एक लाख टन द्राक्ष राज्यातून निर्यात; उत्पादकांना दिलासा

प्रतिनिधी
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

कोरोना विषाणूमुळे राज्यातील द्राक्ष निर्यात थांबली होती. मात्र, ३० मार्चपासून निर्यात पुन्हा सुरू झाली असून तीन दिवसांत ६८ कंटेनरद्वारे जवळपास एक हजार २० टन द्राक्ष निर्यात झाली आहे.

पुणे - कोरोना विषाणूमुळे राज्यातील द्राक्ष निर्यात थांबली होती. मात्र, ३० मार्चपासून निर्यात पुन्हा सुरू झाली असून तीन दिवसांत ६८ कंटेनरद्वारे जवळपास एक हजार २० टन द्राक्ष निर्यात झाली आहे. त्यामुळे द्राक्ष निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चालू वर्षी निर्यातीसाठी सुमारे ३८ हजार द्राक्ष बांगांची नोंदणी झाली आहे. काही शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यात सुरू केली होती. राज्यातून २१ मार्चपर्यंत पाच हजार ६०० कंटेनरद्वारे जवळपास ७८ हजार टन द्राक्ष नेदरलॅंड, युके, जर्मनीला पाठविण्यात आले होते. मात्र, शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन केल्यामुळे वाहतूक सुविधा बंद झाल्याने निर्यात ठप्प झाली होती. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. 

शासनाने पुढाकार घेऊन अत्यावश्यक सेवेमध्ये फळे व भाजीपाल्याचा त्याचबरोबर खते, बियाणे, कीटकनाशके, डिझेल यांचाही समावेश केला. याशिवाय निर्यातीसाठी आवश्यक असलेले कंटेनर चालू ठेवण्याचे आदेश दिले. तसेच मुंबईतील जेएनपीटी बंदर सुद्धा सुरू करण्याचे नियोजन केले. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसह इतर शेतकऱ्यांना बऱ्यापैकी फायदा मिळाला. 

कृषी विभाग, अपेडा, निर्यातदार संस्था आणि एनआरसी ग्रेप यांच्यामार्फत संबंधित विभागाच्या समन्वयाने निर्यात सुरू झाली आहे. त्यामुळे १ एप्रिलपर्यंत युरोपला ७९ हजार ५०० टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. निर्यात सुरू झाल्यानंतर ३० मार्च रोजी द्राक्षाचे ३८ कंटेनर युरोपला पाठविण्यात आले. तर ३१ मार्चला १९ तर एक एप्रिलला ११ असे एकूण ६८ कंटेनर द्राक्ष निर्यात झाली आहे. 

राज्यातील सांगली, नाशिक, सोलापूर, लातूर या भागातून द्राक्षाची निर्यात सुरू झाली असून सर्वाधिक निर्यात सांगली, नाशिक या जिल्ह्यातून झाली आहे. निर्यातीसोबत स्थानिक बाजारपेठेत उत्पादक ते ग्राहक अशी गटांमार्फत विक्री सुरू केली आहे. त्यासाठी आवश्यक असणारे परवानेही मिळवून देण्यासाठी कक्षाची उभारणी केली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मदत होऊ  लागली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या निर्यात कक्षांच्या सूत्रांनी दिली. 

कांद्याच्या १२ कंटेनरची निर्यात 
द्राक्ष निर्यातीव्यतिरिक्त सांगली येथून कांद्याची १२ कंटेनरमधून जवळपास २२० टन निर्यात झाली आहे. तसेच डाळिंबाची एक कंटेनरद्वारे १४ ते १५ टन निर्यात झाली. कृषी विभागामार्फत दररोज निर्यातीचा आढावा घेतला जात आहे. नाशिक येथील एनएचआरडीएफची कीडनाशक उर्वरित  अंश प्रयोगशाळा सुरू केली आहे. तेथे निर्यातक्षम द्राक्ष बागायतदारांचे नमुने तपासणीचे काम सुरू आहे. 

जिल्हानिहाय द्राक्ष कंटेनरची झालेली निर्यात 
जिल्हा --- ३० मार्च -- ३१ मार्च -- १ एप्रिल --- एकूण 
सांगली -- १८ --- ३ -- ५ -- २६ 
नाशिक -- १७ -- १४ -- ५ -- ३६ 
सोलापूर -- २ --२ -- १ -- ५ 
लातूर -- १ -- ० --- ० --- १ 
एकूण -- ३८ -- १९ -- ११ -- ६८ 

कोरोना विषाणूमुळे द्राक्षासह सर्वच शेतीमालाची निर्यात थांबली होती. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ लागले होते. शासनाने फळे, भाजीपाला यांच्यासह विविध बाबींचा अत्यावश्यक सेवेमध्ये समावेश केल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमालाची विक्री व निर्यात करणे शक्य झाले आहे. याचा शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. 
गोंविद हांडे, सल्लागार, निर्यात विभाग, कृषी विभाग, पुणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One lakh tonnes of grapes exported from the state