बीजोत्पादनातून वाढविला आर्थिक नफा

डॉ. टी. एस. मोटे
शुक्रवार, 9 जून 2017

पोखरभोसी (ता. लोहा, जि. नांदेड) येथील बळिराम ताटे यांनी पारंपरिक पिकांएेवजी भाजीपाला बीजोत्पादनावर लक्ष केंद्रित केले. बीजोत्पादनाचे प्रशिक्षण घेऊन त्यांनी गुणवत्तापूर्ण बियाणे उत्पादनात हातखंडा मिळविला. सुधारित तंत्राचा अवलंब करीत शेती आर्थिकदृष्ट्या शाश्वत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

पोखरभोसी (ता. लोहा, जि. नांदेड) येथील बळिराम ताटे यांनी पारंपरिक पिकांएेवजी भाजीपाला बीजोत्पादनावर लक्ष केंद्रित केले. बीजोत्पादनाचे प्रशिक्षण घेऊन त्यांनी गुणवत्तापूर्ण बियाणे उत्पादनात हातखंडा मिळविला. सुधारित तंत्राचा अवलंब करीत शेती आर्थिकदृष्ट्या शाश्वत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

नांदेड जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी गेल्या काही वर्षांत खासगी कंपन्यांच्या मदतीने संकरित भाजीपाला बीजोत्पादनाकडे वळले. अशा या प्रयोगशील शेतकऱ्यांपैकी एक आहेत पोखरभोसी (जि. नांदेड) येथील बळीराम कोंडीबा ताटे. त्यांची साडेपाच एकर शेती आहे. यामध्ये दोन एकरावर विविध भाजीपाला पिकांचे बीजोत्पादन केले जाते. तर दोन एकरावर बीटी कपाशी आणि एक एकरावर हळद लागवड असते. कामाजी, सूर्यकांत, विठ्ठल आणि कोंडिबा ही मुलेदेखील शेती नियोजनात सहभागी आहेत. ताटे यांच्या एकत्रित कुटुंबातील अकरा जण वर्षभर शेती नियोजनात असतात. पारंपरिक पीक लागवडीपेक्षा त्यांनी बीजोत्पादनावर लक्ष केंद्रित केले. गेल्या ३५ वर्षापासून ते संकरित कापसाचे बीजोत्पादन घेत आहेत. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन बळीराम ताटे यांनी गेल्या वर्षापासून संकरित भाजीपाला बीजोत्पादनास सुरवात केली. 

 बीजोत्पादनातून शेती विकास 
 बीजोत्पादनाबाबत बळीराम ताटे म्हणाले की, मी गेल्या वर्षीपासून हंगामनिहाय मिरची १० गुंठे, टोमॅटो १० गुंठे, भेंडी १३ गुंठे, कारले १० गुंठे, वांगे १३ गुंठे, दुधी भोपळा १ एकर १० गुंठे, दोडका १० गुंठे  क्षेत्रावर बीजोत्पादन घेतो. या व्यतिरिक्त २० गुंठ्यावर बी.टी. कपाशीचे बीजोत्पादन असते. टोमॅटो,मिरचीचे बीजोत्पादन कीड प्रतिबंधक जाळीगृहात घेतले जाते. बाकीची भाजीपाला पिके शेतीमध्ये घेतली जातात. बीजोत्पादन घेण्यापूर्वी मी आणि माझ्या चारही मुलांनी देऊळगाव राजा (जि.बुलडाणा) येथील प्रयोगशील बीजोत्पादक शेतकऱ्यांच्याकडून तांत्रिक प्रशिक्षण घेतले. तसेच बियाणे कंपनीचे अधिकारी, कृषी विभागातील तज्ज्ञांकडून वेळोवेळी मार्गदर्शन घेतो. बीजोत्पादनातून मला पारंपरिक पिकांपेक्षा चांगला नफा झाला. त्यामुळे यावर्षीदेखील मी भाजीपाला बीजोत्पादनावर लक्ष केंद्रित केले आहे. 

संकरित मिरची, टोमॅटोचे बीजोत्पादन
बळिराम ताटे यांनी दहा गुंठ्यांची दोन कीटक प्रतिबंधक जाळीगृहांची उभारणी मिरची व टोमॅटो बीजोत्पादनासाठी केली. यामुळे कीड, रोग नियंत्रण करणे सोपे झाले. जाळीगृहाचे पैसे बियाणे कंपनी पुढील पाच वर्षामध्ये बीजोत्पादनातून वसूल करणार आहे. मिरचीच्या बीजोत्पादनाबाबत ताटे म्हणाले की, मिरचीच्या नर व मादी रोपांचा पुरवठा कंपनीतर्फे केला जातो. गादीवाफा तयार करून त्यावर ठिबक सिंचनाची लॅटरल अंथरून प्लॅस्टिक कागदाचे आच्छादन केले. मादी वाणाच्या २३ ओळी (५२० झाडे) आणि ४ ओळी (२५० झाडे) नर वाणाची लागवड केली. मादी वाणाची लागवड ३.५ x ३.५ फुटांवर तर नर वाणाची लागवड ३ x ३ फुटांवर केली. प्रत्येक रोपाला बांबूचा आधार दिला जातो. फांद्या सुतळीने बांधण्यासाठी प्रत्येक ओळीवर ९ फूट उंचीवर तार बांधली. लागवडीनंतर ४५ दिवसांनी फुले आल्यानंतर पुढे ३५ परागीकरणाचे काम चालते. कळीचा डोम काढण्याच्या अगोदर परागसिंचन केलेले फूल ओळखता यावे म्हणून देठाला पांढरा दोरा बांधला जातो. त्यानंतर परागीकरण केले जाते. परागीकरणासाठी प्रति दिन १० मजूर लागतात. परागीकरणानंतर ४५ दिवसांनी मिरच्या पिकू लागतात. पिकलेल्या मिरच्यांची ४ ते ५ वेळा तोडणी केली जाते. मिरच्या यंत्रामध्ये टाकून बियाणे वेगळे केले जाते. दहा गुंठ्यातून गेल्या वर्षी ६५ किलो बियाणे मिळाले. संकरित मिरची बीजोत्पादनात खर्च वजा जाता दीड लाख रुपये नफा मिळाला. संकरित टोमॅटोचे बीजोत्पादन देखील दहा गुंठे कीटक प्रतिबंधक जाळीगृहात घेतले. दहा गुंठ्यातून१४ किलो बियाणे मिळाले. खर्च वजा जाता लाखाचा नफा मिळाला.

संकरित भेंडी
बळिराम ताटे म्हणाले, की गेल्या वर्षी १३ गुंठे क्षेत्रावर जुलै महिन्यात ४ × १.५ फुटावर लागवड केली. लागवडीसाठी १५ ग्रॅम मादी आणि ७० ग्रॅम नर वाणाचे बियाणे लागले. लागवडीनंतर एक महिन्यात  परागीकरणास सुरवात केली. परागीकरणाचे काम तीन मजूर एक महिनाभर करतात. गेल्या वर्षी सततच्या पावसाने फक्त ७० किलो बीजोत्पादन झाले. खर्च वजा जाता १८ हजाराचा नफा झाला. 

संकरित कारले
ताटे यांनी गेल्या वर्षी दहा गुंठे क्षेत्रावर जून महिन्यात ५ × ३ फुटांवर कारल्याची लागवड केली. कंपनीने १५० ग्रॅम मादी व ५० ग्रॅम नर वाणाचे बियाणे दिले. लागवडीनंतर ५० दिवसात परागीकरणाचे काम सुरू झाले. हे काम एक महिना चालते. काटेकोर पद्धतीने बीजोत्पादन करावे लागते. परागीकरण झाल्यावर २५ दिवसांनी फळ पिकते. त्यातून बियाणे वेगळे केले जाते. गेल्या वर्षी बीजोत्पादनातून ५४ हजार नफा झाला. 

संकरित वांगे 
ताटे यांनी गेल्या वर्षी तेरा गुंठे क्षेत्रावर वांग्याचे बीजोत्पादन घेतले. अॉक्टोबर महिन्यात कंपनीकडून नर आणि मादी वाणाची रोपे मिळाली. लागवड ५ × ३ फुटांवर केली. नर वाणाच्या ४ ओळी (५०० झाडे) आणि मादी वाणाच्या १० ओळी (१३०० झाडे) लावल्या. लागवडीनंतर दोन महिन्यानंतर परागीकरणाचे काम सुरू झाले. केले. पुढे एक महिना हे काम सुरू राहिले. यासाठी पाच मजूर लागले. वांग्याचे बीजोत्पादन काटेकोरपणे करावे लागते.  परागीकरणानंतर वांगे पिकण्यासाठी ४५ दिवस लागतात. पिकलेले वांगे तोडून त्यातुन बी वेगळे केले जाते. यंत्राने फळातील बियाणे वेगळे केले जाते. बीजोत्पादन पूर्ण होण्यास पाच महिने लागतात. तेरा गुंठ्यातून ४० किलो बियाणे मिळाले. खर्च वजा जाता तीस हजाराचा नफा झाला. 

दुधी भोपळा
गेल्या वर्षी ताटे यांनी ५० गुंठे क्षेत्रावर दुधी भोपळ्याचे बीजोत्पादन घेतले. याबाबत ते म्हणाले की, नोव्हेंबर महिन्यात ८ × ३ फुटावर लागवड केली. ५० गुंठे क्षेत्रामध्ये मादी वाणाची १३०० आणि नर वाणाची ७०० झाडे बसली. लागवडीनंतर ४५ दिवसांनी सतत आठ दिवस परागीकरणाचे काम सुरू राहाते. एका वेलीच्या केवळ पाच ते सहा फुलांवर परागीकरण केले जाते. वेलीवरील बाकीची फुले तोडून टाकली जातात. प्रत्येक फांदीवर फक्त एकच फळ धरले जाते. पाचही फांद्यावर एकाच दिवशी परागीकरण करावे लागते. मला या बीजोत्पादनातून तीस हजाराचा नफा झाला. 

संकरित दोडका
कंपनीकडून नर व मादीचे बियाणे मिळाल्यानंतर दहा जून रोजी दहा गुंठे क्षेत्रावर ४ × ३ फुटांवर लागवड केली. साधारणपणे १००० मादी व ४०० नर वाणाची झाडे बसली. लागवडीनंतर एका महिन्याने परागीकरण सुरू होते. पुढे हे काम एक महिना सतत चालले. परागीकरणानंतर दीड महिन्याने फळ पक्व होते. पक्व फळे तोडून वाळवली जातात. त्यानंतर बियाणे वेगळे केले जाते. दहा गुंठ्यातून ७० किलो बियाणे मिळाले. यातून पन्नास हजाराचा फायदा झाला.

बियाणे वेगळे करण्यासाठी यंत्र 
मिरची, वांगे, टोमॅटोचे बियाणे वेगळे करण्यासाठी ताटे आणि त्यांच्या दोन सहकारी शेतकऱ्यांनी वीस हजार रुपयांना बियाणे वेगळे करण्याचे यंत्र खरेदी केले. या यंत्राला मोटार जोडलेली आहे. या यंत्रात मिरची, वांगी, टोमॅटोची टणक फळे टाकली जातात. यंत्रातून बियाणे आणि टरफल वेगवेगळे होते. 

परागसिंचनासाठी अंगठी
मिरची, वांगी, टोमॅटो इत्यादी भाजीपाला पिकांच्या परागसिंचनासाठी बळिराम ताटे हे विशिष्ट पद्धतीची अंगठी वापरतात. अंगठीमध्ये खडा बसवण्याच्या जागी कुपी असते. यात नरफुलातील परागकण भरले जातात. मादी फुलातील स्टिग्मा अंगठीच्या कुपीत बुडवून परागीकरण केले जाते.

Web Title: nanded news agro news agriculture