राज्यातील दूध संकलन ३० लाख लिटरने घटले

सुदर्शन सुतार
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

राज्यातील दूध व्यवसाय अडचणीत आला आहे. गतवर्षी याच काळात दूध उत्पादनाचा सुकाळ होता. पण सध्या राज्यातील दूध संकलन प्रतिदिन एक कोटी ७० लाख लिटरपर्यंत खाली आले आहे.

सोलापूर - ओल्या दुष्काळामुळे ओढवलेल्या आपत्तीने पशुधनाची मोठी हानी झालीच, पण सध्या एकीकडे चाराटंचाई आणि दुसरीकडे पशुखाद्याचे वाढते दर, यामुळे राज्यातील दूध व्यवसाय अडचणीत आला आहे. गतवर्षी याच काळात दूध उत्पादनाचा सुकाळ होता. पण सध्या राज्यातील दूध संकलन प्रतिदिन एक कोटी ७० लाख लिटरपर्यंत खाली आले आहे.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

राज्याचे सर्वसाधारणपणे रोजचे संकलन पावणेदोन ते दोन कोटी लिटरपर्यंत आहे. पण सध्या त्यात सरासरी ३० लाख लिटरने घट झाली आहे. त्यातच परराज्यांतूनही दुधाची मागणी वाढते आहे, प्रसंगी ही तूट कशी भरून निघणार, हा प्रश्‍न आहे. दरम्यान, दुधाची ही अशी परिस्थिती असतानाही शेतकऱ्यांचा दुधाचा खरेदीदर मात्र जैसे थे आहे.  गेल्या दोन-तीन वर्षापासून दूध व्यवसाय वेगवेगळ्या कारणांनी अडचणीत आला आहे. त्यात सातत्याने दुष्काळाच्या आपत्तीची अधिक भर पडली आहे. यंदा पूरस्थिती आणि ओल्या दुष्काळाने या व्यवसायाचे गणितच बिघडवून टाकले. त्यात सर्वाधिक दूध उत्पादन असणाऱ्या पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, नगर, पुणे या भागातील दूध उत्पादनात अधिक घट झाल्याचे दिसून येते. त्याशिवाय मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद या भागातही हीच परिस्थिती आहे. ऑगस्ट ते जानेवारी हा दूधाचा पृष्ठकाळ समजला जातो, याच काळात दुधाची आवक वाढत असते. पण यंदा उलट परिस्थिती आहे. 

गेल्या वर्षी याच काळात प्रतिदिन दोन कोटी लिटरचे दूध संकलन होते. यंदा ते १ कोटी ७० लाख लिटरपर्यंत खाली आले आहे. साधारण ३० कोटी लिटरची तूट सध्या आहे. यामध्ये दुभत्या जनावरांचे पोषण हाच कळीचा मुद्दा ठरला आहे. ओल्या आणि सुक्‍या चाऱ्याची कमतरता, पशुखाद्याचे वाढते दर, यासारख्या अडचणीमुळे दुभती जनावरे सांभाळणे शेतकऱ्यांच्या आवाक्‍याबाहेरचे झाले आहे. सध्या शेतकऱ्यांकडील सुका चारा जवळपास संपला आहे, तर ओला चारा मिळणे आणखी काही दिवस दुरापास्त आहे. दुसरीकडे पशुखाद्याचे दर भरमसाठ वाढले आहेत. पूर्वी सुग्रासची ५० किलोची बॅग ७५० ते १००० रुपयाला मिळायची, आज ती १२०० ते १५०० रुपयांवर पोचली आहे. गोळीपेंड १५ ते २० रुपये किलो मिळायची, आज ती २२ ते २५ रुपयांपर्यंत प्रतिकिलो आहे. एकूण प्रतिजनावर दूध उत्पादनाचा खर्च, मिळणारे दूध आणि त्याचा खरेदी दर याचा मेळ बसत नसल्याने अडचण वाढली आहे. 

येत्या 24 तासांत महाराष्ट्रात 'या'; ठिकाणी होणार पाऊस

परराज्यातील ब्रॅंड महाराष्ट्रात,  पण फायदा नाही
गेल्या काही वर्षांपासून दूध उत्पादनाची ही स्थिती केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देशभरातही उद्भवली आहे. विशेषतः दक्षिण भारतातील छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि गुजरात या नजीकच्या राज्यातील हटसन, हेरिटेज, क्रिमलाईन, जर्सी, श्रीचक्रा, वल्लभा, तिरुमला यांसारखे अनेक ब्रॅंड महाराष्ट्रात दूध संकलनासाठी शेतकऱ्यापर्यंत पोचले आहेत. अर्थात, दूधदराची स्थानिक आणि परराज्यातील कंपन्यांमध्ये चांगली स्पर्धा निर्माण होऊ शकते. या स्पर्धेमुळे शेतकऱ्यांना अधिकचे पैसे मिळू शकतात. पण या व्यवसायातील ''एकी'' शेतकऱ्यांच्या खिशात जादाचे पैसे पडू देत नाही, असे चित्र आहे. 

शंभर कोटीचे दूध अनुदान थकले
गेल्या वर्षी याच काळात दूध संकलन प्रतिदिन दोन कोटी लिटरहूनही अधिक वाढले होते. त्यामुळे दुधाला जादा दर देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. त्या वेळी पिशवीबंद दूध वगळता उर्वरित दुधाला शासनाने प्रथम प्रतिलिटर ३ रुपये आणि नंतर ५ रुपये असे दूध पावडरसाठी अनुदान जाहीर केले. त्यातून शासनाने शेतकऱ्यांसाठी ठरवलेला खरेदीचा प्रतिलिटर २५ रुपयांचा दर शेतकऱ्यांना देणे शक्‍य व्हावे, हा उद्देश होता. पहिल्या तिमाहीत हे पैसे मिळालेही. पण नंतरच्या अनुदानाचे जवळपास १०० कोटी रुपये शासनाकडे अद्यापही थकीत आहेत. त्यामुळे दूध उत्पादकांचे गणित बिघडले.

औरंगाबादच्या मोसंबी कलमांची मध्य प्रदेशात ख्याती

दुधाची उपलब्धता आणि मागणी याचा विचार करून आम्ही खासगी दूध व्यावसायिक शासनापेक्षाही तीन रुपये अधिक म्हणजे सर्वाधिक २८ रुपये दर शेतकऱ्यांना देतो आहोत. ऑगस्टला ही वाढ करण्यात आली, गेल्या तीन महिन्यांपासून हाच दर आहे. सध्या उत्पादनात घट झाली आहे. पण लवकरच ती वाढेल. 
-प्रकाश कुतवळ, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य दूध व्यवसाय कल्याणकारी संघ

गेल्या वर्षीपेक्षा यंदा दूध उत्पादनात घट झाली आहे. माझे रोजचे संकलन पाच हजार लिटर होते, त्यात आता ५०० लिटरची घट झाली आहे. शासनाचे दूध अनुदान थकले आहे. स्वतःची साडेबारा लाख रुपयांची पदरमोड करून शेतकऱ्यांना २५ रुपयांप्रमाणे दर दिला. पण सरकारचे पैसे काही अद्याप मिळाले नाहीत.
-विजय लांडगे, दूध डेअरी चालक, देहरे, ता. जि. नगर

माझ्याकडे दोन म्हशी आणि एक गाय आहे. गाईच्या दुधाला प्रतिलिटरला कधी २२ ते २३ रुपये दर मिळतो. पण फॅट बसत नाही, असे सांगतात, आधीच उत्पादनात घट झाली आहे. पण आता कोण कोणाला विचारणार, अवघड झालं आहे.  
-महावीर हावळे, दूध उत्पादक, आळते, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर

सध्या दुधाचा दर शेतकऱ्यांना परवडूच शकत नाही. कोणाची आशा करायची नाही, २५ रुपयांनी काय मिळणार, त्यामुळे मी गेल्या काही दिवसांपासून थेट घरोघरी जाऊन दूध विकतो आहे. ७५ ते ८० रुपये प्रतिलिटर म्हणजे जवळपास तिपटीने दर मिळतो आहे. त्यात समाधान आहे.
-अप्पासाहेब शेळके, दूध उत्पादक, पळशी, ता. जि. औरंगाबाद

दूधदर ‘जैसे थे’
राज्यात शासन, सहकारी आणि खासगी अशा तीन स्तरावर दुधाची खरेदी होते. सध्या शासनाचा गाईच्या दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर २५ रुपये आणि म्हशीच्या दुधाचा ३४ रुपये आहे. खासगी संघ मात्र २८ रुपयांपर्यंत दर देत आहेत. वास्तविक दुधाची तूट विचारात घेता दूध दर आणखी दोन-तीन रुपयांनी वाढले पाहिजेत, पण राज्यात दूध संकलनात घट होऊनही आणि मागणी असूनही दूधाचे दर मात्र 'जैसे थे' आहेत. 

माझ्याकडे ११० गाई होत्या. पण चाराटंचाई, पशुखाद्याचे वाढलेले दर, यामुळे दूध व्यवसाय करणे कठीण झाले आहे. उत्पादन आणि खर्चाचा मेळच बसत नाही. त्यामुळे ३५ गाई काही दिवसांपूर्वीच विकल्या. त्याशिवाय अन्य पर्यायच नव्हता. माझ्यासारख्या अनेक शेतकऱ्यांची ही स्थिती आहे. यावर गांभीर्यपूर्वक विचार व्हायला हवा.
-पद्माकर भोसले, दूध उत्पादक, पापरी, ता. मोहोळ, जि. सोलापूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Milk collection in the state decreased by Thirty lakh liters