विविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील शेतीचा आदर्श   

विविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील शेतीचा आदर्श   

भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध तंत्रज्ञानांचा अवलंब करण्यामध्ये  आघाडीवर असतात. सोयाबीनच्या विविध वाणांचे बीजोत्पादन, हळदीच्या नव्या वाणाची लागवड, निंबोळी पावडरनिर्मिती, गांडूळखतनिर्मिती, पशुपालन अशा विविध उपक्रमांमधून त्यांनी प्रयत्नवाद, सातत्य, कौशल्यपूर्ण व्यवस्थापनाचा प्रत्यय दिला आहे. उत्पन्नाच्या विविध स्रोतांमधून आर्थिक सक्षमता प्राप्त केली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील भोसी (ता. कळमनुरी) येथील गोरखनाथ महाजन हाडोळे यांनी बारावी (विज्ञान) पर्यंतच्या शिक्षणानंतर १९८९ पासून पूर्ण वेळ शेती करण्यास सुरवात केली. त्यांची भोसी शिवारात दोन ठिकाणी हलक्या ते मध्यम प्रतीची १५ एकर शेती आहे. एक विहीर आहे. सुरवातीच्या काळात सुमारे २० वर्षे त्यांनी भाजीपाला शेती केली. पुढे मजूर समस्या व पाणी यांमुळे त्यांना ही शेती अडचणीची ठरू लागली. 

पीकबदल व तंत्रज्ञान स्वीकार 
मजूरबळ, पाणी व दर या समस्यांशी तोंड देताना पीकबदल व सुधारित तंत्रज्ञानाचा स्वीकार या दोन बाबींवर गोरखनाथ यांनी भर दिला. तोंडापूर (ता. कळमनुरी) येथील कृषी विज्ञान केंद्रातील (केव्हीके) तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब सुरू केला. 

गोरखनाथ यांची आजची शेती
  सोयाबीन, कपाशी   कपाशीतील कीड, दर, मजूर अशा समस्या ओळखून हळदीचा पर्याय   तुरीत सोयाबीन    पाण्याच्या उपलब्धतेनुसार हरभरा आणि ज्वारी 
सोयाबीन बीजोत्पादन 
    चार वर्षांपासून बियाणे क्षेत्रातील कंपनीसाठी सोयाबीनच्या विविध वाणांचे बीजोत्पादन
    खुल्या बाजारातील दरांपेक्षा त्याद्वारे २५ ते ३० टक्के जादा दर
    सोयाबीनची रुंद वरंबा सरी पद्धतीने लावण होते. 
    त्यातून मूलस्थांनी जलसंधारण घडते. अवर्षणाच्या स्थितीत पीक पाण्याचा ताण सहन करते. 
    खंड काळात तुषार संचाचे पाइप अंथरण्यासाठी तसेच फवारणीसाठी शेतातून चालणे सोपे होते.
    या तंत्राद्वारे एकरी उत्पादनात दोन क्विंटलने वाढ. एकरी १० ते १२ क्विंटल उत्पादन.  

टोकण पद्धतीने लागवड 
  यंदा टोकण पद्धतीनेही सोयाबीन लागवड   ट्रॅक्टरच्या साह्याने प्रत्येकी चार फूट अंतरावर तीन फूट रुंद आणि पाऊण फूट उंच गादीवाफे    एक फूट बाय सहा इंच ठेवून टोकण पद्धतीने लावण. प्रतिएकरी १२ किलो बियाणे लागले. यातून चांगले उत्पादन अपेक्षित. 

कमी कालावधीच्या  हळद वाणाचा प्रयोग 
हळदीसाठी गादीवाफा पद्धत वापरली जाते. आजवर सेलम वाण घेत. दोन वर्षांपूर्वी केव्हीकेच्या माध्यमातून प्रगती वाणाचा प्रयोग केला. २५ किलो बियाण्यापासून साडेसहा क्विंटल ओले उत्पादन मिळाले. त्या बियाण्यापासून मागील वर्षी एकरात प्रयोग केला. जूनला लागवड केलेली हळद डिसेंबरमध्ये काढणीस आली. त्याचे एकरी १०३ क्विंटल ओले उत्पादन मिळाले. त्यातील ८७ क्विंटल बियाण्याची ३५०० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री केली. या वाणामुळे डिसेंबरमध्ये रान मोकळे होत असल्याने पुढील पिकाचा पर्याय तयार राहतो असे गोरखनाथ सांगतात. 

निंबोळी पावडर, गांडूळ खतनिर्मिती 
    परिसरातील गावातून दरवर्षी जूनमध्ये १०० ते १५० क्विंटल निंबोळी खरेदी करून ती उन्हात वाळवतात. यंत्राव्दारे पावडर बनवितात. 
    कीड नियंत्रणसाठी शेतकऱ्यांना त्याची प्रतिक्विंटल २५०० रुपये दराने विक्री 
    कृषी विभागाच्या योजनेतून गांडूळखत युनिट. सुमारे तीन महिन्यांच्या कालावधीत प्रति हौदातून पाच क्विंटल खतनिर्मिती. शेतात वापरुन उर्वरित खताची विक्री.
    दोन्ही पूरक व्यवसायातून उत्पन्न वाढण्यास मदत.  
देशी गोवंशाचे संगोपन 
लहान- मोठी धरून स्थानिक जातीची ३० ते ४० जनावरे आहेत. दरवर्षी १६ ट्रॅाली शेणखत मिळते. त्याचा उपयोग संपूर्ण शेतीला होतो. गोमूत्र प्लॅस्टिक टाक्यांमध्ये साठवले जाते. ठिबकव्दारे ते शेताला देण्यात येते. 

जल व्यवस्थापन 
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत शेतातील नाल्याचे रूंदी व खोलीकरण करुन सिमेंट बंधारा बांधला आहे. त्यातून निघालेली माती आणि मुरुम नाल्याच्या दोन्ही बाजूने टाकल्यानंतर त्यावर वृक्ष लागवड केली. त्याचा फायदा म्हणजे बंधाऱ्यात मातीचा गाळ जमा होत नाही.काही वर्षांपूर्वी पावसाचे पाणी व त्याबरोबर मातीचा सुपीक थर वाहून जायचा. सिमेंट बंधारा आणि नाला खोलीकरणामुळे पावसाच्या पाण्याची साठवण बंधाऱ्यात होत आहे. त्यातून विहिरीची भूजल पातळी वाढण्यास मदत झाली आहे.  विहिरीत बोअरचे पाणी आणून सोडले आहे. ते पिकांना ठिबकव्दारे देण्यात येते. 

तज्ज्ञांचे मार्गदर्शन....
तोंडापूर केव्हीकेचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पी. पी. शेळके, विशेषज्ञ राजेश भालेराव, अनिल ओळंबे, अजय सुगावे यांच्या संपर्कात गोरखनाथ कायम असतात. केव्हीकेतर्फे त्यांच्या विविध पीक पद्धतीचे प्रयोग घेण्यात येतात. त्याचाच भाग म्हणून गेल्यावर्षी कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी गोरखनाथ यांच्या शेतात ‘मास ट्रॅपिंग’ फेरोमोन ट्रॅप्स लावण्यात आले. त्यामुळे बोंड अळीचे योग्य नियंत्रण झाले. गोरखनाथ यांच्या प्रयोगशीलतेमुळे केव्हीकेच्या शास्त्रीय सल्लागार समितीवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

टुमदार घर, मुलांचे शिक्षण : गोरखनाथ यांचे गावात जुने घर होते. मात्र शेती व पूरक व्यवसायातून मिळवलेल्या उत्पन्नातून यंदा शहरी धाटणीचे बंगलावजा सुंदर घर बांधले आहे. शेतीतील उत्पन्नातूनच मुलांना त्यांनी उच्च शिक्षण दिले. मोठा मुलगा बालाजी ग्रामपंचायतीत संगणक परिचालक आहे. धाकटा मुलगा नितिन तसेच मुलगी मिनाक्षी कृषी पदवीधर आहेत.

  गोरखनाथ हाडोळे, ८८८८९९५६५५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com