दर घसरल्याने केळी उत्पादकांना आर्थिक फटका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

उमरगा -  यंदा केळीचे दर घसरल्याने केळी उत्पादकांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. केळीच्या बाजारपेठेत यंदा प्रतिकिलो आठ ते दहा रुपयांचा दर असल्याने अपेक्षित नफ्यापेक्षा २५ टक्के तोटा सहन करावा लागत आहे. 

उमरगा -  यंदा केळीचे दर घसरल्याने केळी उत्पादकांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. केळीच्या बाजारपेठेत यंदा प्रतिकिलो आठ ते दहा रुपयांचा दर असल्याने अपेक्षित नफ्यापेक्षा २५ टक्के तोटा सहन करावा लागत आहे. 

केळीच्या उत्पादनात नांदेड जिल्हा अग्रेसर आहे. बारमाही पाण्याची व्यवस्था नसल्याने उमरगा तालुक्‍यात बागायती क्षेत्र कमी प्रमाणात आहे. तालुक्‍यात जवळपास ५० एकरांहून अधिक क्षेत्रावर केळीच्या बागा आहेत. गतवर्षी झालेल्या मुबलक पाण्याच्या आधारावर बऱ्याच शेतकऱ्यांनी केळीची बाग तयार केली आहे. भुसणी येथील सतीश रामचंद्र हिरमुखे यांनी नोव्हेंबर २०१६ मध्ये दोन एकरांत पुणे येथून जी-०९ जातीचे ५० हजार रुपयांच्या दोन हजार ६०० केळीच्या रोपांची लावण केली. पहिल्यांदा त्यांनी शेणखताचा वापर अधिक प्रमाणात केला. लावण झाल्यानंतर येणाऱ्या हिवाळ्याच्या ऋतूतील अधिक थंडी रोपांच्या वाढीला मारक ठरली. परिणामी झाडांची जोमाने वाढ होऊ शकली नाही. तरीही श्री. हिरमुखे यांनी कृषितज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने झाडांची चांगली जोपासना केली. साधारणतः एक वर्षात हाती येणारे केळीचे उत्पादन आता बाजारपेठेत पाठविले जात आहे. एकदा लावण केलेल्या केळीच्या बागेतून तीन वर्षे उत्पन्न घेता येते.

दरात झाली घसरण
केळीला साधारणतः १४ ते १५ रुपये प्रतिकिलो दर मिळत असतो. यंदा मात्र दरात घसरण झाली आहे. चांगल्या दर्जाच्या केळीला प्रतिकिलो १० रुपयांचा दर मिळत आहे. दोन एकरांत पाच ते साडेपाच लाख रुपये मिळणे अपेक्षित असताना दर कमी झाल्याने चार लाखांपर्यंत रक्कम मिळणार आहे. दोन एकरांत एकूणच खर्च एक लाखापर्यंत आला आहे. खर्च वजा जाता तीन लाख रुपये निव्वळ नफा अपेक्षित आहे. श्री. हिरमुखे यांच्या दर्जेदार केळीला स्थानिक व्यापाऱ्यांनी पसंती दिली आहे. सध्या बाजारपेठेत ही केळी परिपक्व करून विक्रीसाठी आणली जात आहेत.

केळीच्या बागेसाठी खूप मेहनत करावी लागते. वादळी वारा, गारांच्या माऱ्यापासून संरक्षण देणे महत्वाचे असते. यंदा दर कमी झाल्याने आर्थिक फटका बसत आहे. पुढच्या वर्षी दर चांगला मिळेल, या अपेक्षेने पुन्हा केळीच्या बागेची देखभाल मोठ्या मेहनतीने करावी लागेल.
- सतीश हिरमुखे, शेतकरी, भुसणी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathwada news Banana agrowon