कोरोनामुळे देशात लॉकडाऊन तरीही हापूस आंब्याची अशी झाली विक्री

कोरोनामुळे देशात लॉकडाऊन तरीही हापूस आंब्याची अशी झाली विक्री

ऐन हापूस हंगाम सुरू होतानाच कोरोनामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले. मोठे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील प्रताप गावस्कर या आंबा बागायतदाराने आपले यापूर्वी तयार केलेले ग्राहकांचे नेटवर्क उपयोगात आणले. त्याद्वारे मुंबईतील उपनगरे, कोल्हापूर, सातारा अशा विविध भागांमधून स्वतःकडील आंब्यासह ८ ते १० सहकाऱ्यांचा मिळून सुमारे सातशे पेटी हापूस आंब्याची थेट विक्री करीत संकटातही संधी तयार करण्यात यश मिळवले आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी तालुक्याचे अर्थकारण आंबा आणि मत्स्योत्पादनावर अवलंबून आहे. यावर्षी अतिवृष्टी, त्यानंतर क्यार वादळाचा तडाखा आणि सतत वातावरणातील बदल यामुळे आंबा उत्पादन ३० ते ४० टक्क्याने घटले. याशिवाय दरवर्षी फेब्रुवारी अखेरीस सुरू होणारा नैसर्गिक आंबा हंगाम एक महिना लांबणीवर गेला. उत्पादन कमी होत असल्यामुळे यावर्षी चांगला दर मिळेल अशी बागायतदारांना अपेक्षा होती. यंदा १५ मार्चनंतर आंबा हंगाम खऱ्या अर्थाने सुरू झाला. 

दरम्यान देशात कोरोना विषाणूचा प्रसार व्हायला सुरुवात झाली. २२ मार्चपासून देशात लॉकडाऊन सुरू झाले. अचानक ओढवलेल्या संकटामुळे आंबा बागायतदार हवालदिल झाले. काय करावे हे सुचेना. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

वेंगुर्ला येथील आंबा बागायतदार प्रताप गावस्कर यांची ४५० झाडे आहेत. गेल्या सात ते आठ वर्षांपासून त्यांनी मुंबई तसेच राज्यातील अन्य भागांत ग्राहकांचे नेटवर्क तयार केले आहे. याच ग्राहकांची मदत यंदाच्या संकटातही घेत थेट आंबा विक्री करण्याचा निर्णय घेतला. 

शासनाने आंबा वाहतुकीला परवाने देताच मुंबई शहरात उपनगरांमधील निवासी सोसायट्यांमधील ग्राहकांशी मोबाईलवरून संपर्क साधण्यास सुरुवात केली. ग्राहकांच्या मागणीनुसार टेम्पोतून  गोरेगाव, डोंबिवली, कल्याण, ठाणे, बेळगाव, कोल्हापूर, सातारा या शहरांमध्ये माल नेऊन थेट विक्री करण्यास सुरुवात केली. आठवड्यातून दोन ते तीनदा माल भरून नेला जातो. 

अशी झाली विक्री 
प्रति पाच डझनाची पेटी गृहित धरली तर त्यास अडीच हजार ते तीन हजार रुपये दर मिळाला. त्यावेळी वाशी मार्केटमध्ये दीडहजार रुपये दर सुरू होता. सर्व शहरांमधून गेल्या सहा आठवड्यात सातशे पेट्यांपर्यंत मालाची विक्री झाली आहे. गावस्कर यांनी आपल्यासोबत भागातील ८ ते १०  छोट्या बागायतदारांचा मालही नेण्याचा प्रयत्न करीत त्यांना चांगला दर मिळवून दिला. आजूबाजूला अनेक बागायतदार आंबा विक्रीचे प्रयत्न करीत असताना गावसकर यांनी आपल्या बागेतील बहुतांशी आंब्याची दीडपट दराने विक्री करण्याचा प्रयत्न केला. दरवर्षीच्या ग्राहकांनी अजून काही ग्राहक मिळवून देण्यात मदत केल्याचे गावस्कर यांनी सांगितले. शक्यतो समूह स्वरूपात म्हणजे बल्कमध्येच ऑर्डर घेण्याचा प्रयत्न केला. 

लॉकडाऊनमुळे सगळे वातावरण बदलून गेले होते. आंबा वाहतूक करताना अनेक अडचणी येत होत्या. अनेक संकटाना सामोरे जावे लागले. परंतु अथक परिश्रम केल्यानंतर आंब्याला चांगला दर मिळवणे आम्हांला शक्य झाले. भविष्यात देखील थेट ग्राहक हा आमच्यासाठी चांगला पर्याय असणार आहे. यंदा गोवा, बंगळूर आदी भागांमधूनही माझ्या आंब्याला मागणी आली होती. मात्र संचारबंदीमुळे पुरवठा करणे शक्य झाले नाही. 

प्रताप गावस्कर- ७२१९३७७९०८ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com