ऑप्शन्स इन गुड्स : मस्त भावासाठी स्वस्त पर्याय

ऑप्शन्स इन गुड्स : मस्त भावासाठी स्वस्त पर्याय

शेतकऱ्यांना गरज असते ती पेरत असलेल्या पिकाला योग्य भाव मिळण्याची. म्हणजेच काढणीच्या वेळी बाजारभावात नेहमीच होणाऱ्या घसरणीपासून त्याला संरक्षण हवे असते. त्यासाठी पेरणीच्या वेळीच काढणीच्या महिन्याचे ‘पुट’ ऑप्शन विकत घेणे. यासाठी थोडे पैसे द्यावे लागतात, त्याला ‘प्रीमियम’ म्हणतात. एकदा ऑप्शन घेतला, की नंतर जसा वस्तूचा भाव कमी होतो, तसा प्रीमियम वाढत जातो आणि भाव वाढतो तेव्हा प्रीमियम कमी होतो. ऑप्शन समाप्तीच्या वेळेस बाजारभावाप्रमाणे सेटलमेंट केले जाते. तेव्हा जर भाव पडलेले असतील, तर त्यामुळे जेवढा तोटा होतो तेवढीच वाढ प्रीमियममध्ये झाल्यामुळे तोटा भरून निघतो आणि माल बाजारात विकता येतो.

चर्स आणि ऑप्शन्स किंवा वायदे बाजार हे मोठेमोठे इंग्रजी शब्द वाचून शेतकऱ्यांची छाती दडपून जाते. यासंबंधीची बहुतांश माहिती इंग्रजीमधून दिली जात असल्यामुळे त्याविषयी आत्मीयता वाटण्याऐवजी शेतकऱ्यांना ती एक परदेशी गोष्ट वाटते. त्यामुळे त्यापासून फायदा करून घेणे तर सोडाच त्याच्या वाटेलाच न जाण्याचा पर्याय स्वीकारला जातो. ही वस्तुस्थिती असली तरी ती बदलण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना या गोष्टी त्यांच्या भाषेत सोप्या करून सांगण्याची नितांत गरज आहे. तरच या बाजाराचे फायदे बांधापर्यंत पोहोचतील. अलीकडे केंद्र सरकारने कृषी पणन सुधारणांचा लावलेला धडाका पाहता शेतीकारणात मोठे बदल अपरिहार्य आहेत. त्याला सामोरे जाण्यासाठी ते समजून घेणे गरजेचे आहेत. याच पठडीमध्ये मागील लेखात आपण इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल गोदाम पावती (eNWR) विषयी माहिती घेतली. या लेखात आपण देशात अलीकडेच अस्तित्वात आलेल्या ‘ऑप्शन्स इन गुड्स’ या संकल्पनेची माहिती घेऊ.

‘ऑप्शन्स इन गुड्स’ म्हणजे शेतीमाल योग्य भावात आगाऊ विकण्याचे साधन आहे. परत हा सुद्धा इंग्रजी शब्द असला तरी घाबरू नये. अजून त्याला मराठी शब्द ठरवलेला नसल्यामुळे सध्या आपण त्याला ‘ऑप्शन्स’ म्हणू. ऑप्शनमध्ये तेजीचा ‘कॉल’ आणि मंदीसाठी ’पुट’ असे दोन खरेदीचे पर्याय असतात. आपण गुंतवणुकदारांच्या चष्म्यातून त्याकडे न पाहता शेतकऱ्यांसाठी आपला माल आगाऊ आणि तो देखील योग्य भावात विकण्याचा पर्याय म्हणून त्याचा अभ्यास करू.

भारतात शेतीमालाच्या बाजारभावाबद्दल कमी-जास्त प्रमाणात एक ट्रेन्ड दिसून येतो. पेरणी अगोदर ज्या पिकांचे भाव उंचावर असतात त्या पिकांची निवड शेतकऱ्यांकडून केली जाते. पेरणीनंतर पुढील चार-सहा महिन्यांत जसजशी पिकांची काढणीची वेळ येते, तसतसे भाव पडू लागतात. काढणीनंतरचे दोन महिने भाव एकदम पडलेलेच असतात आणि ५० टक्के शेतकरी गरजेपोटी नाइलाजाने माल विकतात आणि परत तीन-चार महिन्यांनी वाढलेले भाव पाहून व्यथित होतात. यावर उपाय म्हणून काही प्रमुख पिकांमध्ये वायदे बाजार आहे. त्याद्वारे माल पेरणीच्या वेळीच विक्री भाव आगाऊ पक्का करता येतो. परंतु वायद्याबद्दल अनास्था, अपुरी माहिती आणि आगाऊ लागणाऱ्या मार्जिन मनीची गरज यामुळे फारच नगण्य लोक त्याचा फायदा घेऊ शकतात. 

या पार्श्वभूमीवर स्वस्त आणि मस्त तसेच तुलनेने वापरायला आणि समजायला सोपा उपाय म्हणजे ऑप्शन्स. शेतकऱ्यांना गरज असते ती पेरत असलेल्या पिकाला योग्य भाव मिळण्याची. म्हणजेच काढणीच्या वेळी बाजारभावात नेहमीच होणाऱ्या घसरणीपासून त्याला संरक्षण हवे असते. त्यासाठी पेरणीच्या वेळीच काढणीच्या महिन्याचे ‘पुट’ ऑप्शन विकत घेणे. यासाठी थोडे पैसे द्यावे लागतात, त्याला ‘प्रीमियम’ म्हणतात. एकदा ऑप्शन घेतला की नंतर जसा वस्तूचा भाव कमी होतो, तसा प्रीमियम वाढत जातो आणि भाव वाढतो तेव्हा प्रीमियम कमी होतो. ऑप्शन समाप्तीच्या वेळेस बाजारभावाप्रमाणे सेटलमेंट केले जाते. तेव्हा जर भाव पडलेले असतील तर त्यामुळे जेवढा तोटा होतो तेवढीच वाढ प्रीमियममध्ये झाल्यामुळे तोटा भरून निघतो आणि माल बाजारात विकता येतो. जर ऑप्शन समाप्तीला भाव वाढलेले असतील तर सुरवातीचा प्रीमियम हाच तेवढा तोटा होतो. परंतु आपला माल वाढलेल्या भावात विकण्यामुळे तेजीचा संपूर्ण फायदा केवळ सुरुवातीच्या प्रीमियमच्या बदल्यात मिळतो.  

एका उदाहरणाद्वारे ही गोष्ट समजून घेऊ. सध्या हरभऱ्याचा हमीभाव प्रति क्विंटल ५,१०० रू. आहे तर बाजारभाव ५,३०० रु आहे. साधारणपणे काढणीच्या वेळी भाव १५ टक्के पडले तरी ४,५०० पर्यंत येईल. ही भावातील जोखीम टाळण्यासाठी आताच ५,००० रुपये भावाचे (याला ऑप्शन स्ट्राइक म्हणतात) मार्च महिन्याचे पुट-ऑप्शन ५० रुपयांना घेतले. आता ऑक्टोबरपासून मार्च कॉन्ट्रॅक्ट समाप्तीस हरभरा ४,५०० रुपये झाला तर प्रीमियम वाढून ४५० रुपये  (५,००० स्ट्राइक - ५० प्रीमियम) होईल. आता हरभरा बाजारात ४,५०० रुपयांत जाईल, तर प्रीमियम मधून ४५० रुपये मिळतील. म्हणजे एकूण भाव ४,९५० मिळतील. केवळ ५० रुपयांत ५० रुपये घसरणीचे संरक्षण.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आता दुसरी बाजू पाहू.  वरील उदाहरणामधील ऑप्शन खरेदी झाल्यावर डिसेंबर, जानेवारीमध्ये पाऊस होऊन काही ठिकाणी नुकसान होऊन हरभऱ्याचे भाव वाढत जातात आणि नियमाप्रमाणे प्रीमियम कमी होत जातो. ऑप्शन समाप्तीच्या वेळेस हरभरा भाव ऑप्शन स्ट्राइकपेक्षा ५०० रुपये वाढून ५,५०० रुपये होतो. परंतु प्रीमियम शून्यापेक्षा कमी होणे शक्य नसल्यामुळे ५० रुपयेच कमी होतो. त्यामुळे ऑप्शन बाजारात सेटलमेंटला फक्त ५० रुपये तोटा होतो. तर आपला हरभरा बाजारात ५,५०० रुपयांना विकायला शेतकरी मोकळा.

वरील उदाहरण हे ढोबळ आहे. त्यामुळे प्रत्यक्षात पैशाची मांडणी अगदी तंतोतंत अशीच असेल असे नाही. परंतु थोड्याशा प्रीमियममध्ये फार मोठी जोखीम टाळता येणे सहज शक्य होते, हा यातला मुद्दा आहे. दुसरे महत्वाचे म्हणजे ऑप्शनचा मार्केट लॉट हा फ्यूचर्सप्रमाणेच मोठा असतो. उदाहरणार्थ, सोयाबीन कमीत कमी ५ टन तर हरभरा १० टन. त्यामुळे एवढा माल एक्सचेंज क्वालिटीचा पिकवणाऱ्या मोठ्या शेतकऱ्यांना स्वतंत्रपणे यात व्यवहार करणे शक्य होईल. परंतु छोट्या शेतकऱ्यांना मात्र शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातूनच हे व्यवहार करावे लागतील. त्यासाठी एनसीडीईएक्स किंवा एमसीएक्स सारखी एक्सचेंजेस आणि अगदी सेबी देखील अनेक सोयी-सवलती देऊ करत आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या आणि शेतकऱ्यांच्या संस्थांना यासंदर्भातील अधिक माहिती व्हावी, म्हणून त्यांना एक्स्चेंजेसच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि इतर सेवा पुरवल्या जातात. त्यामुळे ‘मला काय त्याचे’ ही वृत्ती सोडून आधुनिक बाजारपेठेतील जोखीम व्यवस्थापन साधने स्वीकारण्यात अधिक शहाणपण आहे आणि फायदा देखील

कृषी पणन क्षेत्रातील सुधारणा यापुढे वाढतच जाणार आहेत. शेतमालातील वाढत्या चढ-उतारांमुळे भावातील जोखीम व्यवस्थापन गरजेचे बनत चालले आहे. न जाणो लवकरच हमीभाव खरेदीसाठी इलेक्ट्रॉनिक बाजारपेठ, वायदे बाजार आणि अगदी ऑप्शन्सचा वापर करण्याचे केंद्र सरकारने ठरवले तर त्याला आंधळेपणाने विरोध करण्यापेक्षा आपला अभ्यास तयार असणे महत्वाचे ठरणार आहे. 

(लेखक कृषी व्यापार व कमोडिटी  मार्केटचे अभ्यासक, स्तंभलेखक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com