दूध खरेदीला तांत्रिक बाबींचा खोडा

दूध खरेदीला तांत्रिक बाबींचा खोडा

अकोला - शासकीय दूध संकलनात अनेक अडचणी आहेत.भंडारा येथील पावडर प्लांटमध्ये दूध वेळेत पोचवणे शक्य होते. परंतु भंडारा प्लांट बंद झाल्यापासून वऱ्हाडातील दुधाचा प्रश्‍न प्रामुख्याने चव्हाट्यावर आला. आता इतर ठिकाणी दूध द्यायचे म्हटल्यावर अनेक तास लागतील. या काळात दूध टिकणे, तसेच अल्कोहोल पॉझिटिव्हमुळे दूध नाकारले जावू शकते, यामुळे वऱ्हाडातील दूध खरेदीला खोडा निर्माण झाला आहे.

अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यांत सुमारे सहा हजार लिटरपेक्षा अधिक दूध संकलन होते. यातील दीड हजार लिटर दूध अकोल्यात पॅकिंग करून विकले जाते. उर्वरित दूध हे पावडर तयार करण्यासाठी भंडारा प्लांटला आजवर जात होते. मात्र, भंडारा येथील हा प्लांट बंद झाल्यापासून दररोजचे संकलित दूध पाठवण्याचा पेच तयार झाला. पर्याय म्हणून वारणा (कोल्हापूर) प्रकल्पाला हे दूध पाठवण्याचे ठरले. परंतु, अकोला ते कोल्हापूर हे अंतर व त्यासाठी लागणारा वेळ पाहता ही बाब परवडणारी नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अकोल्यातील संकलित दुधासाठी तोडगा म्हणून मध्यवर्ती दुग्ध शाळा वरळी (मुंबई) येथे पाठविण्यात येत आहे. 

पूर्वी तीन ते चार दिवसांचे दूध एकत्र करून ९००० लिटरचा टॅंकर भंडाऱ्याला जायचा. अंतर कमी असल्याने दूध वेळेत पोचत होते. आता ही परिस्थिती राहिलेली नाही. कोल्हापूर पावडर प्लांटला पाठवायचे तर अकोल्यातून निघणारा दुधाचा टॅंकर पोचायलाच अनेक तास लागतील अशावेळी हे दूध टिकणे, तसेच अल्कोहोल पॉझिटिव्हमुळे संबंधित प्लांटकडूनही स्वीकारणे शक्‍य नसल्याचे सूत्रांचे स्पष्ट म्हणणे होते. 

या भागात शासकीय संकलन केंद्रावर येणारे दूध हे एकवेळचे असते. ताजे दूध केंद्रावर यायला उशीर होतो. मुळातच उत्पादन कमी तसेच दळणवळणाची साधने कमी असल्याने बहुतांश ठिकाणी संकलित होणारे दूध हे दोन वेळचे एकत्र करूनच उत्पादक केंद्रांवर देतात. परिणामी, केंद्रावर संकलन केलेल्या दुधात अल्कोहोल पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण आहे. अशा प्रकारचे दूध अन्न सुरक्षा कायद्यानुसार पावडर बनविण्यासाठी वापरता येत नाही. या गोष्टींमुळे शासकीय दूध खरेदी एकीकडे दबावात सुरू असली तरी असंख्य तांत्रिक बाबींमुळे दिवसेंदिवस अडचणी वाढत चालल्या आहेत.

सध्याचे दूध संकलन
अकोला ३५००
बुलडाणा १५००
वाशीम ११००

म्हणून नको असते अल्कोहोल पॉझिटिव्ह दूध
दूध पावडर तयार करण्यासाठी दूध विशिष्ट तापमानावर तापवले जाते. ही प्रक्रिया करताना जर दूध फाटले तर उपयोगाचे नसते. त्यामुळे दुधाची पावडर करण्यापूर्वी त्यातील विविध निकष तपासले जातात. त्यात हा अल्कोहोलचा निकषही आहे. अन्न सुरक्षा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाल्यापासून हे निकष काटेकोर पाळले जात असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

...असे ठरते अल्कोहोलचे प्रमाण
प्लांटमध्ये अालेले दूध प्रक्रीयेसाठी वापरण्यापूर्वी प्रयोगशाळेत त्यातील काही दुधावर चाचणी घेतली जाते. विशिष्ट द्रावणासोबत त्याची तपासणी करून विविध घटकांप्रमाणेच अल्कोहोल किती अाहे हे तपासले जाते. या चाचणीत जर दुधात अल्कोहोलचे प्रमाण ६८ टक्क्यांवर निगेटीव्ह मिळाले तर ते दर्जेदार मानले जाते. पावडर तयार करण्यासाठी वापरले जाते. यापेक्षा टक्केवारी खाली अाली तर संबंधित दूध अयोग्य म्हणून रिजेक्ट केले जाते. अशा दुधापासून पावडत तयार होऊ शकत नाही. शिवाय प्रयत्न केला तर तांत्रिक अडचणी तयार होतात. अल्कोहोल मोजण्यासाठी प्रयोगशाळेत त्याची तपासणी करून निश्चित केले जाते. प्रामुख्याने शिळ्या दुधात अल्कोहोल पॉझिटीव्ह येण्याचे प्रमाण अधिक राहते, असे दूध विशिष्ट तापमानानंतर तत्काळ फाटते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com