esakal | संडेफार्मर : शेतीला मिळाली व्यावसायिकतेची जोड

बोलून बातमी शोधा

mukesh-patil

गिरणा नदीच्या काठावर गाढोदे (ता. जळगाव) गावशिवार आहे. या शिवारामध्ये काळी कसदार, मध्यम प्रकारची जमीन आहे. या गावातील डोंगर आणि मुकेश हे पाटील पितापुत्र व्यवसाय सांभाळून शेती नियोजनात रमले आहेत.

संडेफार्मर : शेतीला मिळाली व्यावसायिकतेची जोड
sakal_logo
By
चंद्रकांत जाधव

गाढोदे (ता.जि. जळगाव) येथील डॉ. मुकेश डोंगर पाटील यांनी कौटुंबिक व्यवसायांचा व्याप सांभाळून ३५ एकर वडिलोपार्जित क्षेत्रामध्ये केळी, पपई, कलिंगडाची चांगली शेती केली आहे. जमिनीची सुपीकता जपत दर्जेदार पीक उत्पादनावर त्यांचा भर आहे. शेतकरी गटाच्या माध्यमातून शेतीला नवी दिशा देण्याचे धोरण आखले आहे. 

गिरणा नदीच्या काठावर गाढोदे (ता. जळगाव) गावशिवार आहे. या शिवारामध्ये काळी कसदार, मध्यम प्रकारची जमीन आहे. या गावातील डोंगर आणि मुकेश हे पाटील पितापुत्र व्यवसाय सांभाळून शेती नियोजनात रमले आहेत. डॉ. मुकेश पाटील यांच्या कुटुंबाची ३५ एकर शेती आहे. पाच कूपनलिका, मिनी ट्रॅक्टर आणि सहा सालगडी अशी यंत्रणा कार्यरत आहे.

डॉ. मुकेश पाटील यांनी बीएएमएस झाल्यानंतर वडिलांचा चोपडा येथील कृषी निविष्ठा विक्रीचा व्यवसाय सांभाळायला सुरुवात केली. शेतीची पहिल्यापासून आवड असल्याने त्यांनी शेती नियोजनातही पहिल्यापासून लक्ष दिले. यामुळे त्यांनी पूर्णवेळ वैद्यकीय सेवेत जाण्याचे टाळले. बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन डॉ. पाटील यांनी व्यावसायिक प्रगतीच्या बरोबरीने वडिलोपार्जित शेतीमध्येही वेगळेपण जपले आहे. कुटुंबातील सर्वांच्या सहकार्याने त्यांनी शेतीचे नियोजन बसविले आहे.

हेही वाचा : लिंबांसाठी शोधली पर्यायी बाजारपेठ 

व्यावसायिक शेतीला सुरुवात
डॉ. मुकेश पाटील हे पूर्वी पारंपरिक पद्धतीने केळी लागवड आणि नियोजन करत होते. परंतु बाजारपेठेचा अभ्यास करत त्यांनी गुणवत्तापूर्ण केळी उत्पादनावर लक्ष केंद्रित केले. १९७४ पासून पाटील यांची शेती बागायती आहे. अति पाण्याचा वापरामुळे जमिनीची सुपीकता खालावली होती. त्याचा पीक उत्पादनावरही परिणाम झाला. हे लक्षात घेऊन त्यांनी पहिल्यांदा जमीन सुपीकतेवर भर दिला. उपलब्ध लागवड क्षेत्राचा अभ्यास करून त्यांनी पीक पॅटर्न तयार केला. पीक व्यवस्थापनामध्ये त्यांनी वैद्यकीय शिक्षणाचा उपयोग केला. पीकवाढीच्या प्रत्येक टप्प्यांचा अभ्यास करून पीक लागवड आणि अन्नद्रव्य व्यवस्थापनात बदल केले. डॉ. मुकेश हे त्यांच्या काकांच्या शेती व्यवस्थापनातही मार्गदर्शन करतात. सुपीकता जपण्यासाठी दरवर्षी लागवडीपूर्वी एकरी तीन ट्रॉली शेणखत मिसळले जाते. शेणखताची उपलब्धता होण्यासाठी पाच जनावरे आहेत. या शिवाय परिसरातूनही गरज भासल्यास शेणखताची खरेदी केली जाते.

पीक लागवडीचे नियोजन
दरवर्षी डॉ. पाटील ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यांत सरासरी १२ ते १५ एकरांत केळीच्या उतिसंवंर्धित रोपांची लागवड करतात. सर्व क्षेत्राला ठिबक सिंचन केले आहे. केळी काढणीनंतर त्याच क्षेत्रात डिसेंबरमध्ये कलिंगडाची टप्प्याटप्प्याने लागवड केली जाते. कलिंगडाची काढणी झाल्यानंतर त्याच क्षेत्रात एप्रिलमध्ये पपईची लागवड करतात. जूनमध्ये पपईच्या दोन ओळींत देशी कापसाची एक ओळ लागवड केली जाते. कलिंगड, पपई आणि कपाशीला प्लॅस्टिक आच्छादन केले जाते. सर्व पिकांना एकात्मिक पद्धतीने सेंद्रिय आणि रासायनिक खताची मात्रा दिली जाते. तसेच एकात्मिक पद्धतीनेच रासायनिक कीडनाशकांचा वापर केला जातो. त्यामुळे खर्चात बचत होते.

आणखी वाचा: महाराष्ट्रातील माजी सैनिकांचं असं एक गाव, ज्यापासून घ्यावी सर्वांनीच प्रेरणा

नोव्हेंबरअखेर कापसाची वेचणी पूर्ण होते. काढणीनंतर कापसाच्या ओळीत रोटाव्हेटर फिरविला जातो. त्याचे अवशेष जमिनीत गाडले जातात. मार्चपर्यंत पपई काढणी पूर्ण होते. त्यानंतर संपूर्ण क्षेत्रात धैंचा लागवड केली जाते. फुलोऱ्यात धैंचाचे अवशेष ट्रॅक्टरच्या साह्याने जमिनीत गाडल्यानंतर ऑक्टोबरमध्ये केळी लागवड केली जाते. या पीक पॅटर्नमुळे पीक उत्पादकता वाढीसह जमीन सुपीक ठेवण्यास मदत झाल्याचे डॉ. पाटील सांगतात. 

पिकांना रासायनिक खतांचा अतिवापर टाळण्यावरच त्यांचा भर आहे. केळी, कलिंगड आणि पपईला ठिबक सिंचनातून खते दिल्याने कार्यक्षम वापर होतो. सिंचनाचे हंगाम, हवामानानुसार पीकनिहाय वेळापत्रक तयार केले आहे.

डॉ. पाटील यांना केळीची २० ते २१ किलोची रास मिळते. कलिंगडाचे प्रति एकरी सरासरी  २५ टन उत्पादन मिळते. अनुकूल हवामान राहिल्यास पपईचे एकरी १८ ते २० टन उत्पादन  मिळते. मात्र गेली दोन वर्षे मात्र अति पाऊस आणि कमी दरामुळे पपईचे आर्थिक नुकसान झाल्याचे डॉ. पाटील सांगतात. देशी कपाशीचे एकरी सात क्विंटल उत्पादन मिळते.

केळीला १,१०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्यास अपेक्षित नफा मिळतो. कलिंगडामध्ये एकरी ६० हजारांपर्यंत किमान नफा मिळतो. प्रतिकूल हवामान आणि बाजारपेठेतील चढ उतारामुळे पपईमध्ये गेली दोन वर्षे एकरी निव्वळ नफा केवळ ३० हजार रुपयांवर राहिला आहे. देशी कपाशीला प्रति क्विंटल ५ ते ५,७०० रुपये दर मिळतो.

हळद पोचली ९ हजारांवर; मजबूत मागणीमुळे दरात वाढ

नजीकच्या भागातील कांदेबाग केळीच्या तुलनेत डॉ.पाटील यांच्या बागेतील केळीची लवकर काढणी सुरू होते. यामुळे सुरुवातीच्या दराचा फायदा होते. लॉकडाउन आणि अलीकडच्या कालावधीत केळीला चांगले दर मिळाल्याचे डॉ. पाटील सांगतात. 

थेट जागेवर विक्री
मुकेश यांचे चुलतबंधू प्रवीण यांचा केळी खरेदी- विक्रीचा व्यवसाय आहे. यामुळे केळी विक्रीसाठी प्रवीण यांची मदत होते. 

कलिंगडाची लागवड टप्प्याटप्प्याने तीन-तीन एकरांमध्ये केली जाते. त्यामुळे एकाच वेळी कलिंगड काढणी येत नाही. वीसहून अधिक व्यापाऱ्यांशी डॉ. पाटील यांचा संपर्क आहे. याशिवाय कलिंगड काढणी वेगवेगळ्या वेळेत होत असल्याने दरही वेगवेगळे मिळतात. अनेकदा यामध्ये अधिक दराचा लाभ होतो. कलिंगडासह पपईची थेट जागेवरच विक्री केली जाते. गेली दोन वर्षे कलिंगडास जागेवर सरासरी पाच रुपये प्रति किलो आणि पपईला सुरुवातीला १२ रुपये आणि नंतर किमान पाच रुपये प्रति किलोस दर मिळाला आहे.

शेती नियोजनाची सूत्रे
जमीन सुपीकता, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनावर भर.
बाजारपेठेनुसार पीक लागवडीचे नियोजन.
व्यापाऱ्यांशी संपर्क साधत शेतावर केळी, पपई, कलिंगडाची विक्री.
यांत्रिकीकरण, आच्छादन तंत्र, ठिबक सिंचनाचा योग्य वापर.
शेतकरी गटाची उभारणी. यातून १०० एकर क्षेत्रावर पीक नियोजनाचे ध्येय.

डॉ. मुकेश पाटील,  ७७०९२२०११९