ह्युमनाइज मिल्क - नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान

गाईंच्या आहार व्यवस्थापनातून गुणवत्तापूर्ण दूधनिर्मिती शक्य आहे.
गाईंच्या आहार व्यवस्थापनातून गुणवत्तापूर्ण दूधनिर्मिती शक्य आहे.

गाई, म्हशींच्या आहारात योग्य तो बदल करून दुधातील फॅट व त्यातील स्निग्धाम्ले, एसएनएफ आणि त्यातील प्रथिने, खनिज घटकांचे प्रमाण काही प्रमाणात बदलून मानवीय दुधाच्या जवळ जाणारे गुणधर्म असलेले दूध बनविणे हे पशुआहार व व्यवस्थापन शास्त्रातील नवीन आव्हान आहे. तज्ज्ञांचे त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत.

पशुपालकांना मिळणारी दुधाची किंमत ही सध्या मिळत असलेल्या फॅट आणि एसएनएफवर अवलंबून असते. यासोबतच काही संस्था दुधामधील जिवाणू, विषारी पदार्थ, दुधामधील खनिजे, जास्त काळ टिकण्याची क्षमता, प्रतिजैविकेमुक्त दूध, दुधापासून विविध उपपदार्थ बनविण्यासाठी लागणारी गुणवत्ता इत्यादी पातळ्यांवर दुधाची प्रत नियंत्रित करणाऱ्या दूध उत्पादकांना वाढीव दर देत आहेत. दुधातील फॅटसोबतच एसएनएफमध्ये प्रोटीन (केसिन), ग्लुकोज (लॅक्टोज), खनिजे इत्यादी घटक असतात. साहजिकच, पशूपालकांचे सर्व लक्ष हे दुधातील फॅट व एसएनएफ वाढविण्याकडेच असते.  

सध्याच्या काळात लोकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढीला लागली आहे. लोक विशिष्ट जीवनशैलीबाबत काळजी घेताना दिसतात. विशेषतः शहरी व निमशहरी भागांमध्ये हा कल जास्त आहे. गाय किंवा म्हशीचे दूध हा आज आहारातील एक घटक आहे. परंतु, दुधामधील फॅटच्या चवीने दुधाचा ग्लास अर्धवट ठेवणारी लहान मुले, दूध पिऊ नका, असे सांगणारे आहारतज्ज्ञ व इतर माध्यमातून मिळणाऱ्या माहितीमुळे आज जीवनशैलीचा एक भाग म्हणून रोज दूध पिणे ही सवय अजून त्या प्रमाणात अंगीकारली जात नाही. 

बाजारपेठेच्या मागणीनुसार दुधाची गुणवत्ता 
    गाई, म्हशींच्या आहारात योग्य तो बदल करून दुधातील फॅट आणि त्यातील स्निग्धाम्ले, एसएनएफ आणि त्यातील प्रथिने, खनिज घटकांचे प्रमाण काही प्रमाणात बदलून मानवीय दुधाच्या जवळ जाणारे गुणधर्म असलेले दूध बनविणे हे पशुआहार व व्यवस्थापन शास्त्रातील नवीन आव्हान आहे. तज्ज्ञांच्या त्यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. या संशोधनातून मानवीय दुधाला मिळतेजुळते किंवा उपचारात्मक गुणधर्म असलेले दूध उत्पादन करून त्यायोगे पशूपालकांना ब्रॅंडिंगसाठी एक नवीन क्षेत्र उपलब्ध होईल. आर्थिक फायदा होऊ शकेल. 

    सर्व उपलब्ध खाद्यपदार्थांमध्ये दूध हे नैसर्गिक पूर्णान्न आहे जे स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्त्वे व खनिजे यांचा स्रोत आहे. दूध हा कॅल्शियमचा नैसर्गिक स्रोत आहे, जो हाडांची झीज होऊन होण्याऱ्या आजारांपासून बचाव करतो. तसेच मुलांची योग्य वाढ होण्यासाठी दुधातील घटक मदत करतात.

    मानवीय गुणधर्म असलेल्या दुधामध्ये १० टक्क्यांपेक्षा कमी बहुअसंतृप्त स्निग्धाम्ले, ८ टक्क्यांपेक्षा कमी संतृप्त स्निग्धाम्ले, ८२ टक्क्यांपेक्षा जास्त एकलसंतृप्त स्निग्धाम्ले आणि प्रथिने ३.३३ टक्क्यांपेक्षा जास्त तसेच खनिजांमधेही सेलेनियमसारखे घटक असावेत. 

    पशूपालकांचे लक्ष हे जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गाई, म्हशी विकत घेण्याकडे किंवा अशा कालवडी आपल्या गोठ्यात तयार करण्याकडे असते. याबरोबरच दुधातील फॅट व एसएनएफ वगळता इतर घटकांनादेखील महत्त्व दिले पाहिजे. याविषयी जागरूकता करणे गरजेचे आहे. उदा. दुधातील प्रथिनांमधे मुखत्वे २० प्रकारची अमिनो आम्ले असतात जसे की, अर्जीनीन, मिथिओनिन, लायसीन, प्रोलीन इत्यादी. दुधातील फॅटमध्ये मुख्यत्वे किमान १२ प्रकारची स्निग्धाम्ले जसे की पामिटीक, ब्यूटायरिक, लाऊरिक, स्टीअरिक, संयुग्मित लीनोलेनिक आम्ल असतात. 

    मानवीय गुणधर्म असलेल्या दूधनिर्मितीच्या दृष्टीने प्रयत्न करण्याबरोबरच जनावरांचे आरोग्य, स्वच्छ व शुद्ध दूध उत्पादन, संतुलित आहार व पाणी व्यवस्थापन, जनावरांचा कल्याणकारी सांभाळ, पोषक वातावरण या गोष्टींसुद्धा व्यवस्थापनदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत.  

    पशुआहाराचे व्यवस्थापन दुधातील फॅट, एसएनएफ आणि एकूण उत्पादन यावर सर्वाधिक परिणाम करते. पशु हारातील ऊर्जा ही प्रथिनांच्या बरोबरीने महत्त्वाची आहे.

    कोठीपोटामधील जिवाणू व आदिजीव, खाद्यघटकांचे तीन प्रकारच्या अस्थिर स्निग्धम्लामध्ये रूपांतर करतात. त्यामध्ये प्रोपिओनिक आम्ल तयार झाल्यास दुधातील प्रथिने व दुधाचे प्रमाण वाढते, असीटिक आम्ल तयार झाल्यास दुधातील फॅटचे प्रमाण वाढते, तर ब्यूटायरिक आम्ल तयार झाल्यास कीटोन नावाचा घटक वाढतो. या रचनेचा अभ्यास करून गाई, म्हशींच्या खाद्यात योग्य ते पूरक घटक वापरून दुधातील त्यांचे प्रमाण बदलणे शक्य असते.

    दुग्धजैवतंत्रज्ञान या विषयाअंतर्गत पशुआहारात योग्य बदल करून मनुष्य शरीराला पोषक व योग्य घटक, कमी फॅट तसेच फॅटअंतर्गत जास्त आरोग्यदायी स्निग्धाम्ले, संयुग्मित लीनोलेनिक आम्ल, ओमेगा ३ , ६ व  ९ स्निग्धाम्ले, जास्त प्रथिने, कमी लॅक्टोज असणाऱ्या मानवीय दुधाला साधर्म्य असणारे दूध तयार करण्यासाठी गरजेचे आहे.
- डॉ. पराग घोगळे, ९८९२०९९९६९ 
(लेखक पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार आहेत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com