ड्रोनद्वारे होणार  पिकावर फवारणी...

विनोद इंगोले
बुधवार, 16 मे 2018

नागपूर - फवारणीदरम्यान विषबाधेमुळे गेल्या हंगामात राज्यात ४० पेक्षा अधिक शेतकरी, शेतमजुरांना जीव गमवावा लागला होता. येत्या हंगामात अशी परिस्थिती टाळण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर ड्रोनद्वारे फवारणी केली जाणार आहे. दिल्लीस्थित कृषी भवनमध्ये या संदर्भाने आयआयटी बंगळूरच्या विद्यार्थ्यांनी नुकतेच सादरीकरण केले. 

नागपूर - फवारणीदरम्यान विषबाधेमुळे गेल्या हंगामात राज्यात ४० पेक्षा अधिक शेतकरी, शेतमजुरांना जीव गमवावा लागला होता. येत्या हंगामात अशी परिस्थिती टाळण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर ड्रोनद्वारे फवारणी केली जाणार आहे. दिल्लीस्थित कृषी भवनमध्ये या संदर्भाने आयआयटी बंगळूरच्या विद्यार्थ्यांनी नुकतेच सादरीकरण केले. 

यवतमाळ जिल्ह्यात कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. त्यावर नियंत्रणासाठी शिफारसीत नसलेल्या रसायनांचे मिश्रण करून त्याची फवारणी करण्यात आली. काही शेतकऱ्यांनी तर कापसाला शिफारसीत नसलेल्या कीडनाशकाची फवारणीदेखील केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले होते.  अनियंत्रित आणि शिफारसीत नसलेल्या कीडनाशकाची फवारणी करणाऱ्या तब्बल २२ शेतकरी, शेतमजुरांना एकट्या यवतमाळ जिल्ह्यात जीव गमवावा लागला. राज्यात फवारणीदरम्यान विषबाधा होत मृत पावणाऱ्यांची संख्या ४० वर पोचली. त्यानंतर विविध समित्यांचे गठण करून त्या माध्यमातून विषबाधेमागील कारणांचा वेध घेण्याचे प्रयत्न झाले. 

प्रायोगिक तत्त्वावर फवारणी
आयआयटी बंगळूरच्या विद्यार्थ्यांनी फवारणीसाठी ड्रोनच्या वापराचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. दिल्लीतील कृषी भवनमध्ये देशपातळीवरील कृषी अधिकाऱ्यांसमोर याचे सादरीकरण नुकतेच करण्यात आले. महाराष्ट्रात येत्या हंगामात ड्रोनद्वारे फवारणीची उपयोगीता तपासली जाणार आहे. ड्रोनच्या फवारणीकामी वापरासाठी स्थानिक प्रशासनाकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. 

अशी होईल फवारणी
या सादरीकरणाला उपस्थित एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ड्रोनद्वारे १५ लिटर कीडनाशक फवारणी शक्‍य होईल. ड्रोनची बारा फुटांपर्यंत  उंची अपेक्षित धरण्यात आली आहे. ड्रोनच्या माध्यमातून एक हेक्‍टर फवारणी अवघ्या साडेचार मिनिटांत होणार आहे. राज्यात प्रायोगिक तत्त्वावरील या उपक्रमासाठी कृषी विभाग स्तरावर ड्रोनची खरेदी केली जाणार आहे. विभागीय कृषी सहसंचालक स्तरावर हे ड्रोन राहतील. शेतकऱ्यांच्या शेतावर कीडनाशक  फवारणी करून देण्याचे याअंतर्गत प्रस्तावित आहे, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Spray the crop with a drone