esakal | सकारात्मक ऊर्जेचा प्रयोगशील तरुण
sakal

बोलून बातमी शोधा

सकारात्मक ऊर्जेचा प्रयोगशील तरुण

सातारा जिल्ह्यातील निरगुडी येथील राजाराम सस्ते यांनी अनेक वर्षे द्राक्षाचे पीक टिकवले. वडिलांचाच वारसा पुढे नेत नव्या पिढीच्या विठ्ठल या अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याने अत्यंत सकारात्मक वृत्तीने त्यात प्रयोगशील वृत्ती व ऊर्जा जपली. अथक कष्ट, दरवर्षी आगाप हंगामाचे नियोजन, व्यवस्थापनातून त्याने पिकवलेली दर्जेदार द्राक्षे मार्केटमध्ये नेहमीच चांगला भाव खाऊन जातात.  

सकारात्मक ऊर्जेचा प्रयोगशील तरुण

sakal_logo
By
विकास जाधव

सातारा जिल्ह्यातील फलटण हा दुष्काळी तालुका आहे. धोम-बलकवडी धरणाचा कॅनल झाल्याने परिसरातील अनेक गावांना पाणी मिळाले. त्यातून बागायत शेती होण्यास सुरवात झाली. या गावांपैकी निरगुडीमध्ये द्राक्ष व डाळिंब ही प्रमुख पिके आहेत. 

सस्ते यांनी जपलेली द्राक्षशेती 
गावातील विठ्ठल राजाराम सस्ते हा पदवीधर तरुण शेतकरी. त्याचे वडील १९८३ पासून द्राक्षाची शेती करतात. या काळात २० गुंठे क्षेत्रावर द्राक्षाची लागवड केली जायची. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे द्राक्ष हे प्रमुख पीक होते. दर्जेदार उत्पादनावरच भर असल्याने त्या काळात व्यापाऱ्यांमार्फत निर्यातही केली जायची. दुष्काळाच्या फेऱ्यात पीक सापडले की मोठ्या प्रमाणात नुकसान व्हायचे. मात्र संकटावर मात करण्यासाठी सातत्याने धडपड केली जात होती. विठ्ठल यांचे २००६ मध्ये शिक्षण पूर्ण झाले. नोकरीच्या मागे न लागता त्यांनी शेती करण्यास सुरवात केली. कुटुंबास अवघी सा़डेतीन एकर शेती होती. त्यामध्ये वीस गुंठ्यांत द्राक्षपीक होते. त्याचे क्षेत्र वाढवण्याचा निर्णय विठ्ठल याने घेतला. 

रिकटद्वारे वर्षाच्या आत उत्पादन  
विठ्ठल यांनी मागील एप्रिलमध्ये प्रयोग केला. यात साधारण नऊ ते दहा गुंठ्यांत तास ए गणेश वाणाच्या खोडावर रिकटद्वारे सुपर सोनाका वाण लावले. त्यानंतर थेट बहार मिळाला. त्यातून अवघ्या दहा ते अकरा महिन्यांत सव्वा ५०० किलोपर्यंत माल मिळाला. 

थेट विक्रीमुळे दुप्पट दर  
याच द्राक्षांची व्यापाऱ्यांनी ३० रुपये प्रतिकिलो दराने मागणी केली. मात्र विठ्ठल यांनी परिसरात स्टॉल लावून हीच द्राक्षे ६० रुपये म्हणजे दुप्पट दराने विकली.  

दर्जेदार मालाला चांगला दर 
द्राक्षाला प्रति एकर साधारणपणे दीड ते दोन लाख रूपयांपर्यत उत्पादन खर्च 
आगाप हंगामातील द्राक्षे नोव्हेंबरच्या दरम्यान विक्रीस येतात. व्यापारी ती जागेवरून खरेदी करतात. त्यास किमान ६० रूपये प्रति किलो दर. यंदा एका सुपरमार्केटकडून साडेपाच टन द्राक्षांची खरेदी ७२ रुपयांप्रमाणे. उर्वरित सुमारे पावणे आठ टन द्राक्षांची विक्री ६० रुपये दराप्रमाणे स्थानिक बाजारपेठेत.
डाळिंबाचेही एकरी पाच टनांप्रमाणे उत्पादन. यापूर्वी एकदा डाळिंबाला किलोला १३५ रूपये दर. 

पहाटे पाच वाजता माझा दिवस सुरू होतो. सकाळी सहाच्या सुमारास दुधाच्या धारा काढल्या जातात. सकाळी सात वाजता बागेत फेरफटका होतो. घरी येऊन आवश्यक कामे उरकल्यानंतर पुन्हा शेतात जातो. उशिरा रात्रीपर्यंत कोणत्या ना कोणत्या पिकात काम सुरूच असते. शेतीत स्वतः राबल्याशिवाय  व प्रत्येक बाबीत स्वतः लक्ष घातल्याशिवाय यश मिळत नाही. 
 : विठ्ठल सस्ते, ९९७५३७८५३०

द्राक्ष शेती विस्तारली 
द्राक्षबाग वाढवण्याच्या दृष्टीने विठ्ठल याने वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शेतीतील बारीकसारीक नोंदी ठेवण्याची सवय लावून घेतली. 
द्राक्ष पिकावरील चर्चासत्रास उपस्थिती लावली. यातून तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळत गेले. 
सन २००७ मध्ये सव्वा एकरात तास ए गणेश वाणाची लागवड 
नव्या बागाेत मंडपावर कारले, दोडका असे प्रयोग केले. सर्व कामे स्वतः करण्यावर भर दिला. यावेळी सव्वा एकर क्षेत्रातून सुमारे ३० टन कारले उत्पादन मिळाले. तीन लाख ३० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. द्राक्षात गुंतवलेले भांडवल मोकळे होण्यास मदत झाली. 
जुलै २००८ नंतर द्राक्षाचा बहर सुरू झाला. एकरी आठ ते नऊ टन उत्पादन मिळाले. अपुऱ्या ज्ञानामुळे निर्यातक्षम द्राक्ष पिकवता न आल्याने सर्व द्राक्षे स्थानिक व्यापाऱ्यांना विकावी लागली. 
सन २००९ मध्ये पुन्हा बहाराचे योग्य नियोजन केले. सात टन उत्पादन मिळाले. यातील ७० टक्के माल व्यापाऱ्यांनी दुबई आदी देशांत निर्यातीसाठी खरेदी केला. ६० ते ६५ रुपये प्रति किलो दर मिळाला. हा दर स्थानिक बाजारपेठेपेक्षा दुप्पट होता. यातून चांगले पैसे मिळाल्याने उत्साह वाढला.
सध्या एकूण साडेचार एकर क्षेत्रापैकी दोन एकर द्राक्ष, सव्वा एकर डाळिंब व अन्य क्षेत्रात हंगामनिहाय पिके व भाजीपाला घेतला जातो.
सन २०१२ मध्ये दुष्काळात बाग हातची जाण्याची वेळ आली. प्रति टँकर १५०० रुपये याप्रमाणे पाणी खरेदी करून उत्पादन न घेता बाग जगवली.     

व्यवस्थापनातील ठळक बाबी
दरवर्षी आगाप द्राक्षांची शेती. जुलैमध्ये गोडी छाटणी. 
तास ए गणेश या वाणाची लागवड
एकरी १० टन उत्पादन
प्रति एकर पाच ट्रेलर शेणखताचा वापर 
पाण्याचा सामू (पीएच) तपासूनच कीडनाशकांची फवारणी 
दोन ते तीन वर्षांनी माती परीक्षण. त्यानुसार खतांचा वापर. 
जीवामृताचा वापर करण्यावर भर. एका देशी गायीचे पालन. 
प्रत्येक वर्षी जमाखर्चाची नोंद.  एखादी चूक होऊन नुकसान झाल्यास त्याची नोंद ठेवल्याने पुढील वर्षी सुधारणेची संधी.  
दरवर्षी आॅक्टोबरच्या सुमारास पक्षी प्रतिबंधक नेटचा वापर 
द्राक्ष हंगाम संपल्यावर दोडका, टोमटो, कारली आदी भाजीपाला शेती. 
शेतात आई, वडिल, पत्नीही राबतात. त्यामुळे मजुरांवरील बराच खर्च वाचतो. कृषी सहायक प्रविण बनकर, सचिन जाधव, दिपक सस्ते, जयपला सस्ते यांचे मार्गदर्शन.  

loading image