दहा ते पंधरा रुपये किलोने विकला जात आहे. बाजारभावातील या फरकावर कोणाचेही नियंत्रण नाही. शेतीमालाची किंमत ठरवण्याचे अधिकार शेतकऱ्यांना नसल्यानेच आजचा शेतकरी आणि शेती अधोगतीला जात आहे.''

Web Title: frustrated farmer crushes tomato crop in the field