द्राक्षबागांचे ९ हजार कोटींवर नुकसान

मनोज कापडे
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

कृषी विभागाच्या अंदाजानुसार राज्यात ५० हजार एकरवरील बागांचे नुकसान झालेले आहे.

पुणे - सततच्या पावसामुळे सर्व अवस्थांमधील द्राक्ष बागांची प्रचंड हानी झाली आहे. यातील सुमारे ९० हजार एकरवरील बागा १०० टक्के वाया गेल्याचा दावा महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाने केला असून कृषी विभागाने ५० हजार एकर द्राक्ष बागा नष्ट झाल्याचे म्हटले आहे. सर्व हंगामाचा विचार करता द्राक्ष बागायतदारांना एकूण उत्पादनात यंदा सुमारे ९ हजार कोटींवर फटका बसल्याची माहिती समोर आली आहे. 

राज्याच्या फळशेतीत सतत दिमाखदार कामगिरी बजावणाऱ्या द्राक्षबागा यंदा अतिपावसाच्या संकटामुळे काळवंडून गेल्या आहेत. सर्वात जास्त फटका नाशिक विभागातील बागांना बसला आहे. गेल्या हंगामात नाशिकमधून ३८ हजार निर्यातक्षम बागांमधून शेतकऱ्यांना एक लाख ११ हजार ६४८ टन निर्यातक्षम द्राक्ष पिकवली होती.

द्राक्षशेतीमध्ये सुरू असलेल्या कष्टपूर्वक प्रयोगांमुळे यंदा निर्यातक्षम बागांची संख्या ९० हजारांपर्यंत नेण्याचे टार्गेट कृषी विभागाने ठेवले होते. मात्र, पावसाच्या संकटामुळे टार्गेट पूर्ण होणार नाही. मात्र, गेल्या हंगामाइतक्या बागा नोंदल्या जातील असा विश्वास आम्हाला वाटतो, अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.

कृषी विभागाच्या निर्यात कक्षाचे सल्लागार डॉ. गोविंद हांडे म्हणाले, “गेल्या हंगामात निर्यातक्षम बागांमुळे दोन हजार २०० कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. यंदा निश्चित किती उलाढाल होईल किंवा बागांचे नुकसान कोणत्या पातळीवर किती झालेले आहे याचा अंदाज आताच सांगता येणार नाही. तथापि, काही भागात बागांची मोठी हानी झालेली आहे. या स्थितीतदेखील निर्यातक्षम बागांची नोंदणी सुरू असून आतापर्यंत २५० बागांची नोंदणी झाली आहे.”

राज्यात गेल्या हंगामात ३८ हजार निर्यातक्षम बागा एकट्या नाशिक जिल्ह्यात होत्या. त्यापाठोपाठ सांगली २२१५, सातारा ४७४, पुणे १५०८, नगर ५०४, लातूर १३०, सोलापूर १५६ तर उस्मानाबाद जिल्ह्यात २३७ निर्यातक्षम भागांची नोंदणी अपेडाकडे करण्यात आली होती. यंदा नोंदणी ३१ डिसेंबरपर्यंत चालू राहणार आहे. यंदा निर्यातक्षम बागांची नोंदणी आधीच्या अंदाजाप्रमाणे ९० हजारांपर्यंत जाणार नसली तरी ४०-४३ हजारांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे.

कृषी विभागाच्या अंदाजानुसार राज्यात ५० हजार एकरवरील बागांचे नुकसान झालेले आहे. बागाईतदार संघाच्या मते राज्यात एकूण तीन लाख एकरवर बागा असून, त्यातील ३० टक्के म्हणजेच ९० हजार बागांची १०० टक्के हानी झालेली आहे.

“राज्यात पहिल्या स्टेजला म्हणजे पोंगा अवस्थेतील बागांचे घड जिरले आहेत. फुलोऱ्यातील बागांचे घड कुजले आहेत. मात्र, मण्यात असलेल्या बागांमध्ये १०० टक्के क्रॅकिंग गेले आहे. बागलाण, मालेगाव, देवळा, कळवण, इंदापूर, बोरी, बारामती, नारायणगाव भागात काढणीला आलेल्या बागांचे मोठे नुकसान झालेले आहे,” अशी माहिती संघाच्या सूत्रांनी दिली.

द्राक्षबागेतून पीक काढण्यासाठी छाटणी ते काढणी दरम्यान शेतकरी किमान दोन ते अडीच लाख रुपये खर्च करतात. यंदा प्रतिकूल हवामानामुळे हाच खर्च ३ लाखांवर गेला आहे. त्यानंतर सरासरी दहा टन उत्पादन हाती येते. त्यातून आठ टन माल निर्यातक्षम निघतो तर दोन टन देशी बाजारात जातो. ५० रुपये किलो सरासरी भाव गृहीत धरल्यास सुमारे चार लाख रुपये निर्यातक्षम मालाचे व ५० हजार रुपये देशांतर्गत बाजारातून येतात. एकूण चार ते साडेचार लाख रुपये उलाढाल एका एकरमध्ये होते. निसर्गाने साथ दिली तर त्यातून दीड ते दोन लाख रुपये शेतकऱ्याच्या पदरी येतात. यंदा मात्र द्राक्ष उत्पादक शेतकरी पुरते उजाड झाले आहेत.

नाशिक जिल्ह्यात आज नुकसानीची पाहणी 
बागाईतदार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पवार, कोषाध्यक्ष कैलास भोसले सध्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन यांनी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत आहेत. आज (ता. ६) नाशिक भागातील नुकसानग्रस्त भागांचा दौरा संघाचे पदाधिकारी करणार आहेत. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांची मदत घेऊन संघाच्या चारही विभागांमध्ये शेतकरी सल्ला प्रक्रिया यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे.

दृष्टिक्षेपात नुकसान
 राज्यातील द्राक्ष क्षेत्र : ३ लाख एकर
 सरासरी उत्पादकता : १० टन
 यंदाचा उत्पादन खर्च प्रति एकर : ३ लाख रुपये
 सरासरी दर : ५० रुपये
 एकूण उत्पन्न प्रतिएकर : चार ते साडेचार लाख
 १०० टक्के नुकसानग्रस्त बागा : ९० हजार एकर
 ३० ते १०० टक्क्यांपेक्षा कमी नुकसानग्रस्त बागा : २ लाख १० हजार एकर
- एकूण नुकसान : ९ हजार कोटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The loss of grape farming