अल्पभूधारक तायडेंनी वाढविली प्रयोगांतून पीक उत्पादकता

गोपाल हागे
मंगळवार, 23 मे 2017

बुलडाणा जिल्ह्यातील अंभोडा येथील गणेश तायडे यांची केवळ साडेचार एकर शेती आहे. मात्र कमी क्षेत्रात अधिक उत्पादन हीच त्यांच्या कामाची ताकद आहे. सोयाबीन, तूर, हरभरा या पिकांत ते माहीर आहेत. नव्या वाणांची निवड, व्यवस्थापनातील बारकावे वापरत सोयाबीनचे एकरी १६ ते १८ क्विंटलपर्यंत उत्पादन ते घेतात. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठीही त्यांना बोलावले जाते. 

अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या वाढत 
चालल्याने तेवढ्याच क्षेत्रातून अधिक उत्पादन घेणे वा जमिनीची उत्पादकता वाढविणे गरजेचे झाले आहे. शासनानेही उन्नत शेती-समृद्ध शेतकरी अभियान हाती घेतले आहे. यात शेतकऱ्यांना नवे तंत्र, यंत्र, वाण आदी विविध बाबी शिकवल्या जाणार आहेत. अंभोडा (ता. जि. बुलडाणा) येथील गणेश किसन तायडे यांनी गेल्या काही वर्षांपासून सातत्यपूर्ण प्रयत्न व प्रयोगशीलता यांच्या जोरावर खरीप व रब्बी पिकांची उत्पादकता वाढविण्यात यश मिळवले आहे.

सोयाबीनची प्रयोगशीलता 
तायडे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांची साडेचार एकर शेती आहे. हंगामी स्वरूपाची सिंचन क्षमता असल्याने आर्थिक नियोजन मुख्य खरिपावरच अवलंबून असते. बुलडाणा तेरा तालुक्‍यांचा जिल्हा असून अर्ध्या जिल्ह्याची पीकपद्धती तायडे यांच्यासारखीच आहे. प्रामुख्याने घाटावरील तालुक्‍यांचे तसेच बुलडाणा तालुक्‍याचे हेच मुख्य पीक अाहे. तालुक्‍याची सोयाबीन उत्पादकता हेक्‍टरी १२४५ किलो एवढी आहे. यंदा ही उत्पादकता १४९४ किलोपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाचे आहे. परंतु तायडे यांनी उत्पादकतेची ही आकडेवारी हेक्‍टरी नव्हे तर एकरात साधली. 

 प्रयोगातून मिळाली दिशा 
पूर्वी अतिपावसामुळे पीक घेण्यास अडचणी आल्या होत्या. त्यावेळी अवघी १० ते १५ गुंठे जमीन लागवडीसाठी लायक होती. एवढ्या कमी जागेत कुठले पीक येईल हे सुचत नव्हते. सहज म्हणून १० गुंठ्यांत टोकण पद्धतीने सोयाबीन घेतले. चार क्विंटल ६० किलो उत्पादन आले होते, तेव्हापासून  टोकण पद्धतीनेच लागवड होते. हरभऱ्यातही तसाच वापर होतो.  या भागात सर्वसाधारण शेतकऱ्यांचे सोयाबीनचे उत्पादन आठ ते दहा क्विंटल आहे. त्या तुलनेत तायडे यांचे उत्पादन जवळपास दीडपट ते दुपटीने आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी दीड एकरात सोयाबीन व आंतरपीक तूर घेतली. दीड एकरात २० क्विंटल सोयाबीन झाले. दरांबाबत मात्र ते समाधानी नाहीत. 

यंदा सोयाबीनला क्विंटलला २७०० रुपयांपर्यंतच दर मिळाला. यंदा पाऊस जास्त झाल्याने तुरीचे नुकसान झाले. सोयाबीनचा एकरी खर्च सुमारे १० हजार रुपयांपर्यंत असतो. 

हरभराही उल्लेखनीय 
 हरभरा उत्पादनातही तायडे यांनी हातखंडा मिळवला आहे. एकरी दहा क्विंटलपर्यंत सरासरी उत्पादकता टिकवली आहे. यावर्षी विराट व डॉलर या वाणांची लागवड केली. दोन्हींचे एकरी तेवढेच उत्पादन घेतले. विराटची क्विंटलला ९५०० रुपये दराने विक्री केली. डॉलर हरभऱ्याला ११ हजार रुपये दर मिळाला. विशेष म्हणजे व्यापारी जागेवरूनच खरेदी करून नेतात. 

दर तिसऱ्या वर्षी माती परीक्षण करून त्यानुसारच खत नियोजन करतात. शिवाय तिसऱ्या वर्षी शेणखत टाकतात. एकरी- १० ते १५ गाड्या, तीन जनावरे सोयाबीन व तूर असे पीक तर रब्बीमध्ये हरभरा, मका लागवड करतात. अवघे बारावीपर्यंत शिकलेल्या या माणसाने दोन्ही मुले मात्र उच्चशिक्षित केली आहेत. मोठा मुलगा एमएस्सी झाला तर दुसरा बीएस्सी करीत आहे. 

बैल संगोपनाचा व्यवसाय 
पूरक व्यवसाय म्हणून तायडे जनावरे संगोपन करतात. लहान वयाचे गोऱ्हे विकत आणतात. दोन ते अडीच वर्षे त्यांचे संगोपन केले की बैलजोडी तयार होते. आठ नऊ हजारांत आणलेले गोऱ्हे जेव्हा बैल बनतात तेव्हा ते पाचपट तरी पैसे अधिक मिळवून देतात. यातून कुटुंबाच्या अर्थकारणाला हातभार लागतो. 

सध्या सोयाबीन वाणात बदल आवश्‍यक झाला आहे. पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करावी. खतांचा वापर करण्यापूर्वी माती परीक्षण करावे. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर व्हावा. उगवणक्षमतेवर आधारित बियाण्याचे प्रमाण ठेवावे. तायडे, येवले याच प्रकारे अनेक वर्षांपासून शेती करीत असल्याने एकरी उत्पादकता वाढविण्यात त्यांना यश मिळाले आहे. त्यांची प्रयोगशीलता इतरांसाठी प्रेरक अाहे. 
- डॉ. सी. पी. जायभाये, कृषी विद्यापीठ संशोधन केंद्र, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र बुलडाणा 

येवले यांची प्रयोगशीलता 
चिखली तालुक्यातील हरिभाऊ येवले यांनीही मागील तीन वर्षांत सोयाबीनची उत्पादकता वाढवून ती टिकवण्यात यश मिळवले अाहे. सुमारे १८ एकरांत सोयाबीन-तूर ते घेतात. प्रयोग म्हणून पाच एकरांत बीबीएफ (रुंद वरंबा सरी) पद्धतीने सोयाबीन घेतात. यामुळे बियाणे एकरी १३ किलोपर्यंत लागते. चार अोळी सोयाबीन व त्यानंतर एक अोळ तुरीची असते. एकरी १३ क्विंटलपर्यंत सोयाबीन तर सहा ते साडेसहा क्विंटल तुरीचे उत्पादन त्यांना मिळते. पेरणीसोबतच सूक्ष्म अन्नद्रव्य, रासायनिक खते व सल्फर यांची मात्रा ते देतात. 
  : हरिभाऊ येवले, ८२७५२३३२६५.    

पीक व्यवस्थापनातील बाबी 
जमीन मध्यम, पेरणीलायक पाऊस झाला की टोकण पद्धतीने सोयाबीन लावतात. 
दोन अोळीतील अंतर दीड फूट तर दोन झाडांमध्ये एक फूट अंतर ठेवतात. 
टोकण करताना एका ठिकाणी तीन ते चार दाणे टाकतात.  दरवर्षी सुमारे दोन एकरात सोयाबीन असते. 

टोकण केल्याने एकरी सुमारे १२ किलो बियाणे वापरतात. सर्वसाधारण पद्धतीत एकरी २५ ते ३० किलो बियाणे लागते. म्हणजे टोकण पद्धतीत ते अर्ध्यापेक्षा कमी लागते.

एकरात लागवडीच्या अंतरानुसार २२ हजार ते २८ हजारांपर्यंत झाडांची संख्या राहते. 

पीक संरक्षण- फवारणी- लावणीनंतर रसशोषक किडीच्या प्रतिबंधासाठी पहिली 
 दुसरी-३० ते ३५ दिवसांनतर, तिसरी- ४५ दिवसानंतर, यात कीटकनाशक व बुरशीनाशक अशा दोन्हींचा वापर.
यामुळे पीक निकोप राहून चांगली फुले व शेंगांची धारणा होण्यास मदत होते. 
बीजप्रक्रिया करतात. 
काही क्षेत्रात सोयाबीनच्या पाच ओळीनंतर सहावी अोळ तुरीची असते. टोकण केल्याने तुरीच्या झाडांना मोकळी हवा मिळते. झाडांची वाढ झाल्यावर शेंडे खुडणी, खत व्यवस्थापन होते. 

आंतरमशागतीसाठी कृषी विज्ञान केंद्राने विकसित केलेले मानवचलित कोळपे, विळे व 
अन्य यंत्राचा वापर.

Web Title: Ganesh Tayde story