उष्णतेत वाढ होण्याचा अंदाज

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

मराठवाड्याच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. सध्या पहाटे गारवा तयार होत आहे. परिणामी, किमान तापमानात किंचित घट झाली आहे. 

पुणे : मराठवाडा ते लक्षद्वीपच्या दरम्यान कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस वातावरणात दमटपणा तयार होऊन उष्णतेत वाढ होण्याचा अंदाज पुणे हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. 

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागांत व विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. मराठवाड्याच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. सध्या पहाटे गारवा तयार होत आहे. परिणामी, किमान तापमानात किंचित घट झाली आहे. 

गेल्या आठवड्यापासून राज्यात असलेली उष्णतेची लाट ओसरल्यामुळे कमाल तापमानात किंचित घट झाली आहे. गेल्या चोवीस तासांत वातावरण कोरडे होते. सध्या महाराठवाडा ते लक्षद्वीपच्या दरम्यान असलेले कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्राकडे सरकत अाहे. हे कमी दाबाचे क्षेत्र कर्नाटकाच्या अंतर्गत भागात असून, ते समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे.

तसेच पंजाब ते मणिपूर, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालच्या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचे चक्राकार वाऱ्यामध्ये रूपांतर झाले असून, परिणामी बिहार, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. हे क्षेत्र समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे.

Web Title: Heat wave in Maharashtra to increase