शेतकऱ्यांनी विकला पावणे आठ कोटींचा भाजीपाला 

शेतकऱ्यांनी विकला पावणे आठ कोटींचा भाजीपाला 

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून, तुम्ही फक्‍त लढ म्हणा !` सुप्रसिद्ध कवी कै.. कुसुमाग्रज यांच्या कवितेतील या ओळी सध्या शेतकरी खऱ्या ठरवून दाखविताना दिसत आहे. कोरोना व लॉकडाऊन संकटामुळे असंख्य अडचणी त्याच्या समोर उभ्या ठाकल्या आहेत. याचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. काढणीस आलेला शेतमाल कुठे व कसा विकायचा हा पेच उभा राहिला. हळूहळू शेतकरी थेट विक्रीसाठी पुढे येऊ लागले. याला कृषी विभाग व यंत्रणांनी साथ दिल्याने हा उपक्रम यशस्वी ठरू लागला. यातून शेतकऱ्यांचा उत्साह वाढलाच. शिवाय मध्यस्थांची साखळी तोडता येते हे आत्मबळ अधिक सुखावणारे ठरले. आपत्तीत शेतकऱ्यांनी संधी शोधत त्याचे रूपांतर इष्टापत्तीत केले. थेट ग्राहकांपर्यंत भाजीपाला, फळे पोचविण्याची साखळी त्यातून विकसित झाली. 

पावणे आठ कोटींची उलाढाल 
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’मार्फत जे शेतकरी गट स्थापन करण्यात आले त्यांनी शहरांत, मोठ्या गावात ताजा भाजीपाला वाजवी दरात आणि घरपोच देण्यासाठी पुढाकार घेतला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ व त्यांच्या पथकाने ठिकठिकाणी त्याचे नियोजन केले. सुरुवातीच्या टप्प्यात शेतकऱ्यांना विक्रीसाठी अडचणी आल्या. मात्र प्रशासनाने ‘पास’ उपलब्ध करून दिले. जिल्ह्यात व परराज्यातही माल पाठवणे सुरु ठेवले. जिल्ह्यात आजमितीला भाजीपाला उत्पादन करणारे सुमारे ६९ शेतकरी गट आहेत. 

या गटांनी ९३ ठिकाणी थेट विक्री केंद्रे सुरु केली. तब्बल ५१४ मे. टन भाजीपाला व फळे यांची विक्री त्यांनी साध्य केली. त्यातून सुमारे ७ कोटी ७१ लाख रुपयांची उलाढाल झाली. 

- कोरोनाशी संबंधित पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कमिशन वाचले 
राज्यात भाजीपाला नियमन व अडतमुक्त करण्याची घोषणा झालेली असली तरी व्यापारी वेगवेगळ्या नावाखाली शेतकऱ्यांकडून ठरावीक रक्कम कपात करतात ही वस्तुस्थिती आहे. हमाली, तोलाई, कटती हे प्रकार सुरुच आहेत. थेट विक्रीमुळे या खर्चात बचत झाली. आपण स्वतः विपणन (मार्केटिंग) करून मालाची विक्री करू शकतो हा आत्मविश्वास आला. 

सोशल मीडियाचा वापर
भाजीपाला, फळांचे मार्केटिंग करण्यासाठी सोशल मीडिया (प्रामुख्याने व्हॉटस ॲप) ची मदत झाली. शेतकऱ्यांनी आपल्या विक्री केंद्रांमार्फत मोबाईलद्वारे ऑर्डर घेण्यास सुरुवात केली. त्यानुसार  मालाचे पॅकिंग करून ग्राहकांना घरपोच माल पुरविणे सुरु केले. यामध्ये अर्थातच किमान अंतर राखणे, सॅनिटायझर वापरणे, शक्यतो ऑनलाइन पेमेंट स्वीकारणे यासारख्या उपायांचा वापर केला. गावात वा शहरातही मोक्याच्या जागी शेतकरी आपला माल घेऊन थांबायचे. अत्यंत स्वच्छ, ताजा म्हणजेच थेट शेतातून आलेला माल असल्याने ग्राहकांकडून चांगली पसंती मिळाली. दरही अत्यंत वाजवी होते. अमरावती विभागात अकोला हा या कामी सर्वाधिक उलाढाल करणारा जिल्हा ठरला. 

शेतमालाचे वितरण 
सर्व माल बॉक्स अथवा बॅगेतून पुरविण्यात आला. लॉकडाऊन काळातील शिथिल कालावधीत सकाळी आठ ते बारा या वेळेतच मालाचे वितरण करण्यात येत होते. किमान १०० रुपये किमतीचा माल ग्राहकाने नोंदविणे आवश्यक होते. विकत घेतलेल्या उत्पादनाचे पैसे डिलिव्हरीच्या वेळी रोख किंवा ॲपद्वारे ग्राहकाने करावे अशी अपेक्षा होते. 

तालुकानिहाय शेतकरी गटांनी केलेले उत्पादन 
तालुका गट संख्या विक्री केंद्र टन 
अकोला ५३ २६ ९२.२० 

मूर्तिजापूर ४१ १० ७८.५० 
बार्शीटाकळी ४३ १४ ६३.२० 
अकोट ७ १५ ७५.६० 
तेल्हारा ३६ १४ ६९.८५ 
पातूर ४० ११ ६९.६० 
बाळापूर ३८ १४ ६४.८५ 
एकूण २५८ १०४ ५१४ मे. टन 

प्रातिनिधीक दर 

भाजीपाला दर प्रति किलो 
कांदा २० रू. 
बटाटा ३५ रू. 
काकडी ३० रू. 
लसूण ४० रुपये पाव किलो 

पालेभाज्या प्रति जुडी दर 
मेथी १५ रु.. 
पालक १५ रू. 
कोथिंबीर २० रू. 

आमच्या शेतकरी गटाने दररोज ग्राहकांपर्यंत ताजा भाजीपाला, कलिंगड, खरबूज, संत्री ही फळे पोचविली. हा अनुभव पहिल्यांदाच घेतला. सुरुवातीला घडी बसण्याला वेळ लागला. आता ग्राहकांना शेतकऱ्यांचा माल असल्याची खात्री पटल्याने दररोज ऑर्डर मिळत आहेत. यंदा ग्राहकांना कोकणचा हापूसही पुरवीत आहे. पाचशे डझनाची ऑर्डर मिळाली. थेट शेतमाल विक्रीच्या अनुभवामुळे मार्केटिंगची ओळख व महत्त्व समजले. 
-प्रफुल्ल फाले, शेतकरी, मासा ता. जि. अकोला 


जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी कृषी विभाग, आत्माच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत नियोजन केले. शेतकरी व भाजीपाला उपलब्धतेचा आढावा घेतला. त्यानुसार विक्रीचे नियोजन केले. लॉकडाऊनच्या काळात शेतमाल विक्रीचे हे मॉडेल यशस्वी झाले. पालकमंत्री, जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधींनी या उपक्रमाला पाठबळ दिले. 
- मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला 
संपर्क- ९४२३१७६०९५ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com