हरभरा-राजमा: पिकाची शेती आता खरिपातही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

हरभरा-राजमा पिकाची शेती आता खरिपातही

माळेगाव: अरे वा.. हरभरा, राजमा ही पिके फक्त ६० ते ७० दिवसांत घेता येतील आणि तीही सध्या चालू असलेल्या खरीप हंगामात! कोणालाही विश्वास बसणार नाही, परंतु हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने आशादायक चित्र वास्तवात उतरवले आहे,ते बारामती-माळेगाव खुर्द येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन या संस्थेने.

महाराष्ट्रातील शेतकरी हवामानाचा विचार करून वर्षानुवर्षे हरभरा व राजमा ही पिके रब्बी हंगामातच घेत असतात. परिणामी त्यावेळी मागणीपेक्षा अधिक उत्पादन मार्केटमध्ये आले की संबंधित शेतकऱ्यांना खर्चाच्या तुलनेत पुरेसे पैसे मिळत नाही. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी बारामती-माळेगाव खुर्द येथील अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेतील शास्त्रज्ञांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत खरीप हंगामात ही पिके घेऊन अधिकचे उत्पन्न मिळविण्याचा मार्ग शेतकऱ्यांना दाखविला आहे.

या कामी संस्थेचे संचालक डॉ. वहमांशु पाठक, जल ताण व्यवस्थापक प्रबंधक डॉ. जगदीश राणे, वॉटर ट्रेस मॅनेजमेंट शास्त्रज्ञ डॉ. एस. गुरुमूर्ती यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे.तसेच, स्थानिक शेतकरी व प्रतिभा शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष अशोकराव तावरे यांनी या प्रयोगाला मदत केली.

अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेच्या प्रायोगिक क्षेत्रावर १० जून रोजी हरभरा आणि राजमा पिकाची लागवड केली होती. हरभऱ्याच्या तब्बल ७४ वाणांची लागवड येथे केली. सरी वरंभ्यालगत या वाणाची लागवड केली असून, जमीन निचऱ्याची असल्याचे दिसून आले. पाणी व खत मात्र योग्य पद्धतीने दिल्याने खरिपात इतके यशस्वी येऊ शकते, याचे उत्तम उदाहरण येथे पाहावयास मिळते. तशीच उत्तम स्थिती राजमा पिकाकडे पाहिल्यानंतर दिसून येते. सध्या या पिकांच्या काढणीचे काम सुरू आहे.

माळेगावच्या राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेत यशस्वी प्रयोग

खरिपात हरभरा पीक घेण्याचे फायदे

  1. उसाबरोबर हरभरा आंतरपीक घेता येणार

  2. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी हिरवळीचे खत म्हणून उपयोगी

  3. खरीप हंगामात केवळ ६५ ते ७५ दिवसांत उत्पन्न घेता येते

  4. रब्बी हंगामात बियाणे म्हणून उत्पन्नाचा उपयोग होईल

  5. आॅफ सिझनमधील उत्पन्नाला चांगला दर मिळू शकतो

पश्चिम महाराष्ट्रात खरीप हंगामात साधारणतः ३० अंश सेल्सिअस तापमान असते, तसेच १५० ते २०० मि.मी. पाऊस झालेला असतो. अशा स्थितीत निचऱ्याची जमीन घेऊन हरभरा, राजमा पिकाची यशस्वी लागवड करण्यात यशस्वी झालो आहे. अद्याप या पिकांवर बरेचसे संशोधन करायचे बाकी आहे. पुढील वर्षअखेरीस या पिकांचे उर्वरित संशोधन पूर्णत्वाला येईल. त्यानंतर शेतकऱ्यांना आपापल्या शिवारात या प्रयोगास परवानगी दिली जाईल.

- डॉ. एस. गुरुमूर्ती, शास्त्रज्ञ

टॅग्स :agro businessrajma