खरेदी-विक्री फेरफार नोंदी लवकरच ऑनलाइन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

गैरप्रकारांना आळा बसणार 
दस्त नोंद झाल्यानंतर नोटीस बजावण्यासाठी तलाठ्यांना अनेकदा पत्ते सापडत नाहीत. दस्तावर असलेल्या पत्त्यावर नोटीस पाठवल्यानंतर ती परत येण्याचे प्रकार अनेकदा घडतात. त्यामुळे दस्ताच्या नोंदी लांबतात किंवा पत्ता सापडत नसल्याने एकतर्फी सातबारा उतारा केला जातो. यात काही वेळा ठरवून असे प्रकार केले जात असल्याचा आरोप जमीनमालकांकडून केला जातो; परंतु नव्या ऑनलाइन प्रक्रियेमुळे मूळ मालकाला जागेवरच नोटीस दिली जाणार असल्याने अशा गैरप्रकारांना आळा बसणार आहे. 
 

नाशिक - दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी-विक्री दस्ताची नोंदणी झाल्यानंतर त्याच्या फेरफार नोंदी घेण्याचे काम आता ऑनलाइन केले जाणार आहे. त्यामुळे यापुढे हस्तलिखित पद्धतीऐवजी ई-फेरफार पद्धतीने जलदगतीने कामकाज होणार आहे. जिल्ह्यात येत्या १ मे रोजी या योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. ऑनलाइन सुविधेमुळे दस्त नोंदणीनंतर अवघ्या काही तासांत फेरफार नोंदी आणि खरेदीची नोटीस बजावण्याचे काम होणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी दिली. 

राज्यातील तहसील, दुय्यम निबंधक आणि भूमी अभिलेख कार्यालये एकमेकांना जोडण्याचा आणि सर्व व्यवहार ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून पायलट प्रोजेक्ट राबवला जात आहे. यात सुरवातीला सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड झाली होती. त्यात सर्व सातबारा सर्वप्रथम ऑनलाइन करण्यात आले. त्यानंतर आता जुने फेरफार, खरेदी खते यांच्या डिजिटलायजेशनचे काम सुरू आहे. यानंतर संपूर्ण राज्यात ही प्रणाली सुरू करण्यात आली. आता १ मे महाराष्ट्र दिनापासून फेरफार नोंदणी ऑनलाइन होणार आहे. दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तांची नोंदणी झाल्यानंतर प्रत्यक्षात फेरफार नोंद होण्यास विलंब लागतो. फेरफार नोंदीनंतर संबंधित विक्रेत्याला नोटीस बजावण्यापासून सातबारा उतारा नोंदवण्यापर्यंतचा कालावधी मोठा असतो. त्यात अनेकदा दस्तामध्ये त्रुटी राहून जातात. तसेच दस्त झाल्यानंतरही नोटीस बजावताना गोलमाल होण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे राज्य शासनाने दस्त नोंदणीची ऑनलाइन सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

ऑनलाइन दस्त नोंदणीची संगणक प्रणाली राष्ट्रीय माहिती संस्थेने (एनआयसी) विकसित केली आहे. दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी झाल्यावर तहसील कार्यालयातील संगणकावर हा दस्त दिसणार आहे. दस्ताची कार्यवाही पूर्ण झाल्यावर तहसीलदार फेरफार नोंदीचे काम करतील. त्यानंतर मूळ मालकाला खरेदी-विक्रीवर आक्षेपाबाबतची नोटीस जागेवरच बजावण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्या वेळी संबंधित तलाठ्याला एसएमएसद्वारे दस्ताची माहिती व नोटीस बजावण्याचे काम दिले जाणार आहे. तलाठ्याला ही माहिती दिल्याखेरीज फेरफार नोंद चढवली जाणार नाही, अशीही व्यवस्था यात असणार आहे. नोंदणीकृत दस्तावेजाने होणाऱ्या फेरफार नोंदी घेतल्यानंतर दुय्यम निबंधकासमोर समक्ष उपस्थित राहून दस्तावर सही करणाऱ्या पक्षकारास परत एकदा संबंधित तलाठ्यासमोर उपस्थित राहण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे विलंब टाळून अधिकार अभिलेख वेळीच अद्ययावत होतील व त्यामध्ये पारदर्शकता येईल, असा विश्‍वास मंगरुळे यांनी व्यक्त केला. 

१० तालुक्यांत काम पूर्ण 
दस्त नोंदणी होताच त्याची माहिती आज्ञावलीद्वारे तहसील कार्यालयातील म्युटेशन सेलला तत्काळ उपलब्ध करून दिली जाईल. त्याआधारे फेरफार नोंद घेऊन नमुना ९ ची नोटीस तयार करून तलाठ्यास तशी नोंद घेण्याचा एसएमएस किंवा ई-मेल केला जाईल. त्यानुसार तलाठी किंवा सर्व्हेअर फेरफार नोंदवहीत नोंद घेऊन पुढील कार्यवाही करतील. नाशिक जिल्ह्यात नाशिक, नांदगाव, निफाड, मालेगाव तालुक्यात ऑनलाइन सातबारा नोंदणीचे काम अपूर्ण असल्याने सुरवातीला या तालुक्यात ऑनलाउन दस्त नोंदवता येणार नाही. मात्र, उर्वरित १० तालुक्यांमध्ये ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. 

 

Web Title: online document entry