शीतगृहामुळे शेवंतीला मिळाला दुप्पट भाव

Shevanti-Flower
Shevanti-Flower

पुणे जिल्ह्यातील चांडोली (खुर्द) येथील भिकाजी बांगर गेल्या साडेचार वर्षांपासून शेवंतीची यशस्वी शेती करीत आहेत. गणपतीपासून ते दसरा, दिवाळी व पुढे लग्नसराईत जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत या फुलाला उठाव असतो. कमी दरांच्या काळात शीतगृहात फुले ठेवण्याची सोय आहे. खर्च, मेहनत या पिकाला जास्त असली तरी बाजारातील कायम मागणी असल्याने हे पीक बांगर यांना फायदेशीर ठरले आहे.

पुणे जिल्ह्यात मंचर तालुक्यातील चांडोली (खुर्द) येथील भिकाजी तुकाराम बांगर (बी.टी. बांगर नावाने ओळख) यांची १५ एकर शेती आहे. शेवंती हे त्यांचे हुकमी पीक झाले आहे. त्याचे कारणही तसेच आहे. पूर्वी ते झेंडूचे पारंपरिक उत्पादन घ्यायचे. मात्र, त्यास अपेक्षित दर मिळत नव्हते.

अनेकवेळा झेंडू फेकून द्यावा लागे. बाजारपेठांत वर्षभरातील अधिक काळ मागणी असलेल्या व किफायतशीर पिकाचा शोध सुरू होता. दरम्यान, पेठ कारेगाव येथील पाहुणे शरद सणस यांनी शेवंती हे पीक सुचवले.

गणपतीपासून ते दसरा, दिवाळी व पुढे लग्नसराईत जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत या फुलाला चांगली मागणी राहते हे समजले. त्याचे अर्थकारणही समजावले. त्यानंतर मग शेवंती या फूल पिकाची निवड पक्की केली.  आता सुमारे साडेचार वर्षांचा त्यांचा या पिकातील अनुभव तयार झाला आहे. दरवर्षी सुमारे चार ते साडेचार एकरांपर्यंत त्याची लागवड असते. दरवर्षी सुमारे १ मे च्या दरम्यान लागवड असते. मात्र, रोपे उशिरा मिळाल्याने लागवडीला एक महिना उशिर झाला. परिणामी, गणेशोत्सवाचा हंगाम साधता आला नाही फुले उशिरा सुरू झाली. या काळात केवळ २०० किलोच माल मिळाला. पुणे बाजार समितीत त्यास किलोला १५० रुपये दर मिळाला. 

प्रकाशाची सुविधा 
दरवर्षी जूनमध्ये लागवड असते. यंदा ढगाळ वातावरण अधिक काळ राहिल्याने रोपांच्या वाढीसाठी सूर्यप्रकाश कमी प्रमाणात मिळत होता. यामुळे प्रकाश संश्‍लेषणाअभावी रोपांची वाढ होत नव्हती. यासाठी रात्रीच्या वेळी रोपांना प्रकाश मिळावा, यासाठी शेतात शंभर एलईडी बल्बची व्यवस्था केली. यासाठी केबलसह सुमारे २० हजार रुपये खर्च आला.

गणेशोत्सव काळात पुणे बाजार समितीमध्ये पांढऱ्या शेवंतीला किलोला सरासरी १७० रुपये दर मिळाला होता. हाच दर पितृपंधरवड्यात १० ते ३० रुपये प्रतिकिलो होता. नवरात्रीच्या काळात हेच दर ८० ते १२० रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी फुले भिजली. त्यामुळे उत्पादन घटले आहे. चांगल्या दर्जाच्या फुलांची आवक कमी असल्याने दरांत वाढ होण्याची शक्यता आहे.  
- सागर भोसले, संचालक, पुणे फुल बाजार अडते असोसिएशन 

शीतगृहाची सुविधा 
गणपतीनंतर पितृपक्षात सर्वच फुलांची मागणी घटून दर कमी होतात. यंदा गणेशोत्सवामध्ये १५० रुपये दर असणाऱ्या शेवंतीला पितृ पंधरवड्यात २० ते ३० रुपये दर होता. या काळात उत्पादित झालेली सुमारे तीन टन फुले शीतगृहात ठेवली. मंचर परिसरात विविध शीतगृहे असून या ठिकाणी ११ ते १४ अंश सेल्सिअस तापमानाला फुले ठेवण्यात येतात. यामध्ये प्रती १० किलोच्या क्रेटला दिवसाला १० रुपये यानुसार १५ दिवसांसाठी ३०० क्रेटला सुमारे ३० हजार रुपये भाडे आकारण्यात आले. या वेळी फुलांना बाजारपेठेत ३० रुपये दर होता. आता घटस्थापना झाली आहे. दसरापर्यंतच्या काळात फुलांना चांगली मागणी राहणार आहे. या काळात फुलांना प्रतिकिलो ८० ते १०० रुपयांपर्यत दर मिळण्याचा अंदाज आहे.

शीतगृहात भाडेशुल्क जास्त मोजावे लागले तरी सद्य:स्थितीत मिळणाऱ्या दरामुळे ही तफावत भरून निघणार आहे. गणपती ते नवरात्र, दसरा, दिवाळी आणि डिसेंबर ते फेब्रुवारीमधील लग्न हंगामातील मागणी असा सारा विचार केल्यास किमान २० रुपये तर कमाल २०० ते काही प्रसंगी ३०० रुपये कमाल दर मिळतो. बांगर सांगतात की पूर्वी आमच्या गाव परिसरात माझ्याकडेच हे पीक असायचे. आता सुमारे दहा शेतकरी तरी हे पीक घेऊ लागले आहेत. दरवर्षी रोपे नव्याने खरेदी करावी लागतात. यंदा मात्र फेब्रुवारीनंतर ‘रीकट’ घेऊन पुढील उत्पादनाचा प्रयोग करणार असल्याचे बांगर म्हणाले. 

- भिकाजी बांगर, ९८२२२५३०००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com