दुधाच्या अभ्यासातून दूर व्हावेत सर्व संभ्रम

milk
milk

जगात सर्वाधिक दूध उत्पादनाची टिमकी वाजविणाऱ्या आपल्या देशात मुळातच दुधाचे सेवन फारच कमी आहे. राज्यात दूध सहकार चळवळ सुरू होऊन ५० वर्षे उलटली आहेत. परंतु एकाही दूध संघाकडून दूध पिण्याबाबत ग्राहकांमध्ये जागृती करण्याबाबतची विशेष मोहीम राबविलेली दिसत नाही. दूध उत्पादक खर्च-मिळकतीचा मेळ बसत नाही म्हणून सर्व दूध विक्रीच्या मागे असतो. ग्राहक सदैव स्वस्त दुधाच्या शोधात असतो. आणि दूध खरेदी परवडत नाही म्हणून दूध पिण्याचा प्रश्‍न लाखो ग्राहकांना कायमच भेडसावत असतो. अशा एकंदरीत परिस्थितीमध्ये अलीकडे आपण पाहतोय की सुपर मार्केट, मेगा स्टोअर्समध्ये सोयाबीन, बदाम, काजू, नारळ यांपासून बनविलेले दूध मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी ठेवलेले असते. अशा वनस्पतिजन्य दुधाचा खपही चांगलाच वाढलेला आहे. त्यामुळे गाई-म्हशीपासूनच्या पारंपरिक दुधाच्या विक्रीत भारतासह जगभरातच थोडीफार घट झाली आहे. याबाबत सर्वत्र चिंताही व्यक्त केली जातेय. त्यातच ‘एफएसएसआय’ने दुधाची व्याख्या स्पष्ट करताना वनस्पतिजन्य उत्पादनांपासून तयार केलेल्या दूधसदृश द्रवाला दूध म्हणता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. एफएसएसआयच्या या भूमिकेला वनस्पतिजन्य दूध उत्पादकांच्या लॉबीने विरोध सुरू केला आहे. वनस्पतिजन्य दुधाचा खप वाढावा म्हणून या लॉबीकडून गाई-म्हशींपासूनच्या दुधाच्या दर्जाला कमी लेखले जात आहे. यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. गाई-म्हशींपासूनचे दूध आणि वनस्पतिजन्य दूध याचा तुलनात्मक अभ्यास करण्याच्या सूचना केंद्रीय पशुसंवर्धन सचिवांनी ‘आयसीएआर’ला दिल्या आहेत.

वनस्पतिजन्य दूध हे सोयाबीन, बदाम, काजू, नारळ यांना दळून-पिसून त्यात पाणी, शर्करा, क्षार, जीवनसत्त्वे तसेच कुठला तरी एखादा स्वाद घालून तयार केले जाते. वनस्पतिजन्य दूध हे कशाप्रकारे तयार केले जाते, त्यात जीवनसत्त्वे, क्षारासह कोणते घटक टाकलेले आहेत, यारून त्याचा दर्जा आणि पोषणमूल्य ठरत असून, या दोन्हींत बदल घडत असतो. गाई-म्हशींचे दूध हे चारा-पशुखाद्याच्या पचनातून नैसर्गिकरीत्या या जनावरांच्या पोटात निर्माण होते. गाई-म्हशींच्या दुधात प्रथिने, जीवनसत्त्वे, स्निग्ध पदार्थ, क्षार यांच्या प्रमाणात फारसा बदल होत नसल्याने त्याचे पोषणमूल्यही टिकून राहते. काही वनस्पतिजन्य दुधात प्रथिनांचे प्रमाण अत्यंत कमी असते. मुले तसेच वयोवृद्धांकडून अशा दुधाचे सातत्याने सेवन ही चिंतेची बाब ठरू शकते. असे असताना देखील वनस्पतिजन्य दुधाचा खप वाढतोय. कारण ग्राहकांना हव्या तशा दर्जाचे तसेच विविध स्वादांमध्ये हे दूध उपलब्ध होत आहे. वनस्पतिजन्य दूध प्राणिजन्य दुधाच्या तुलनेत स्वस्त असते. त्यातच पारंपरिक गाई-म्हशीच्या दुधाची काहींना ‘ॲलर्जी’ पण असते. त्यामुळे वनस्पतिजन्य दुधाला काही जण प्राधान्य देताना दिसतात. ‘आयसीएआर’ने गाई-म्हशींच्या दुधाचा अभ्यास करताना त्याचे पोषणमूल्य, आहारातील महत्त्व हे ग्राहकांसमोर स्पष्टपणे मांडायला हवे. वनस्पतिजन्य दूध उत्पादक लॉबीने आपले दूध कसे चांगले आहे हे सांगताना प्राणिजन्य दुधाला कमी लेखण्याचे कारण नाही. दुसऱ्याला कमी लेखून स्वतःला पुढे जाण्याची स्पर्धा ही निकोप होऊ शकत नाही. प्राणिजन्य दुधापासून मिळणाऱ्या पोषणमूल्यांची उपयुक्तता मोठी  आहे. या दुधाचे महत्त्व अगदी प्राचीन काळापासून सिद्ध झालेले आहे.  त्यामुळे कुणाच्या अपप्रचाराने गाई-म्हशींच्या दुधाचे महत्त्व कमी होणार  नाही, हे दूध उत्पादकांसह प्रक्रिया-वितरण-विक्री करणाऱ्या संघांनी लक्षात घ्यायला हवे.

काही वनस्पतिजन्य दुधात प्रथिनांचे प्रमाण अत्यंत कमी असते. मुले तसेच वयोवृद्धांकडून अशा दुधाचे सातत्याने सेवन ही चिंतेची बाब ठरू शकते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com