सेंद्रिय पद्धतीने भाताचे ८० किलो प्रती गुंठा उत्पादन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 डिसेंबर 2018

चिपळूण - यावर्षी तालुक्‍यात भात पिकांच्या उत्पन्नाच्या स्पर्धेत पाचाडचे शेतकरी अनंत कांबळी यांनी ८० किलो प्रती गुंठा उत्पादनाचा विक्रम नोंदवला. दरवर्षी भाताचे उत्पादन दहा किलो प्रती गुंठा वाढ दिसून आली आहे.

चिपळूण - यावर्षी तालुक्‍यात भात पिकांच्या उत्पन्नाच्या स्पर्धेत पाचाडचे शेतकरी अनंत कांबळी यांनी ८० किलो प्रती गुंठा उत्पादनाचा विक्रम नोंदवला. दरवर्षी भाताचे उत्पादन दहा किलो प्रती गुंठा वाढ दिसून आली आहे.

पाचाडचे शेतकरी अनंत कांबळी यांनी उत्पादनवाढीसाठी मागील काही वर्षापासून प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी सगुणा तंत्राचा उपयोग करण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी त्यांच्या शेतात लागवडीसाठी सेंद्रिय गादी वाफे तयार केले. एकदा गादी वाफे केल्यानंतर दरवर्षी भातपिकाची मुळे त्यातच कुजवतात. त्यामुळे सेंद्रिय कर्ब वाढून दरवर्षी उत्पादन वाढते, असा अनुभव आहे. तसेच पंधरा वर्षे शेतात नांगरणी व इतर मशागतीची कामे करावी लागत नाहीत.

मागील वर्षी ७० किलो प्रती गुंठा असे उत्पादन अनंत कांबळी यांना झाले होते. त्यासाठी एचएमटी सोना हे वाण वापरले. सेंद्रिय कर्बामुळे भात पिकाची वाढ अगदी चार फुटांपर्यंत झाली. 
उत्कृष्ट सेंद्रिय गादी वाफ्यामुळे यावर्षी त्यांना ८० किलो प्रती गुंठा असे उत्पादन झाले. भात पिकाच्या उत्पादन वाढीचा हा उच्चांक मानला जातो. याच पद्धतीने गादी वाफ्यामुळे दरवर्षी उत्पादनाचा आकडा किमान सात ते दहा किलो प्रती गुंठा असा वाढतो. याच गादी वाफ्यावर दुसऱ्या हंगामात श्री. कांबळे यांनी मुळा, माठ, चवळी व पावटा अशी भाजीपाला पिकेदेखील घेतली आहेत.

सेंद्रिय गादी वाफ्यामुळे दरवर्षी भाताचे उत्पादन किमान दहा किलो प्रती गुंठा असे वाढले. या शिवाय भातानंतर पुढील पिकांची देखील सेंद्रीय पद्धतीने लागवड करत आहे. 
- अनंत कांबळे, 

शेतकरी, पाचाड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Organic rice production of 80 kg per gunta