लिंबांसाठी शोधली पर्यायी बाजारपेठ

लिंबांसाठी शोधली पर्यायी बाजारपेठ

संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध अमरावती जिल्ह्यात नांदगाव खंडेश्‍वर तालुक्‍यातील माहुली चोर गाव लिंबू उत्पादनात नावारूपास आले आहे. येथील लिंबू उत्पादकांनी कोरोना काळातील टाळेबंदीत नवी दिल्ली, रायपूर व जबलपूरसारख्या परराज्यांतील पर्यायी बाजारपेठा शोधल्या. समूहाद्वारे एकत्र येऊन संघटितपणे संकलन व प्रतवारी केल्याने त्यांना संकटात विक्री व्यवस्था उभी करणे शक्य झाले. 

अमरावती जिल्ह्यात नांदगाव खंडेश्‍वर तालुक्‍यातील माहुली चोर गाव लिंबू उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. गावात (कै.) मोतीराम गोपाळराव झंझाट यांनी सर्वप्रथम लागवडीसाठी पुढाकार घेतला. कपाशी, ज्वारी, पपई, पेरू यांसारखी पिके त्यांच्या शिवारात होती. पपई, पेरूला अपेक्षित बाजारपेठ उपलब्ध न झाल्याने त्यांनी लिंबाकडे वळण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला चार एकरांवर लागवड होती. टप्प्याटप्प्याने विस्तार करीत आज एकत्रित कुटुंबाची २४ एकरांपर्यंत लिंबू बाग आहे. गावात माहुली चोर लिंबू उत्पादक संघही स्थापन झाला असून, अंकुश झंझाट त्याचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार गाव परिसरात लिंबाखालील क्षेत्र २५० हेक्टरपर्यंत असावे. सुमारे ११० शेतकरी लिंबू उत्पादक आहेत. 

एकत्रित प्रयत्न 
एरवी मालाचा दर्जा पाहता व्यापाऱ्यांकडून सौदे होत ६० ते ७० हजार रुपयांत व्यवहार होतो. मागील वर्षी मात्र लॉकडाउनमुळे स्थानिक बाजारपेठा पूर्णपणे ठप्प झाल्या होत्या. स्थानिक बाजारातील व्यापारी किलोला १० रुपये दर द्यायला राजी झाले होते. त्याच वेळी नवी दिल्ली, रायपूर, जबलपूर भागांत हाच दर २५ रुपये व त्याहून अधिक होता. मात्र गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत त्यावर पर्याय उभा केला. त्यामध्ये अंकुश यांनी पुढाकार घेत आपल्या बागेत सर्वांचा माल संकलित करण्याचे ठरवले. परराज्यांतील व्यापाऱ्यांशी थेट संपर्क करण्यात आला. वाहतूकदारांशी संपर्क साधण्यात आला. तोडणी आणि प्रतवारीसाठी कौशल्यपूर्ण मजुरांची गरज भासते. त्यासाठी लिंबू उत्पादकांची गरज ओळखून झंझाट यांनी व्यवस्था उभी केली. संकलन, पोती भरणे, वाहनात भरणे यासाठी प्रति पोते ५० रुपये दर निश्‍चित करण्यात आला. यामध्ये गावस्तरावरच रोजगारनिर्मितीचा उद्देश साध्य झाला. एकूण मिळून साडेचार हजार पोती लिंबांची विक्री परराज्यांत झाली. झंझाट म्हणाले, की परराज्यांत लिंबू विक्री खूप फायदेशीर ठरली नसली तरी स्थानिक बाजारपेठेच्या तुलनेत किलोला पाच रुपये दर आम्हाला अधिक मिळाला. ‘किसान रेल’ योजनेतून शेतीमाल वाहतुकीवर ५० टक्‍के सवलत देण्यात आली आहे. मात्र येत्या काळात या पर्यायाचा वापर करण्याचा मानस असल्याचे ते सांगतात.   

लिंबाचे अर्थकारण 
आपला अनुभव सांगताना झंझाट म्हणाले की लिंबू पिकातून एकरी दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. एकरी सुमारे ११० ते १२० झाडे आहेत. कागदी लिंबाचा वाण आहे. उन्हाळ्यात किलोला ४० रुपयांवर जाणारा दर अन्य हंगामात २५ रुपयांपर्यंत खाली येतो. बहुतांश शेतकऱ्यांचा प्रयत्न उन्हाळी हंगामातच माल आणण्याचा असतो.  ज्या भागात दर्जेदार रोपे मिळतात त्या भागात रोपांसाठी मागणी नोंदविली जाते. अकोला जिल्ह्यातील वाडेगाव मधून बहुतांशी रोपांची खरेदी करण्यावर या भागातील शेतकऱ्यांचा भर राहतो. रोपाचा दर अलीकडील काळात प्रति नग ४० रुपयांवर पोचला आहे. महिन्यात या बहरातील फळे काढणीस येतात. त्यावेळी उन्हाळा असल्याने लिंबूला मागणी राहते. अमरावती बाजारपेठेत लिंबाचा रोजचा पुरवठा सुमारे दीडशे पोत्यांएवढा (प्रति पोते १५ किलोचे) असतो.  

अंकुश झंझाट  ८७६६५५७३६६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com