धांडे यांनी तयार केली आले पिकात अोळख

गोपाल हागे 
शनिवार, 13 मे 2017

येसापूर (जि. बुलडाणा) येथील प्रकाश रामेश्वर धांडे यांनी गेल्या सात वर्षांपासून आले पिकात आपली अोळख तयार केली आहे. दर्जेदार बियाणे तयार करून त्याची विक्री करण्यावर त्यांचा भर असतो. दुष्काळात अन्य हंगामी पिके जिथे अत्यंत कमी उत्पन्न देऊन गेली, तेथे आले पिकाने त्यांना आर्थिकदृष्ट्या समर्थ साथ दिली आहे. 

बुलडाणा जिल्ह्यातील खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर जगप्रसिद्ध आहे. याच तालुक्यातील येसापूर येथील रामेश्वर नारायण धांडे यांची १२ एकर शेती आहे. त्यांना प्रकाश व विठ्ठल ही दोन मुले. पैकी विठ्ठल मेहकर येथे कृषी सहायक आहेत. शेतीची मुख्य जबाबदारी प्रकाश पाहतात. कुटुंबाची शेती असून २००२ पर्यंत तशी कोरडवाहू होती. त्यानंतर शेतापासून दोन किलोमीटर अंतरावरील सुलतानपूर शिवारात एक विहीर विकत घेत तेथून जलवाहिनी शेतापर्यंत केली व जमीन अोलिताखाली अाणली. 

आले पिकातून बदल 
सन २०११ पर्यंत सोयाबीन, तूर, मूग, कापूस, मोसंबी, हरभरा, गहू ही पिके घेतली जायची. सन २००५ मध्ये दोन एकरात मोसंबी लागवड केली. सन २०१४ पर्यंत पाच बहार घेतले. बाग अत्यंत उत्तमपणे यायची; परंतु एकरी लाख रुपयांपेक्षा उत्पन्न राहत नसे. वेगळे नगदी पीक घेतले पाहिजे, असा विचार सुरू केला. विठ्ठल कृषी विभागात असल्याने त्यांचा अभ्यास होता. त्यांनी आले पीक सुचवले. 

त्यासाठी चांगले उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतांना भेट दिली. खानदेशमधील पाल कृषी विज्ञान केंद्र, कन्नड व चिखली परिसरातील शेतकऱ्यांचे अनुभव स्वतः पाहिले. निर्णय झाला. बेणे अाणले. अाले लागवडीला सुरवात झाली. 

पिकातील अनुभव 
सन २०१० मध्ये अाठ गुंठ्यांत पहिला प्रयोग केला. सुमारे १२ क्विंटल उत्पादन अाले. यापैकी ११ क्विंटल अाले विकले. उत्पन्नातून एक एकरासाठी ठिबकची सोय केली. पुढील वर्षी क्षेत्र ३० गुंठे केले. त्या वर्षी दर घसरले. परिणामी पीक वर्षभर जमिनीतच ठेवले. कधी बियाणे विक्री, तर कधी अकोला बाजारात विक्री असे अनुभव सुरू झाले; मात्र गेल्या सात वर्षांत नुकसानीचा अनुभव शक्यतो आला नाही. आज आले हेच धांडे यांचे मुख्य पीक झाले आहे. 

आल्यात मका ठरला फायदेशीर 
आल्यातील खर्च कमी व्हावा, यासाठी आॅगस्टच्या अखेरीस मक्याचे आंतरपीक घेतले जाते. पाच किलो बियाणे लावले तर २४ क्विंटल उत्पादन मिळते. त्याला हजार ते बाराशे रुपये प्रतिक्विंटल दर मिळतो. आले पिकाला सुमारे ५० ते ६० हजार रुपये एकरी खर्च येतो. त्यात किमान २० हजार रुपयांचा खर्च मका पीक कमी करते. शिवाय, त्यातून चारा मिळतो. उन्हाळ्यात आल्याला सावली म्हणूनही हे पीक उपयोगास येते. 

दुष्काळाने पाहिली परीक्षा 
दरांमध्ये दरवर्षी चढ-उतार होतात. धांडे यांचीही या पिकाने परीक्षा पाहिली. सन २०१३ नंतर दोन ते तीन वर्षे दुष्काळी परिस्थिती होती. यातील एके वर्षी सोयाबीन एकरी पोतेभरच आले; मात्र आल्याचे ९० क्विंटल उत्पादन मिळाले. शेतकऱ्यांनी ते पूर्ण बेण्यासाठी नेले. त्या वेळी ३२०० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाली. उत्पादनात सातत्य ठेवल्याने व दरवर्षी दर्जेदार बेणे तयार केल्याने विक्रीचा बहुतांश प्रश्न धांडे यांनी सोडवला आहे. व्यापारीदेखील जागेवरूनच खरेदी करतात. वाहतूक, व्यापारी, अडत यांचा कुठलाही पैसा लागत नाही. दुष्काळात आर्थिक परिस्थिती कायम टिकवण्यात आले पीक मदतीला आले. यंदाही हे पीक समाधानकारक आहे. एकरी उत्पादन किमान १४० क्विंटलपर्यंत साधता येईल, अशी अपेक्षा धांडे यांना आहे. 

आले पिकातील धांडे यांचे व्यवस्थापन 
-लागवडीसाठी उत्तम निचरा होणारी जमीन निवडतात. 
-दरवर्षी फेरपालट 
-लागवड करण्यापूर्वी एकरी चार ते पाच ट्रॉली कुजविलेले शेणखत टाकून बेणे तयार केले जातात. 
-ठिबक सिंचनाचा वापर 
-एकरी दहा क्विंटल बेणे वापरतात. 
-उत्तम उगवण होण्यासाठी लागवडीअाधी एक ते सव्वा महिनाअाधी काढणी करून चांगल्या सावलीत जमिनीत १.५ मीटर रुंद व एक मीटर खोल खड्डा करून त्यात तुराट्या लावून बेणे ठेवतात. एक महिन्यानंतर उत्तम अंकुर तयार होतात. या बेण्याची १०० टक्के उगवण होण्यास मदत होते. कूज लागत नाही. 
-लागवडीपूर्वी बेण्यास कार्बनडाझीम व क्लोरपायरीफॉस यांची प्रक्रिया. यामुळे कंद माशी व कूज रोखण्यास मदत. 
-लागवडीसाठी तीन बोटाच्या अाकाराचे दोन ते तीन शेंडे असलेले बेणे वापरतात. 
-अांतरमशागतीचा वाटाही अधिक. पीक दीड ते दोन महिन्यांचे झाल्यावर कंद उघडे पडले, की कंदमाशी लागते. कंदाचे पोषणही होत नाही. हे टाळण्यासाठी वेळेत भर दिली जातो. 

--पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे मोल-- 
लोणार तालुका कायम अवर्षणप्रवण भाग अाहे. दिवाळीनंतर पाण्याची टंचाई भासते. सन २००२ पर्यंत धांडे यांची शेती कोरडवाहू होती. त्या वेळी दोन किलोमीटर अंतरावरून जलवाहिनी टाकून पाणी अाणले. काही दिवस हे फायदेशीर ठरले. पुढे वीज भारनियमनामुळे अोलित करण्यात अडचणी येऊ लागल्या. यासाठी नवीन विहिरी खोदली. विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी साैरपंपाचा पर्याय निवडला. अटल कृषी सौर योजनेअंतर्गत पाच एचपी क्षमतेचा पंप बसविला. यावर अाता चार एकरांत ठिबकने सिंचन केले जाते. सन २०१४ पासून सलग तिसऱ्या वर्षीही पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. सन २०१५ मध्ये मार्च महिन्यांतर दीड तास पंप चालायचा. सन २०१६ मध्ये तर सुरवातीपासून पाणी कमी असल्याने केवळ अाल्याचे पीक घेता अाले. चालू वर्षी तर जानेवारीपासून पाणीपातळी झपाट्याने घसरत चालली अाहे. अाज दररोज एक ते दीड तास पंप चालतो. ठिबकच्या साह्याने पाणी दिले जाते. 

आले उत्पादन- दृष्टिक्षेपात 
सन क्षेत्र उत्पादन दर रु. (प्रतिक्विंटल) 
२०११ - ८ गुंठे ११ क्विंटल ४००० 
२०१५ २ एकर १६० क्विंटल ३८०० 
२०१६ १ एकर ९० क्विंटल ३२०० 

प्रकाश धांडे-- ९८८१८३४५८४ 

Web Title: Ginger farming agrowon