थंडीमध्ये वाढू शकते पिंक बेरीची समस्या

Grapes
Grapes

सध्याच्या परिस्थितीत द्राक्ष विभागामध्ये वातावरण स्वच्छ असून, आकाश निरभ्र दिसून येईल. येत्या आठवड्यात ढगाळ वातावरण नसल्यास दिवसाचे तापमान वाढून रात्रीच्या तापमानात घट होण्याची शक्यता असेल. अशा स्थितीत द्राक्ष बागेत येणाऱ्या अडचणी व संभाव्य उपाययोजनांची माहिती घेऊ.

द्राक्ष बागेत वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालींचा वेग संतुलित राहण्यासाठी तापमान महत्त्वाची भूमिका निभावते. या करिता कमाल तापमान ३० ते ३५ अंश सेल्सिअस व किमान तापमान १५ ते २० अंश सेल्सिअस असल्यास वेलीच्या एकंदरीत विकास चांगला होतो. या वेळी वेलीचा विकास पूर्ण झाला असून, आता घडाचा विकास महत्त्वाचा आहे. या वेळी वर दिलेल्या तापमानापेक्षा जास्त बदल झालेले असल्यास (उदा. किमान तापमान १० अंशांपेक्षा कमी झाल्यास) घडाच्या विकासात बाधा येण्याची शक्यता असेल.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

निर्यातीसाठी महत्त्वाच्या असलेल्या हिरव्या द्राक्ष जातीमध्ये (उदा. थॉमसन सीडलेस, तास- ए- गणेश, क्लोन टू ए इ.) मण्यात पाणी उतरत असताना जर तापमानात असेच बदल झाल्यास पिंक बेरीची समस्या उद्‍भवेल. अशा वेळी किमान व कमाल तापमान फार मोठी तफावत तयार झाल्याने मण्यात उपलब्ध असलेल्या हिरव्या रंगद्रव्याचे रूपांतर गुलाबी रंगद्रव्यांमध्ये होते.

यालाच `पिंक बेरी` या नावाने ओळखतात. अशा प्रकारच्या मण्यामध्ये गोडी जास्त दिसेल, परंतू निर्यातीच्या दृष्टीने या द्राक्षांना पसंती नसते. या परिस्थितीवर मात करण्यासाठी अजूनपर्यंत कोणत्याही उपाययोजना फायदेशीर दिसत नाहीत. त्यावर केवळ द्राक्षघड पेपरने झाकणे हाच एकमेव पर्याय असतो. पिंक बेरीपासून बचावाकरिता द्राक्षघडात पाणी उतरण्याच्या आठ दिवसापूर्वी घड पेपरने घाकून घ्यावा. या वातावरणात जर भुरी रोगाचा प्रादुर्भाव झालेला असल्यास व वेलीवर मिली बग आढळत असल्यास त्यासाठी पेपर झाकण्यापूर्वी योग्य त्या उपाययोजना करणे गरजेच्या असतील. पेपर झाकण्यापूर्वी जैविक नियंत्रणाच्या उपाययोजना उपयुक्त ठरतील. उदा. भुरीसाठी ट्रायकोडर्मा, प्रत्येक ५ मि.लि. प्रति लिटर आणि मिली बगसाठी व्हर्टिसिलियम लेकॅनी ५ मि.लि. प्रति लिटर प्रमाणे फवारणी उपयुक्त ठरेल. अन्यथा पेपर काढल्यानंतर घड हिरवा असूनसुद्धा रोग व किडीच्या प्रादुर्भावामुळे खराब  झालेला असेल. तो खाण्यायोग्य राहणार नाही. 

मण्याच्या वाढीवरील परिणाम 
तापमानात झालेली घट ही वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालीच्या वेगामध्ये बदल घडवून आणते. हे बदल घडाच्या विकासात फायद्याऐवजी तोट्याचे ठरतात. घडाच्या विकासात अडचणी येतात. या वेळी वेलीची मुळी पाहिजे त्या प्रमाणात कार्य करत नसल्यामुळे वेलीला उपलब्ध केलेले अन्नद्रव्य आणि पाणी आवश्यकतेप्रमाणे वेलीकडून उचलले जात नाही. परिणामी, मण्यातील उपलब्ध पेशींची वाढ खुंटते. ही परिस्थिती एक ते दोन आठवडे अशीच राहिल्यास मण्याचा आकार लहान राहून, मण्यात पाणी उतरण्यास सुरुवात होईल. एकदा मण्यात पाणी उतरले की मण्याची वाढ जास्त होत नाही. म्हणजेच आवश्यक तो मण्याचा आकार व प्रत मिळणार नाही. यावर पुढील प्रमाणे प्रभावी उपाययोजना करता येतील. 

  • बोद थोडेफार मोकळे करून घेतल्यास बोदावरील मोकळी झालेली मातीही मल्चिंगचे कार्य करेल. 
  • बोदावर पिकांचे अवशेषांचे आच्छादन केल्यास मुळांच्या कक्षेतील तापमानात वाढ होईल. थंडीच्या काळातही मुळे कार्य करण्यास सुरुवात करतील. 
  • बागेत जास्त प्रमाणात पाणी दिल्यानंतरसुद्धा तापमानात वाढ करून घेता येईल. त्यामुळे मण्याचा आकार वाढवून घेणे शक्य होईल. 
  • बऱ्याचदा द्राक्ष बागायतदार तापमान कमी झालेल्या परिस्थितीत संजीवकांचा वापर फवारणीद्वारे जास्त प्रमाणात करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे मण्याची साल जाड होऊन पुढील काळात मण्यात गोडी येण्यास उशीर होतो. फळकाढणीही पुढे जाते. शक्यतो संजीवकांचा अतिरेक टाळावा. 

घडाचा सुकवा 
द्राक्ष बागेत ज्या वेलीवर जास्त प्रमाणात घडांची संख्या दिसून येते, अशा वेलीवर घडाचा सुकवा जास्त प्रमाणात दिसतो. हलक्या जमिनीत सुकव्याचे प्रमाण जास्त असते. मण्यात पाणी उतरण्याच्या अवस्थेपासून पुढील काळात घडाच्या खालील भागात एक दोन मणी सुकल्याप्रमाणे दिसतात. त्यानंतर पुढे अर्ध्या घडापर्यंत सुकवा दिसून येतो. असंतुलित घडांची संख्या व सोर्स ः सिंक बिघडलेले संतुलन यामुळे द्राक्ष घडाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांची पूर्तता होत नाही. ही परिस्थितीचा सामना करावा लागतो.

बऱ्याचदा बागायतदार सुकवा दिसताच कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅश व मॉलिब्डेनम या अन्नद्रव्यांचा वापर फवारणीद्वारे व जमिनीद्वारे करत असल्याचे समजते. मात्र मण्यात पाणी उतरल्यानंतर मण्याची वाढ केवळ १ ते २ मि.मी. इतकीच होऊ शकते. याचाच अर्थ मण्यात उपलब्ध पेशींची वाढ पूर्णपणे झालेली आहे. आता पुन्हा वाढ होणे शक्य नाही. वेलीला कोणत्याही प्रकारचे अन्नद्रव्य जमिनीतून अथवा फवारणीद्वारे दिले तरी त्याचा कोणताही फायदा होणार नाही. या वेळी सुकवा झालेला घडाचा भाग कापून बाहेर काढणे, एवढेच आपल्या हातात असते. म्हणून या परिस्थितीवर मात करायची झाल्यास मणी सेटिंग ते पाणी उतरणे या अवस्थेपर्यंत (जोपर्यंत मण्यातील पेशी कार्यरत व कार्यक्षम आहेत, तोपर्यंतच) अन्नद्रव्यांचा वापर करता येईल. आपल्या बागेतील परिस्थिती पाहून योग्य त्या उपाययोजना कराव्यात. 

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com