हिंगोलीत हळद उत्पादन घटण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018

हिंगोली - जिल्ह्यात यंदा दुष्काळी स्थितीमुळे हळद पिकाला पक्वतेच्या अवस्थेतच पाणी कमी पडत आहे. त्यामुळे यंदा हळद उत्पादनात ६० टक्क्यांहून अधिक घट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतक-यांचे अर्थकारण कोलमडणार आहे.

हिंगोली - जिल्ह्यात यंदा दुष्काळी स्थितीमुळे हळद पिकाला पक्वतेच्या अवस्थेतच पाणी कमी पडत आहे. त्यामुळे यंदा हळद उत्पादनात ६० टक्क्यांहून अधिक घट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतक-यांचे अर्थकारण कोलमडणार आहे.

अन्य पिकांच्या तुलनेत कमी पाण्यात किफायतशीर उत्पादन मिळत असल्यामुळे तसेच हिंगोली, वसमत, जवळा बाजार या ठिकाणी बाजारपेठा असल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांत हळद लागवडीकडे मोठ्या प्रमाणात वळले आहेत. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत हळद लागवडी खालील क्षेत्र वाढत आहे. विशेषतः काही वर्षांपूर्वी केळी, ऊस लागवडीचे क्षेत्र असलेल्या वसमत तालुक्यात हळद लागवडीखालील क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. गतवर्षी जिल्ह्यात २६ हजार हेक्टरवर हळद लागवड झाली होती. यंदा ३५ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. यंदा सप्टेंबर महिन्यातच पाऊस उघडल्यामुळे विहिरी, कूपनलिकांना पुरेशा प्रमाणात पाणी आले नाही. येलदरी, सिद्धेश्वर या धरणांमध्येही पुरेशा प्रमाणात उपयुक्त पाणीसाठा झाला नाही. त्यामुळे या धरणांच्या कालव्याद्वारे सिंचनासाठी औंढा नागनाथ, वसमत तालुक्यातील शेतक-यांना पाणी मिळणार नाही. हिंगोली, सेनगांव तालुक्यात देखील सिंचनासाठी पाणी नाही. कळमनुरी तसेच वसमत तालुक्यातील काही भागांत इसापूर धरणाच्या कालव्याचे पाणी मिळते. जिल्ह्यातील बहुतांश भागात विशेषतः वसमत आणि औंढा नागनाथ तालुक्यातील शेतक-यांना हळदीच्या सिंचनासाठी पाणी मिळणार नाही.

डिसेंबर ते जानेवारी हा कालावधी हळदीचे कंद भरण्याचा कालावधी असतो. या काळात हळद पिकांची पाण्याची गरज जास्त असते. परंतु, पाण्याची उपलब्धता कमी होत चालल्यामुळे यंदा हळदीच्या पक्वतेच्या अवस्थेत पाणी मिळणार नाही. अशी स्थिती असतानाच ‘हुमणी’च्या प्रादुर्भावामुळे देखील हळदीचे नुकसान झाले. त्यामुळे हळद उत्पादनात ६० टक्क्यांहून अधिक घट येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतक-यांचे अर्थकारण कोलमडणार आहे.

कंद भरण्याच्या अवस्थेत हळद पिकाला पाण्याची गरज जास्त असते. उत्पादनाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा आहे; परंतु सध्या पाणी कमी पडत आहे. त्यामुळे हळदीच्या फण्या लांबणार नाहीत. उत्पादनात मोठी घट येणार आहे. 
- बाळासाहेब राऊत, हळद उत्पादक शेतकरी, वसमत, जि. हिंगोली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The possibility of decreasing production of turmeric in Hingoli