व्यवस्थापन लिंबू फळबागेचे...

व्यवस्थापन लिंबू फळबागेचे...

लिंबू फळबाग लागवडीसाठी योग्य जमीन, जात यांची निवड महत्त्वाची आहे. पहिल्या वर्षापासून लिंबू बागेला योग्य प्रमाणात सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा वापर केल्यास वाढ चांगली होऊन, सातत्यपूर्ण उत्पादन मिळवणे शक्य होते.

लिंबू लागवड करण्यासाठी मध्यम काळी, हलकी, मुरमाड, पाण्याचा निचरा होणारी, उदासीन सामू असणारी जमीन उपयुक्त ठरते. मात्र,  जमिनीमध्ये चुनखडी नसावी. साधारणतः क्षारांचे प्रमाण ०.५० डेसी. सा. प्रति मीटरपेक्षा कमी तसेच ई.सो. टक्केवारी (ई.एस.पी. प्रति उपलब्ध चुन्याचे प्रमाण) १० टक्क्यापेक्षा कमी असलेली जमीन लागवडीसाठी योग्य आहे. लिंबाची लागवड करण्यासाठी ६x ६ मीटर अंतरावर ३x३x३ फूट आकाराचे खड्डे खोदून घ्यावेत. लागवड करण्यापूर्वी कार्बेन्डाझीम २ ग्रॅम अधिक क्लोरपायरिफॉस (५० टक्के ईसी) २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणाने खड्ड्याचे निर्जंतुकीकरण करावे. खड्डा भरताना त्यात शेणखत १० किलो, एस.एस.पी. २ किलो, निंबोळी पेंड १ किलो आणि ट्रायकोडर्मा २५ ग्रॅम पोयटा मातीमध्ये मिसळून घ्यावे. त्यात लिंबू कलमांची लागवड करावी.

निवड आणि जाती
   लागवड करण्यासाठी विशिष्ट रोगांना तसेच किडींना प्रतिकारक्षम असलेल्या जातींची निवड करावी. 
   खात्रीलायक रोपवाटिकेमधून कलमांची अथवा रोपांची खरेदी करावी.
   साई सरबती, फुले शरबती इत्यादी सुधारित जातींची निवड करावी.

ठिबक सिंचनाद्वारे अन्नद्रव्य व्यवस्थापन 
   कार्यक्षम अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी शिफारशीच्या मात्रांच्या ८० टक्के (१०४३ ग्रॅम युरिया आणि ९६० ग्रॅम ००ः००ः५०) प्रति झाडासाठी, प्रति वर्षांसाठी दीड महिन्याच्या अंतराने समान हप्त्यात ठिबक सिंचनाद्वारे द्यावे. 
   १८७५ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट प्रति झाड द्यावे. सिंगल सुपर फॉस्फेट हे १५ किलो निंबोळी पेंड अधिक १५ किलो सेंद्रिय खतांबरोबर द्यावे. 

सूक्ष्म अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन 
लिंबू हे पीक संवेदनशील असून, त्यामध्ये अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे विविध विकृती दिसून येतात. त्या टाळण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचे संयुक्त मिश्र खतांची फवारणी करावी. वर्षामधून साधारण २ वेळा झिंक सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, मॅगेंनीज सल्फेट प्रत्येकी ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. तसेच फेरस व कॉपर सल्फेटची प्रत्येकी ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

अन्नद्रव्यांच्या योग्य प्रमाणातील उपलब्धतेसाठी सेंद्रिय खते देताना प्रति झाड ५०० ग्रॅम व्हॅम अधिक १०० ग्रॅम स्फुरद विरघवळणारे जिवाणू अधिक १०० ग्रॅम ॲझोस्पिरिलम अधिक १०० ग्रॅम ट्रायकोडर्मा हरजियानम मिसळून द्यावे.

टीप - 
   उपरोक्त खतांची मात्रा देताना नत्रयुक्त खतांची मात्रा प्रति झाडासाठी समान तीन हप्त्यांमध्ये विभागून द्यावी. (जानेवारी, जुलै आणि नोव्हेंबर) 
   नत्राच्या एकूण गरजेपैकी ५० टक्के मात्रा रासायनिक खताद्वारे (युरिया किंवा अमोनियम सल्फेट) तसेच उर्वरीत नत्राची मात्रा सेंद्रिय खते किंवा निंबोळी पेंडच्या स्वरुपात द्यावी. 
   साधारणतः प्रति झाडासाठी १५ किलो निंबोळी पेंड आणि १५ किलो सेंद्रिय खत योग्य फळधारणा झालेल्या झाडासाठी वापरावी. 

- डॉ. पी. ए. साबळे, ८४०८०३५७७२ (कृषी विज्ञान केंद्र, दंतीवाडा कृषी विद्यापीठ, गुजरात) 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com