शेती बांधावरील स्टॉलवरून थेट ग्राहकांना भाजीपाला विक्री 

मंगेश पारटकर/विनोद इंगोले 
गुरुवार, 21 मे 2020

आंतरपिकांच्या माध्यमातून उत्पन्न वाढीसाठी दगडधानोरा येथील पांडूरंग देशमुख सतत प्रयत्नशील असतात. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन झाल्याने त्यांच्यासमोर शेतीमाल विक्रीची अडचण तयार झाली.

यवतमाळ - दोन भावांची सामाईक साडेतीन एकर शेती... या प्रयोगशील शेतीतून कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागवून दोन पैसे नेहमीच हातात खेळते राहतात. आंतरपिकांच्या माध्यमातून उत्पन्न वाढीसाठी दगडधानोरा (ता. पुसद, जि. यवतमाळ) येथील पांडूरंग देशमुख सतत प्रयत्नशील असतात. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन झाल्याने त्यांच्यासमोर शेतीमाल विक्रीची अडचण तयार झाली. यावर मात करत त्यांनी शेती बांधावरून थेट ग्राहकांना भाजीपाला विक्रीस सुरवात करून आर्थिक नुकसान कमी करण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

देशमुख बंधूंनी डिसेंबर महिन्यात दीड एकर उसामध्ये आंतरपीक म्हणून अर्ध्या एकरात कोबी, टोमॅटो आणि ढेमसे तसेच एक एकरात फ्लॉवर, मिरचीची लागवड केली. पिकाचे चांगले व्यवस्थापनही केले. मात्र पीक काढणीला आले असताना लॉकडाऊनचा फटका बसला. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात कोबीला ३० ते ३५ रुपये प्रति किलो असा दर मिळाला होता. सध्या मात्र १० ते १२ रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे. 

थेट बांधावरून भाजीपाल्याची विक्री - 
शेंबाळ पिंपरी, मुळावा, उमरखेड येथील बाजारात देशमुख भाजीपाला विक्री करतात. लॉकडाऊनच्या आधी आंतरपीक म्हणून घेतलेल्या भाजीपाला विक्रीतून त्यांना ७० हजार रुपये मिळाले. मात्र मार्च महिन्यात लॉकडाऊनमुळे भाजीपाल्याच्या पडत्या दरामुळे काढणीचा खर्चही निघत नसल्याने काही प्रमाणात कोबी पीक सोडून द्यावे लागले. तसेच मिरचीला अपेक्षीत दर मिळाला नाही. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये निराश न होता देशमुख यांनी शेती बांधावरून थेट ग्राहकांना भाजीपाला विक्रीचे नियोजन केले. त्यांच्या शेताजवळूनच राज्यमार्ग जात असल्याने भाजीपाल्याची विक्री सुकर झाली. गेल्या महिनाभरापासून सकाळी ८ ते १२ या कालावधीत ते शेती बांधावर स्टॉल लाऊन भाजीपाला विक्री करत आहेत. त्यातून त्यांना तीस हजारांचे उत्पन्न मिळाले. वीस गुंठ्यातून त्यांना आठ क्‍विंटल हळदीचे उत्पादन झाले. त्यात आंतरपीक असलेल्या एरंडी पिकाने थोडा आर्थिक हातभार लावला. 

सध्या वांगी, गाजर, कोथिंबीर, शेवग्याची विक्री स्टॉलवरून सुरू आहे. यंदा ऊस वगळता त्यांना भाजीपाला पिकातून साडेतीन लाखांचे उत्पन्न अपेक्षीत होते. मात्र अखेरच्या टप्प्यापर्यंत त्यांना दीड लाखावर समाधान मानावे लागले. पुढील हंगामात देखील बांधावरील स्टॉलवरून थेट ग्राहकांना भाजीपाला विक्रीचे त्यांनी नियोजन केले आहे. 

Lockdown : भारतात प्रत्येक राज्यात घराबाहेर पडण्याचे प्रमाण वाढले

ॲग्रोवन मार्गदर्शक 
शेती करताना नानाविध संकटे येतात. सद्या उत्पादित शेतीमालास योग्य दर आणि बाजारपेठ न मिळणे अशा अडचणी येत आहेत. यावर उपाय म्हणजे थेट ग्राहकांना भाजीपाला विक्री करून उत्पन्न वाढविणे. याचबरोबरीने ॲग्रोवनमधील पीक पद्धतीबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन, शेतकरी यशोगाथांचा चांगला फायदा मला होत आहे. शेतीच्या व्यवस्थापनात आम्हांला कृषी साहाय्यक माधव कांबळे यांचे विशेष मार्गदर्शन असते, असे देशमुख सांगतात. 
 
संपर्क - पांडुरंग देशमुख, ९७६३४३३१०३ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Selling vegetables directly to customers from stalls on farm