स्वच्छता, जल व्यवस्थापनात राज्यात आदर्श ठरलेले शेळगाव गौरी

Shelgav-Gauri-Village
Shelgav-Gauri-Village

नांदेड जिल्ह्यातील शेळगाव गौरी (ता. नायगाव) गावाने स्वच्छता आणि जल व्यवस्थापनाचा ‘पॅटर्न’ तयार केला आहे. लोकाभिमुख उपक्रम राबवत निर्मल, पर्यावरण संतुलित समृद्धग्राम, आदर्शगाव म्हणून राज्यात नावलौकिक प्राप्त केला आहे. शाश्वत उत्पन्नासाठी गावातील शेतकरी फळबाग, रेशीम शेतीकडे वळले आहेत. ग्रामपंचायतीतर्फे महिला सक्षमीकरणाचे प्रयत्न होत आहेत. ‘आयएसओ’ मानांकनप्राप्त शेळगाव गौरी ग्रामपंचायत ग्रामविकासाच्या दृष्टीने मार्गदर्शक ठरत आहे.

नांदेड जिल्ह्यात शेळगाव गौरी (ता. नायगाव) हे छोटेसे गाव मन्याड नदीकाठी वसले होते. पूर परिस्थितीत गावात पाणी शिरून नुकसान होत असे. त्यामुळे १९८३ मध्ये गावापासून दीड किलोमीटरवरील टेकडीवर गावाचे पुनर्वसन करण्यात आले. आज गावठाणाचा विस्तार ४५ एकरांवर झाला आहे. गावांमधील सर्व रस्ते काटकोनात आहेत. ग्रामपंचायत कार्यालय, व्यायामशाळा, शाळा, मंदिर, समाज मंदिर, मंगल कार्यालय, तलाव, धोबीघाट, बालोउद्यान, आपले सरकार सेवा केंद्र आदींसाठी पुरेशा जागा ठेवण्यात आल्या आहेत. ग्रामस्थांनी जुन्या पद्धतीची कौलारू, चिरेबंदी वाडे, आधुनिक सिमेंटच्या छतांच्या घरांची बांधकामे केली आहेत. 

रस्ते व वृक्षसंवर्धन 
मूळ गावात एकमेव रस्ता होता. पुनर्वसित गावातील सर्व रस्त्यांची लांबी सुमारे ११ किलोमीटर भरते. रस्त्यावर कुठेही अतिक्रमण नाही. रस्त्यांच्या दुतर्फा शोभिवंत, सावली देणाऱ्या तसेच फुलझाडांची लागवड आहे. परसबागेत नित्योपयोगी झाडांची लागवड व संवर्धन करण्यात आले आहे. गावातील प्रत्येक व्यक्तीच्या प्रमाणात ३ ते ४ झाडांची लागवड करण्यात आली आहे. रस्त्यांवर सौर पथदिवे बसविले आहेत. हिरवाईचे प्रमाण जास्त असल्यामुळे उन्हाळ्यात गावाचे तापमान कमी राहण्यास मदत होते. 

ग्रामस्वच्छतेचा वसा वर्षानुवर्षे कायम 
गावातील माधवराव पाटील शेळगावकर यांचे व्यक्तिमत्त्व शेतकरी चळवळीतून निर्माण झालेले आहे. एक तप शेतकरी संघटनेत राहून त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलने केली. पंचायत समिती, बाजार समिती, जिल्हा परिषदेतील विविध पदे भूषविली. २००२ पासून संपूर्ण लक्ष गावाच्या विकासाकडे केंद्रित केले. २००३ मध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात शेळगाव गौरी हे गाव सहभागी झाले. त्या वेळी लोकसहभागातून वैयक्तिक व सावर्जनिक स्वच्छताविषयक उपक्रम राबविण्यात आले. वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहाची बांधकामे करून प्रबोधन करण्यात आले. यातून गाव हागणदारीमुक्त झाले. गावातील प्रत्येक कुटुंब वैयक्तिक स्वच्छतागृहाचा वापर करते. राज्य शासनाने माधवरावांची राज्यस्तरीय संत गाडगेबाबा ग्रामीण स्वच्छता समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यांनी विविध गावांत जाऊनही स्वच्छताविषयक प्रबोधन केले.

पीकपद्धतीत बदल -
मन्याड नदी व पूर्वीच्या काळात चांगला पाऊस पडे. त्यामुळे सिंचनाची सोय होती. नदीवरील धरणाच्या कालव्याचे पाणी मिळायचे. गावात ऊस हे प्रमुख पीक होते. अलीकडील वर्षांत पावसाचे प्रमाण कमी झाल्याने सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी या कोरडवाहू पीकपद्धतीचा अवलंब केला जातो. सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी ऊस, केळी, हळद पिके घेतात. अलीकडील काळात आंबा, मोसंबी, चिकू आदींचे उत्पादन काहीजण घेत आहेत. दोन शेतकऱ्यांकडे महिन्याकाठी शाश्वत उत्पन्न देणारा रेशीम शेती तसेच दोघांकडे कुक्कुटपालन आहे.

स्वच्छ, सुंदर कार्यालय 
  खालील मजल्यामध्ये कार्यालय तर दुसऱ्या मजल्यावर विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका
  सरपंच, उपसरंपच, ग्रामसेवक, तलाठी असे विविध कक्ष 
  दोन सभागृहे. अभ्यागतांसाठी विश्रांती कक्ष. इमारतीसमोर विविध वृक्षांची लागवड. 
  स्वच्छतेला अत्यंत महत्त्व.
  आपले सरकार केंद्राच्या माध्यमातून ग्रामस्थांना विविध प्रकारचे संगणकीकृत दाखले दिले जातात. ग्रामप्रशासन, शिक्षण, आरोग्य प्रशिक्षण, पशुसंवर्धन, पाणीपुरवठा, समाज कल्याण, कृषी, महिला व बालविकास क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल ग्रामपंचायतीला आयएसओ ९००००१-२०१५ मानांकन
  जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडीही आयएसओ ९०००१- २०१५ मानांकनप्राप्त 

ग्रामविकासातील ठळक बाबी 
घर तसेच परिसर स्वच्छतेची सवय अंगी बाणावी यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वच्छताविषयक प्रश्नावली असलेली शंभर गुणांची स्पर्धा. दर महिन्याला मूल्यमापन करून विजेत्या विद्यार्थ्यांस प्रथम ११ हजार रुपये, तर द्वितीय सात हजार रुपयांचे पारितोषिक

मन्याड नदीकाठच्या विहिरीतून गावाला पाणीपुरवठा. गावात दोन टाक्या. प्रत्येक कुटुंबाला नळजोडणी. आरओ संयंत्रणेद्वारे शुद्ध केलेल्या पाण्याचा माफक दरामध्ये दररोज पुरवठा.  नळपाणीपुरवठा योजनांचे तसेच आरओ प्लॅन्टमधील अतिरिक्त पाणी वाया जाऊ नये यासाठी पाणीसाठवण तलाव. त्याभोवती सिमेंटची संरक्षण भिंत व लोखंडी कठडे लावण्यात आले आहेत.

तलावातील पाणी कपडे धुणे, जनावरांना पिण्यासाठी. तलावात उतरण्यासाठी पायऱ्या.

तलावाजवळ धोबी घाटची सुविधा. कपडे वाळविण्याचीही सुविधा.

सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी शोषखड्डे. अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी भूमिगत गटारे

गाव उंच टेकडीवर वसले असल्याने पावसाचे, तसेच वाहून जाणारे पाणी साठविण्यासाठी गावाच्या पायथ्याशी छोटा पाझर तलाव. त्यामुळे परिसरातील बोअरच्या पाणीपातळीतही वाढ.

पोळा सणाला पशुआरोग्य शिबिर 
पोळ्याच्या दिवशी पशुआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येते. जनावरांना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येते. पशुपालकांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित केले जाते. बैलजोडी पूजनाच्या वेळी सालगड्यांना कपड्यांचा आहेर करून कृतज्ञता व्यक्त केली जाते. शिवारात चरायला गेलेल्या जनावरांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी जुन्या गावाजवळ बोअर घेऊन सिमेंटचा हौद बांधण्यात आला आहे.

शेळगाव गौरी ग्रामपंचायत दृष्टिक्षेपात 
लोकसंख्या : १७६१
कुटुंब संख्या : २९७
स्वच्छतागृह संख्या : २९७
दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे : १०५
शैक्षणिक सुविधा : जि. प. शाळा पहिली ते चौथी, संस्था - पाचवी ते दहावी
अंगणवाडी संख्या : २
लागवड क्षेत्र : ५०० हेक्टर
प्रमुख पिके : खरीप व रब्बीतील मुख्य तसेच बागायती  ऊस, हळद.
फळपिके : आंबा व मोसंबी प्रत्येकी १० एकर, चिकू ५ एकर, केळी २ एकर
तुती : २ एकर. 

महिला सक्षमीकरण 
महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी स्वयंसाह्यता बचत गटांच्या महिलांनी पिठाची गिरणी, कापड दुकान यांसारखे गृहउद्योग सुरू केले आहेत. ग्रामपंचायतीकडून शिवणकाम प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते.

स्वच्छता ही आरोग्याचे रक्षण करते. त्याच्या प्रबोधनामुळे ग्रामस्थांना स्वच्छतेची उपयुक्तता समजली. एकोप्यातून गावाचा नावलौकिक वाढला. प्रत्येकाने विकासासाठी विज्ञानाची कास धरणे आवश्यक आहे ही बाबही आम्ही अंगी आणली आहे. 
- माधवराव पाटील शेळगावकर, ९४२२१७०२२७ माजी अध्यक्ष, संत गाडगेबा ग्रामीण स्वच्छता समिती

ग्रामस्थांनी वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वच्छतेची सवय वर्षानुवर्षे कायम ठेवली आहे. ग्रामपंचायतीकडून लोकाभिमुख उपक्रम राबविले जातात.त्याला ग्रामस्थ मनोभावे सहकार्य करतात.
- सदाशिव पांचाळ, ८९५६८६२०१४ सरपंच

बैठका तसेच ग्रामसभेत गावाच्या विकासाचे निर्णय सर्वानुमते घेतले जातात. विविध करांचा भरणा नियमित होतो. त्यामुळे देखभाल दुरुस्तीसाठी निधी उपयोगी येतो.
- प्रल्हाद गोरे, ९९२२७२३८५१ ग्रामसेवक

गावातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत भरती झाले आहेत. महिलांच्या स्वालंबनासाठी लघू उद्योग प्रशिक्षण केंद्र सुरू करणार आहोत.
- संजय पाटील शेळगावकर, पंचायत समिती सदस्य, तथा सचिव ज्ञानसंवर्धन शिक्षण, प्रसारक मंडळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com