माहुलीने तयार केली लिंबू उत्पादनात ओळख

विनोद इंगोले
गुरुवार, 25 जुलै 2019

लिंबू उत्पादनात अग्रेसर अशी ओळख माहुली (चोर, जि. अमरावती) गावाने मिळविली आहे. अमरावती शहरानजीक असल्याने तेथील बाजारपेठ येथील शेतकऱ्यांनी दर्जेदार उत्पादनातून काबीज केली आहे.

लिंबू उत्पादनात अग्रेसर अशी ओळख माहुली (चोर, जि. अमरावती) गावाने मिळविली आहे. अमरावती शहरानजीक असल्याने तेथील बाजारपेठ येथील शेतकऱ्यांनी दर्जेदार उत्पादनातून काबीज केली आहे. बाजारपेठांमध्ये माहुलीचे लिंबू आल्याशिवाय लिलावच सुरू होत नाही असे म्हटले जाते. याच व्यावसायिक पिकाच्या बळावर विदर्भातील या गावाने संपन्नतेकडे वाटचाल केली आहे. नव्या पिढीलादेखील या पिकाने भुरळ घातली आहे. 

अमरावती-यवतमाळ मार्गावर  अमरावतीपासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर पाच हजार लोकसंख्येचे माहुली चोर गाव आहे. शहर आणि साहजिकच बाजारपेठ जवळ असल्याचा फायदा इथल्या शेतकऱ्यांना झाला आहे. कधी काळी संत्रा उत्पादनात आघाडी घेतलेल्या या गावाने अलीकडील वर्षांत लिंबू शेतीत भरारी घेतली आहे. गावात आजच्या घडीला सुमारे २०० हेक्‍टरवर उत्पादनक्षम लिंबू लागवड दिसून येते.  दरवर्षी यात १५ ते २० हेक्‍टरची भर पडते आहे. 

सरोदे यांची प्रगती 
गावातील योगेश किशोरराव सरोदे यांनी दहा एकरांपैकी तीन एकरावर लिंबू लागवड केली आहे. त्यांनीही सुरवातीची चार वर्षे सोयाबीन, कपाशी, पपई अशी आंतरपिके घेतली. पाचव्या वर्षीपासून लिंबाचे उत्पादन मिळण्यास सुरवात झाली. ठिबकचा मुख्य वापर होतो. एप्रिल, मेमध्ये उन्हाची तीव्रता विदर्भात वाढीस लागते. त्या काळात पाटपाण्याचा पर्यायदेखील वापरण्यात येतो. हे फळपीक आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत असल्याचे वाटल्यानेच शासकीय अनुदानासाठी वाट न पाहाता इथल्या शेतकऱ्यांनी लिंबू शेतीच्या विस्तारासाठी स्वतःच पुढाकार घेतल्याचे योगेश सरोदे सांगतात. वडिलांच्या निधनानंतर वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी शेतीची जबाबदारी पूर्णपणे योगेश यांच्या खांद्यावर आली. आज वर्षाला एकूण क्षेत्रातून काही लाख रुपयांचे उत्पन्न गाठण्यापर्यंत त्यांनी मजल मारली  आहे. 

आश्‍वासक अर्थकारण 
अंकुश झिंझाट यांची आठ एकरांवर लिंबू लागवड आहे. बागेतील सुमारे ३०० झाडे १४ वर्षांपूर्वीची तर उर्वरित आठ वर्षांआधीची आहेत. आठ वर्षाआधी लागवड झालेल्या 400 झाडांपासून गेल्या वर्षीच्या हस्त बहारात त्यांनी उत्पादन घेतले. नव्या पिढीलादेखील या पिकाने भुरळ घातली आहे. त्यामध्ये दिनेश झंझाट यांचाही समावेश आहे. त्यांची एकूण ७०० झाडे आहेत. साडेपाच एकरांत त्यांना वर्षभरात सहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. व्यापाऱ्यांना बाग विक्रीचाच पर्याय त्यांनी निवडला आहे.  अंकुश व महेश हे कोल्हे बंधू वडिलोपार्जित शेती सांभाळतात. त्यांच्या बागेत सुरवातीला लिंबाची १२० झाडे होती. त्यातील आता १०० शिल्लक आहेत. वर्षाला त्यांना ७० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.  

व्यवस्थापनातील बाबी 
अनेक शेतकरी दर्जेदार उत्पादनासाठी शेणखताच्या वापरावर भर देतात. 
माहुलीपासून पाच किलोमीटरवर 
सावनेर येथे गोरक्षण संस्था आहे. तेथूनही गरजेनुसार खरेदी केले जाते.  गावातील काही शेतकरी लिंबाचे तीनही बहार घेतात. काही शेतकऱ्यांची मृग बहार नियोजनात ‘मास्टरकी’ आहे. हस्त बहाराचा विचार केल्यास एप्रिलमध्ये फळे काढणीस येतात. एप्रिल ते पुढील तीन महिने या मग उत्पादन मिळत राहते. सरासरी 
७०० ते ८०० रुपये प्रति पोते दर मिळतो. 
प्रति पोत्यात सरासरी ५७५ ते  ६०० नग 
राहतात.  

मार्केटिंगचा पर्याय
लिंबाचे दर हंगाम व आवकेनुसार मागे पुढे होतात. सद्यस्थितीत हा दर ४०० ते ४५० रुपये प्रति पोते आहे. मे, जून महिन्यात हे दर ७०० रुपये तर मार्च, एप्रिल या दोन महिन्यात उच्चांकी १००० रुपयांपर्यंत जातात असे शेतकऱ्यांनी सांगितले. अमरावती, नागपूर बाजारपेठ हे विक्रीचे पर्याय आहेत. त्यासोबतच उन्हाळ्यात व्यापारी देखील बागांना भेटी देत व्यवहार ठरवतात. बाजारपेठेचा अंदाज घेत विक्रीचा पर्याय  त्या-त्या वेळी घेतला जातो. बाजारपेठेत माहुलीचे लिंबू आल्याशिवाय लिलावच होत नाही असे देखील म्हटले जाते. 

झंझाट कुटुंबीयांनी  दिली गावाला दिशा
गावातील अंकुश झंझाट यांचे आजोबा मोतीराम झंझाट यांनी सुमारे ४० वर्षांपूर्वी तीन एकरांवर लिंबू लागवडीचा श्रीगणेशा केला. त्यानंतर जसजसे या पिकाचे अर्थकारण पटू लागले तसतसे गावातील शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने लिंबाची शेती सुरू केली. लिंबू पिकाचा आणखी एक फायदा शेतकरी घेतात तो म्हणजे नव्या बागेत तीन वर्षांपर्यंत तूर किंवा सोयाबीनचे आंतरपीक घेण्याचा. या माध्यमातून मुख्य पिकातील गुंतवणुकीचा काहीसा खर्च कमी होतो.  

गावाचे असे हे क्षेत्र 
नांदगाव खंडेश्‍वर तालुका कृषी अधिकारी अरुण गजभिये यांनी दिलेल्या माहितीनुसार माहुली चोर गावात उत्पादनक्षम अशी ७० हेक्‍टरवर लिंबू लागवड आहे. लागवड आणि ठिबकसाठी अनुदानपात्र असलेल्या क्षेत्राचीच नोंद कृषी विभागाकडे राहते. अर्थात हे क्षेत्र १८० ते २०० हेक्‍टरपर्यंत असावे असे शेतकरी सांगतात. कृषी विभागाने या भागात जलयुक्‍त शिवार योजनेच्या माध्यमातून अनेक कामे केली आहेत. त्यामुळे या भागातील विहिरींची पाणीपातळी वाढण्यास मदत झाली आहे. 

 : योगेश सरोदे- ८४५९१८३४६९, 
 : अंकुश कोल्हे- ७७५५९९८७१७, 
 : अंकुश झंझाट- ८७६६५५७३६६,  : दिनेश झंझाट- ७७०९४७४३१३


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lemon Production by Mahuli