जत पूर्व भागातील तूर पीक धोक्‍यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

- अपुरा पाऊस, प्रतिकूल हवामानाचा फटका 
- शेंगांचा आकार झाला कमी, पीक लागले वाळू 

सांगली - परतीच्या पावसाने दिलेल्या दडीमुळे जत पूर्व भागातील तूर पीक पाण्याअभावी वाळू लागले आहे. ऐन पीक भरात असताना पाणी कमी पडल्याने शेंगांमध्ये भरीव दाणे भरलेले नाहीत. तसेच फुलांची गळ मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे, त्यामुळे उत्पादनात घट होणार असल्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होते आहे. 

- अपुरा पाऊस, प्रतिकूल हवामानाचा फटका 
- शेंगांचा आकार झाला कमी, पीक लागले वाळू 

सांगली - परतीच्या पावसाने दिलेल्या दडीमुळे जत पूर्व भागातील तूर पीक पाण्याअभावी वाळू लागले आहे. ऐन पीक भरात असताना पाणी कमी पडल्याने शेंगांमध्ये भरीव दाणे भरलेले नाहीत. तसेच फुलांची गळ मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे, त्यामुळे उत्पादनात घट होणार असल्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होते आहे. 

खरीप हंगामामध्ये कडधान्य पीक म्हणून तूर पीक घेतले जाते. कमी खर्चात, पावसावर व माळरानावर तूर पीक येत असल्याने शेतकऱ्यांचा तूर पीक घेण्याकडे कल वाढला आहे. या पिकाला अनुकूल हवामान, खडकाळ जमीन ही पिकाला पोषक आहे. तालुक्‍यातील शेतीचा खरीप हंगाम हा प्रमुख आहे. शेतकरी तूर, तीळ, करडई, भुईमूग, सोयाबीन, मटकी ही गळीत व कडधान्ये पिके घेतात. वाढत्या मागणीमुळे या वर्षी तूर पीक घेण्यासाठी जत तालुक्‍यातील पूर्व भागातील शेतकरी पुढे आला आहे. गेल्यावर्षी २ हजार हेक्‍टर क्षेत्रावर पीक घेतले होते. यावर्षी ३४०० हेक्‍टर क्षेत्रावर पीक घेण्यात आले आहे. अनुकूल हवामानामुळे पिकाची उगवण चांगली झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून दिवसभर ऊन, रात्रीची थंडी, पहाटे धुके याचा परिणाम तुरीच्या शेंगांवर होत असल्याचे दिसून आले आहे. तसेच कीड आणि रोगाचाही प्रादुर्भाव डाणवत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने पाण्याअभावी पिके सुकू लागली आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाण्याअभावी शेंगांमध्ये भरीव दाणे भरलेले नाहीत. शेंगांचा आकारही कमी झाला आहे. दर हेक्‍टरी उत्पादनात घट होणार आहे. प्रतिकूल हवामानामुळे अळीच्या प्रमाणात वाढच होत आहे. कीटकनाशके, मशागतीवर हजारो रुपये खर्च केले आहेत. मशागतीचा खर्च वजा जाता पदरात काहीच पडणार नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. 
 
उत्पादन घटण्याची भीती 

गेल्या वर्षी तुरीला दर १० ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटल दर होता. यामुळे मोठ्या अपेक्षेने माळरानावर व खडकात, मध्यम प्रतीच्या जमिनीमध्ये तुरीची लागवड घेतली आहे. सध्याचे वातावरण तुरीवरील मर रोगाला अनुकूल आहे. पाण्याअभावी तुरीचे पीक वाळू लागले आहे. रोगांच्या प्रादुर्भावामुळे, पाण्याअभावी तुरीची वाढ खुंटणार आहे. ऐन दुष्काळात मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. यामुळे मोठ्या अपेक्षा ठेवून तूर उत्पादनाकडे वळलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा फटका बसण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

परतीचा पाऊस समाधानकारक झाला नाही, त्यामुळे पिकाची वाढ झाली नाही. परिणामी तूर पिकाचे अंदाजे २० ते २५ टक्के उत्पादन घटण्याची शक्‍यता आहे. 
- संभाजी सावंत, मंडल कृषी अधिकारी, उदमी, ता. जत. 
 

Web Title: toor dal farming