हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव

हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव

देवणी - हरभऱ्यावरील मर रोगामुळे शेतकरी अडचणीत आले असून सर्वाधिक क्षेत्रावर असलेले हे पीक सध्या धोक्‍यात आले आहे. 

गेल्या दोन वर्षांत बाजारभावातील तेजी, गेल्या वर्षी तूर विक्रीतील अडचण, खरीप हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात झालेला पाऊस यामुळे यावर्षी हरभरा पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला, मात्र खरीप हंगामात जमिनीत असलेला ओलावा, तणनाशकांची फवारणी व काही दिवसांपूर्वी झालेला जोरदार पाऊस यामुळे हरभऱ्यावर मर रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचे दिसत आहे. तालुक्‍यात यावर्षी खरीप हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र सर्वाधिक आहे; मात्र मर रोगाच्या प्रादुर्भावामुळे पीकक्षेत्र अडचणीत आले आहे. तुरीचे घटलेले भाव, सोयाबीन भावातील घसरण व हमीभाव मिळण्याची अनिश्‍चितता यामुळे हरभरा पिकाकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहेत; मात्र पेरणीनंतर काही दिवसांतच रोगाची लक्षणे दिसू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. 

सततची द्विदल पिकांची पेरणी, तणनाशकांचा अनियंत्रित वापर, शेतीची मशागत करण्यात होत असलेला बदल, पेरणीनंतर जमिनीत असलेला ओलावा अथवा जास्त ओलाव्यावर झालेली पेरणी यामुळे मर रोगांची लक्षणे दिसू शकतात. त्यासाठी तीन पीकपद्धतीऐवजी दोन पीकपद्धती राबविणे गरजेचे आहे. जमिनीला उन्हाच्या काळात पुरेशी विश्रांती मिळाली पाहिजे. हरभऱ्यावरील मर रोग रोखण्यासाठी आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर करणे गरजेचे आहे. शिवाय जमिनीची मशागत व खुरपण केल्यास काही प्रमाणात मर रोगावर नियंत्रण मिळू शकते.
-अशोक पिनाटे, कृषी पर्यवेक्षक, देवणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com