दूधदराचा प्रश्न ऐरणीवर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 जानेवारी 2019

पुणे - राज्यात दूध भुकटी व बटरच्या दरात तेजी असूनही दुधाचे खरेदीदर न वाढविता शेतकऱ्यांची लूट चालू असल्याची टीका दूध उत्पादकांनी केली आहे. मात्र, भुकटीच्या दरातील तेजीमुळे सध्या फक्त आमचा तोटा थांबला अजून दरवाढी योग्य नफा झालेला नाही, असा दावा महाराष्ट्र दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने केलेला आहे. 

पुणे - राज्यात दूध भुकटी व बटरच्या दरात तेजी असूनही दुधाचे खरेदीदर न वाढविता शेतकऱ्यांची लूट चालू असल्याची टीका दूध उत्पादकांनी केली आहे. मात्र, भुकटीच्या दरातील तेजीमुळे सध्या फक्त आमचा तोटा थांबला अजून दरवाढी योग्य नफा झालेला नाही, असा दावा महाराष्ट्र दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने केलेला आहे. 

दूध भुकटीचे दर प्रतिकिलो १२० रुपयांपर्यंत घसरताच दूध उत्पादकांचे खरेदीदर प्रतिलिटर १८ रुपयांपर्यंत कमी करण्यात आले होते. दर कमी करणाऱ्या खासगी डेअरीचालक व सहकारी संघांना शेतकऱ्यांनीही पाठिंबा दिला होता. शेतकरी संघटनांनी देखील सरकारच्याच विरोधात आंदोलन पुकारले होते. त्यामुळे सरकारने दुधाला प्रतिलिटर पाच रुपये आणि भुकटीच्या निर्यातीसाठीही प्रतिकिलो ५० रुपये अनुदान जाहीर केले. 

‘‘सरकारी अनुदानामुळेच शेतकऱ्यांना सध्या २२ ते २५ रुपये दर राज्यात मिळतो आहे. आमच्याकडे व्यवस्थितपणे हिशेब सादर करणाऱ्या डेअरी किंवा संघांना एकट्या पश्चिम महाराष्ट्रातच ५५ ते ६० कोटींचे अनुदान वाटप केले गेले आहे. भुकटीच्या दरातही प्रतिकिलो ८० रुपयांची वाढ झाली आहे. मात्र, शेतकऱ्यांना दर वाढवून देण्यात आल्याचे अद्याप आमच्या निदर्शनास आलेले नाही,’’ अशी माहिती दुग्धविकास विभागाच्या सूत्रांनी दिली.  महाराष्ट्र दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने मात्र अनुदानाच्या पूर्ण रकमा अद्याप मिळालेल्या नसल्याचा दावा केला आहे. 

‘‘काेट्यवधींचे अनुदान जमा होण्याची सर्वजण वाट पहात आहेत. काहींना सप्टेंबर, ऑक्टोबरपासून रकमा मिळालेल्या नाहीत. एकट्या राजारामबापू पाटील सहकारी दूध संघांचे चार कोटींचे बिल मिळालेले नाही. भुकटीचे दर वाढून २०० रुपयांपर्यंत गेले हे खरे आहे. मात्र, त्यामुळे आम्ही नफ्यात आलेलो नाही. तोटा मात्र आता भरून निघत आहे. राज्य शासनाने भविष्यात पाच रुपये अनुदानाची योजना सुरू ठेवली नाही आणि भुकटीचे दर अजून वाढले नाही तर दुधाचे भाव पुन्हा कमी होवू शकतील. दूधदर किती रुपयांनी व केव्हा कमी होतील याचा अंदाज आता बांधता येत नाही, अशी माहिती संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी दिली. 

ग्राहक आणि शेतकऱ्यांची लूटः डेरे
कल्याणकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष गुलाबराव डेरे यांनी सरकारच्या दुर्लक्षामुळे ग्राहक आणि शेतकऱ्यांची पद्धतशीर लूट सुरू असल्याची खंत व्यक्त केली आहे. ‘‘पश्चिम महाराष्ट्रातील अनेक दूध संस्था शेतकऱ्यांना २५ रुपयांप्रमाणेच पेमेंट करीत आहेत. मात्र, राज्यात इतरत्र एसएनएफ आणि फॅटसच्या निकषाखाली लूट सुरू आहे. ३.५ फॅट्सच्या पुढे ३० पैसे न देता पॉइंटला फक्त दहा पैसे शेतकऱ्यांना मिळतात. एसएनएफमध्ये दोन रुपये आणि फॅटसमध्येही अनेक भागांत दोन रुपये असा चार रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसतो. आमच्याकडून २०-२२ रुपयांनी घेतले जाणारे दूध ग्राहकांना ४० रुपयांना विकले जाते. मग ही मधली मलई कोण खात आहे, असा सवाल श्री. डेरे यांनी उपस्थित केला आहे. 

राज्यात ३.२ फॅटस् व ८.३ एसएनएफच्या निकषाप्रमाणे दूध विकले जात नाही. शेतकऱ्यांची लूट आणि ग्राहकांना दर्जेदार दुधाचा पुरवठा न करण्यास शासनाचे धोरण जबाबदार आहे. त्यामुळेच केंद्राचे निकष न पाळता टोन्ड दुधाला पाठिंबा दिला जात आहे. भेसळ रोखायची नाही ही सरकारचीच इच्छा आहे, असेही श्री. डेरे यांनी स्पष्ट केले.

दुधाला भाव नाही आणि पशुखाद्य महागले
राज्यातील दुष्काळी स्थितीमुळे दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झालेले आहेत. सरकी ढेपचे दर प्रतिक्विंटल १७०० रुपयांवरून २४०० रुपये, उसाचे दर प्रतिटन  १७०० रुपयांवरुन ३५०० रुपये झाले आहेत. धान्य भुस्सा ९५० रुपयांनी विकत घ्यावा लागत आहे. जनावरांना पाण्याची तीव्र टंचाई भासते आहे. भुकटीचे वाढलेले दर आणि दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्याला किमान ३० रुपये सध्या आणि पुढील महिन्यानंतर ३५ रुपये दूधदर देण्याची गरज आहे, असे दूध उत्पादक संघाने नमूद केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: milk rates issue