खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र

खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र

खपली गव्हाच्या सुधारित रोग प्रतिकारक जाती, योग्य तंत्राचा वापर केल्यास  उत्पादन वाढविणे  शक्य आहे. खपली गव्हाच्या एम.ए.सी.एस. २९७१, डीडीके १०२५, डीडीके १०२९ आणि एच. डब्लू १०९८ या अधिक उत्पादन देणाऱ्या जातींची निवड करावी.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  

भारतामध्ये सरबती (Triticum aestivum), बन्सी (Triticum durum), व खपली (Triticum dicoccum) या तीन प्रकारच्या गव्हाची लागवड होते. त्यातील ९५ टक्के वाटा सरबती गव्हाचा असला तरी पोषकतेमुळे खपली गव्हाची मागणी वाढत आहे.  बाजारपेठेमध्ये अन्य गव्हाच्या किमतीच्या तुलनेत खपलीस पन्नास टक्के अधिक दर मिळतो. महाराष्ट्रात खपली म्हणून ओळखला जाणारा हा गहू गुजरातमध्ये ‘पोपटीया’ तर कर्नाटकात ‘सांबा’ म्हणून ओळखला जातो. काहीजण याचा जोड गहू असाही उल्लेख करतात.
पूर्वापार लागवडीत असलेले खपली गव्हाच्या जाती  उंच वाढणाऱ्या आहेत. पाणी जास्त झाले तर त्या लोळतात. काढणीस उशीर झाला तर ओंब्या खाली तुटून पडतात. उत्पादकताही हेक्टरी २० ते २५ क्विंटल एवढी कमी आहे. 

खपली गव्हाच्या कमी उत्पादकतेची कारणे

  • शिफारस नसतानाही लागवडीसाठी हलक्या जमिनीचा वापर  
  • अधिक उत्पादनक्षम सुधारित जातीच्या बियाणांची अनुपलब्धता.
  • विकसित केलेल्या सुधारित तंत्र, जातींचा मर्यादित वापर. 
  • पाभरीने किंवा पेरणी यंत्राने पेरणी करण्याऐवजी फोकून लागवड करण्यावर भर.
  • आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी दिले जाते व योग्य खतांचा वापर होत नाही. परिणामी पीक लोळण्याचे प्रमाण वाढून उत्पादनात मोठी घट होते.
  • तण नियंत्रणाचा अभाव.
  • वातावरणात वारंवार होणारे बदल अर्थात प्रतिकूल हवामान.

सुधारित लागवड तंत्रज्ञान 

  • खपली गव्हास रात्री थंड आणि दिवसा कोरडे हवामान लागते. फुटवे फुटण्यापासून ते ओंबी भरेपर्यंत थंडीची आवश्‍यकता असते. जास्त पावसात खपली तग धरू शकत नाही. ढगाळ हवामानात किडी- रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. खपली गव्हास साधारण १० ते २३ अंश सेल्सिअस तापमान योग्य आहे. तापमान थोडे वाढले तरी खपली गहू ते सहन करू शकतो. तसेच पाण्याचा ताण देखील सहन करू शकते.
  • खपली गहू काळ्या व कसदार जमिनीत चांगला येतो. हलक्या व चोपण जमिनीतही चांगले उत्पादन मिळते. चांगल्या निच-याची जमिनीची निवड करावी. पीक लोळत नाही. क्षारपड जमिनीमध्ये खपली तग धरू शकते. चांगल्या उत्पादनासाठी मातीचा सामू ६ ते ८ पर्यंत असावा. पिकाच्या उपयुक्त मुळ्या ६० ते ७५ सेंमी. खोलवर जात असल्यामुळे  खरिपाचे पीक निघाल्यावर जमिनीची चांगली मशागत करावी. लागवड १ ते २० नोव्हेंबर  दरम्यान करावी.
  • खतमात्रा - उन्हाळ्यात शेणखत टाकले नसल्यास एकरी ४ ट्रॉली शेणखत मिसळावे. ६० किलो नत्र, ६० किलो स्फुरद, ४० किलो पालाश पेरताना द्यावे. उर्वरित अर्धे नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी खुरपणीनंतर द्यावे. वरखते देण्यापूर्वी माती परीक्षण करूनच खताचे प्रमाण निश्चित करावे. 
  • बीजप्रक्रिया - बियाणे म्हणून वापरताना खपली गहू टरफलासहीत वापरला जातो. एक एकर पेरणीसाठी ४० किलो बियाणे वापरावे. टोकण पद्धतीने लागवड करण्यासाठी एकरी १६ ते २० किलो बियाणे पुरेसे होते. पेरणीपूर्वी बियाण्यास कॅप्टन किंवा थायरम बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रतिकिलो बियाणास प्रक्रिया करावी. पेरणीपुर्वी २५ ग्रॅम ॲझोटोबॅक्टर अधिक २५ ग्रॅम स्फुरद विरघळविणाऱ्या जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया गुळाच्या पाण्याबरोबर करावी. त्यानंतर बियाणे सावलीमध्ये वाळवून पेरणी करावी.
  • पेरणीसाठी दोन ओळींत २० सें.मी. अंतर ठेवून ट्रॅक्टरचलीत पाभरीने पेरणी करून एकसारखे बी पडेल याची दक्षता घ्यावी. शक्‍यतो पेरणी दक्षिणोत्तर तसेच ५ ते ६ सेंमी. खोल करावी, त्यामुळे उगवण चांगली होते. पेरणी उभी-आडवी अशी दोन्ही बाजूने न करता ती एकेरी करावी. म्हणजे आंतरमशागत करणे सोयीचे होते. लागवड सरी किंवा वाफा पद्धतीने करता येते. 

उत्पादन, गुणवत्तावाढीसाठी आवश्यक बाबी 

  • बागायती पद्धतीत वेळेवर पेरलेल्या खपली गव्हास खुरपणी झाल्यानंतर (सर्व साधारणपणे २१-३० दिवसांनी) प्रती हेक्टरी ६० किलो नत्र द्यावा.
  • दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना द्रवरूप नत्र व पालाशयुक्त खताची फवारणी करावी.
  • गहू ५५ ते ७० दिवसांचा असताना १९:१९:१९ या विद्राव्य खताची दोन टक्के या प्रमाणे दोन वेळा फवारणी करावी.
  • दाणे भरण्याच्या अवस्थेत दोन टक्के युरियाची फवारणी करावी.
  • पेरणीसाठी व जास्तीत जास्त उत्पादनासाठी शिफारस केलेल्या जातींचा वापर करावा.
  • पेरणी यंत्राने किंवा पाभरीने करावी. दोन ओळींत २० सेंमी. अंतर ठेवून पेरणी ५ ते ६ सेंमी. खोल व दक्षिणोत्तर करावी. पेरणीसाठी हरभरा अथवा भुईमुगाचे चाडे वापरावे.
  • हेक्टरी रोपांची संख्या जास्त ठेवण्यासाठी बियाणाचे हेक्टरी प्रमाण १०० किलो ठेवावे.
  • अर्धा नत्र व पूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीवेळी, उरलेला नत्र खुरपणी झाल्यानंतर (२१-३० दिवसांनी) प्रति हेक्टरी ६० किलो प्रमाणात (१३० किलो युरिया) द्यावा.
  • जमिनीत ओलावा राहून पीक क्षेत्रात थंड हवामान राहण्यासाठी नेहमीपेक्षा कमी अंतराने म्हणजे १५ ते २० दिवसांनी योग्य मात्रेत पाणी द्यावे. तापमान कमी राहण्यासाठी तुषार सिंचनाचा वापर करावा.
  • शेवटचे पाणी पीक पक्व झाल्यावर देवू नये. अन्यथा पीक लोळण्याची आणि दाणा पांढरा पडण्याची शक्यता असते.

सुधारित जाती
आघारकर संशोधन संस्था, पुणे
एम.ए.सी.एस. २९७१ 

  • आघारकर संशोधन संस्थेने २००९ साली खपली गव्हाची नीम बुटकी व अधिक उत्पादन देणारी जात प्रसारित केली. या जातीच्या लागवडीची शिफारस महाराष्ट्र, कर्नाटक या भागासाठी वेळेवर पेरणीसाठी करण्यात आली आहे.
  • जातीची उंची ८७ सेंमी, कालावधी १०६ दिवस आहे. जात तांबेरा प्रतिकारक असून दाणा तांबडा लांबट आहे. प्रथिनांचे प्रमाण १३.५ टक्के 
  • गावरान खपलीपेक्षा अधिक उत्पादन व उंचीला बुटकी जात. लोळत नाही.
  • उत्पादन क्षमता ४५ ते ५० क्विंटल प्रति हेक्टरी. 

धारवाड कृषी विद्यापीठ, कर्नाटक
डीडीके १०२५ 

  • वैशिष्टे - निमबुटकी जात, प्रथिनांचे प्रमाण १३ टक्के
  • उंची -९१ सेंमी.
  • पीक तयार होण्याचा कालावधी  - १०६ ते ११० दिवस
  • उत्पादन - ३९ ते ४२ क्विंटल प्रति हेक्टरी

डीडीके १०२९    

  • वैशिष्टे - निमबुटकी जात, प्रथिनांचे प्रमाण १३ टक्के
  • उंची - ८५ सेंमी
  • पीक तयार होण्याचा कालावधी- १०७ ते ११० दिवस
  • उत्पादन - ४० ते ४४ क्विंटल प्रति हेक्टरी

प्रादेशिक संशोधन केंद्र, वेलिंग्टन (निलगिरी), तामिळनाडू       
एच. डब्लू १०९८    

  • वैशिष्टे - तांबेरा प्रतिकारक, प्रथिने १३.५ टक्के    
  • उंची - ८५ सें.मी.
  • पीक तयार होण्याचा कालावधी -१०५-११०    दिवस
  • उत्पादन - ४५ ते ५० क्विंटल प्रति हेक्टरी

वैशिष्टे आणि आरोग्यासाठी फायदे

  • एक क्विंटल खपलीपासून सत्तर किलो गहू मिळतो. 
  • काळी, कसदार तसेच हलक्या, चोपण जमिनीमध्ये लागवड करता येते. 
  • पौष्टिक, वात-पित्तशामक, शक्ती वाढविणारा गहू .
  • मधुमेह, हृदयविकार, आतड्याचा कर्करोग, बद्धकोष्ठता आदींसाठी योग्य  
  • पाचक पदार्थ (७.२ ते २०.७ टक्के तंतूमय घटक), प्रथिने (११.२ ते २२.७ टक्के, व कर्बोदके (७८ ते ८३ टक्के) व ग्लायसेमिक इंडेक्‍स कमी. 
  • खपली हाडांची झीज भरून काढतो. 
  • पचावयास हलका. भाज्या घालून तिखट उप्पीट करून खाता येते. 
  • चपाती अन्य सरबती जातींपेक्षा गोडसर. हा गहू ओलावून, जाड भरडून, गूळ घालून खीर करता येते. ती अतिशय पौष्टिक असते. त्यालाच काही भागात ‘लापशी’ म्हणतात.
  • उत्कृष्ट प्रतीचा रवा, शेवया, पास्ता, शेवया, कुरड्या, पुरणपोळी, रवा इडली, बोटुकली आदी पदार्थ बनवले जातात.

खपली गव्हाचे महत्व 

  • अन्य बागायती गव्हाप्रमाणे खपली काळ्या व कसदार जमिनीत चांगली येतो.
  • हलक्या व चोपण जमिनीमध्ये समाधानकारक उत्पादन.
  • उशीरा पेरणीसाठी खपलीचा वापर. कारण उष्णता व निकस जमिनीचा ताण सहन करू शकते.
  • तांबेरा रोग प्रतिरोधक गुणधर्म
  • निसर्गत:च कणखरपणा
  • धारवाड कृषी विद्यापीठात केलेल्या एका अभ्यासानुसार खपलीचा आहारात वापर केल्यामुळे मधुमेही रुग्णांच्या लिपीड, ट्रायग्लिसराईडस, व एलडीएल कोलेस्टेरॉल या प्रतिकूल घटकांमध्ये लक्षणीय घट झाली. परदेशात केलेल्या अशाच संशोधनात दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहात व वयानुसार कमी होणाऱ्या दृष्टिऱ्हासात खपलीचा आहारातील उपयोग चांगला दिसून आला. 
  • खेळाडूंच्या दैनंदिन आहारातील खपलीचा उपयोग क्षमता टिकवून धरण्यासाठी उपयोगी पडतो.

- डॉ. विजेंद्र बाविस्कर, ८३७४१७४७९७ (लेखक अखिल भारतीय समन्वित गहू संशोधन प्रकल्प, आघारकर संशोधन संस्था, पुणे येथे कार्यरत आहेत.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com