विनावीज जलसंधारण प्रयोगांतून डोंगरात निर्यातक्षम द्राक्ष बागा

विनावीज जलसंधारण प्रयोगांतून डोंगरात निर्यातक्षम द्राक्ष बागा

नाशिक जिल्ह्यातील कोनांबे (ता. सिन्नर) येथे डावरे कुटुंबाने बऱ्यापैकी दुष्काळी भागातील ३० एकर पडीक डोंगराळ जमीन विकत घेतली. प्रतिकूल स्थितीत डोंगरातून वाहून जाणारे पाणी झरे, छोटा सिमेंट बांध व शेततळी यांच्या माध्यमातून अडवले. विजेचा वापर न करता संपूर्ण ३० एकरांत त्या माध्यमातून सिंचन केले. त्यातून निर्यातक्षम द्राक्ष बाग व केसर आंब्याची आमराई यशस्वीपणे फुलवली आहे. 

नाशिक जिल्ह्यात कोनांबे (ता. सिन्नर) येथील कै. निवृत्ती रामचंद्र डावरे यांची नऊ एकर वडिलोपार्जित जमीन होती. पुढे दत्तात्रेय, वसंत, श्यामराव, संपत व मधुकर या त्यांच्या मुलांनी २००८ मध्ये गावाजवळ ३० एकर डोंगराळ जमीन खरेदी केली. भांडवल नसल्याने बँकेकडून कर्ज घेतले. त्यातून जमीन सपाटीकरण, सूक्ष्म सिंचन प्रणाली, द्राक्ष मंडप उभारणी, शेततळे, फार्म हाउस आदी कामे टप्प्याटप्प्याने उभी राहात गेली. जमीन म्हणजे पूर्णपणे डोंगर, मुरमाड असल्याने पाणी ठरत नव्हते. त्यामुळे सुपीक माती उपलब्ध करून २ ते ३ फूट थर देत जमीन पुनर्भरण केले. दत्तात्रेय यांच्याकडे कौशल्य व कामाचा अनुभव असल्याने किमान खर्चात सपाटीकरण होऊन क्षेत्र विकसित झाले. 

असे केले जलसंधारणाचे प्रयोग 
जमिनीचे सपाटीकरण केले तरी पाण्याचे दुर्भीक्ष ही समस्या कायम होती. अशावेळी वडिलांच्या मार्गदर्शनखाली पाचही भावंडांनी जलसंधारण कामांची आखणी केली. याच पुढील तीन प्रयोग साधले. 
  प्रयोग १ 
ऑगस्टच्या दरम्यान पावसाळ्यात डोंगरातून झरे वाहायचे. त्याचे पाणी अडविण्यासाठी छोटा सिमेंट बांध घातला. मग पाणी जमा होऊ लागले. चार इंची पाइपद्वारे हे पाणी गुरुत्वाकर्षण पद्धतीने थेट शेततळ्यात आणले. 
  प्रयोग २
डोंगराळ जमिनीत शेततळे उंचावर उभारले. त्यातील पाणी खाली १० एकराला पोहोचवण्यासाठी पुन्हा चार इंची पाइपलाइनचा वापर केला. ग्रॅव्हिटीद्वारे थेट ठिबकद्वारे हे पाणी पिकांना मिळते. यात विजेचा वापर करण्याची गरज भासत नाही. 
  प्रयोग ३
ज्या ठिकाणी ग्रॅव्हिटीचा वापर करणे शक्य नाही अशा ठिकाणी चार सौरपंप बसवले. त्याद्वारे पाणी पिकांना दिले. 

जलसंधारण व फलश्रुती   
  डोंगरावर दोन, तर पारंपरिक शेतीत एक शेततळे.
  एकूण पाच कोटी लिटर संरक्षित पाणीसाठा
  अतिरिक्त वाहून जाणारे पाणी स्थानिक ठिकाणी जमिनीत मुरविले. त्यामुळे भूजलपुनर्भरण होत असून, परिसरात भूजलपातळी वाढली आहे.
  आज डोंगराळ जमिनीत सुमारे २० ते २२ एकर द्राक्ष बाग
  उर्वरित जमीन पडीक न ठेवता त्यात केसर आंब्याच्या १७०० झाडांची लागवड 
  सर्व क्षेत्राला ठिबक सिंचन 
  जमिनीची आर्द्रता टिकवून राहावी यासाठी बागेत बोदावर सेंद्रिय मल्चिंग 
  वाफसा स्थितीनुसार जमिनीच्या प्रतवारीनुसार प्रत्येक शेताच्या तुकड्यात वेळापत्रक ठरवून सिंचन
  यापूर्वी पाच विहिरी असूनही साठा पुरेसा नव्हता. आता प्रयोगांतून पाणीटंचाईवर मात 
  त्यातून द्राक्षाखालील क्षेत्र वाढत गेले.  

अशी आहे शेती 
पूर्वी ऊस, टोमॅटो, लसूण, कांदे अशी पारंपरिक पिके होती. त्यास पर्याय देत द्राक्ष शेती उभारली. सफेद वाणांमध्ये ‘थॉम्पसन’,‘सोनाका’ तर रंगीत ‘शरद सीडलेस’ वाण आहेत. वडिलोपार्जित शेतीतही द्राक्ष व भाजीपाला (काकडी, टोमॅटो, कोबी, गाजर) घेतात.
सध्याचे एकूण क्षेत्र- ३९ एकर  
संकटांनी निर्यातक्षम  द्राक्ष शेती घडविली 
सन २०१० मध्ये द्राक्षे पहिल्यांदा काढणीस आली. मात्र अपेक्षित गुणवत्ता नव्हती. परिणामी दरही मिळत नव्हते. ही अडचण पुढील सलग तीन वर्षे होती. हाती अपेक्षित उत्पन्न येत नसल्याने कर्ज परतफेड होईना. घर कसे चालवावे हा प्रश्‍न निर्माण झाला. बँक खाते एनपीए होऊ लागले. त्या वेळी मधुकर यांनी नोकरी सोडून शेतीची सूत्रे हाती घेतली. अडचणी समजून घेऊन गुणवत्तापूर्ण बागांचा दौरा केला. निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनाचे तंत्र समजून घेतले. दरम्यान २०१३ मध्ये सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे (मोहाडी) अध्यक्ष विलास शिंदे यांची भेट झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावात समूह तयार केला. त्यांचे मार्गदर्शन होऊ लागल्याने रासायनिक अवशेषमुक्त निर्यातक्षम उत्पादन होऊ लागले. एकरी उत्पादनात वाढ झाली. 

उंचावले अर्थकारण 
सुरुवातीला पारंपरिक पद्धतीत द्राक्षाला प्रतिकिलो १८ ते २० रुपयांपुढे दर मिळत नव्हते. आता सफेद वाणांना किलोला ७० ते ८० रुपये, तर रंगीत वाणांना १०० रुपये दर मिळतो. आत्मविश्‍वास वाढला आहे. आर्थिक स्थैर्य आले आहे. उत्पन्नवाढ झाल्याने अजून चार एकर जमीन खरेदी केली आहे.

निर्यातक्षम द्राक्ष  शेतीतील ठळक बाबी
  ९ बाय ५ फूट मांडव पद्धत. आठ एकर वाय पद्धतीची नवी बाग  
  शेणखत, गांडूळ खत, जिवामृत, पेंड व हिरवळीचे खते यांचा वापर
  २५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान आगाप गोडी छाटणी   कॅनॉपी मॅनेजमेंटकडे विशेष लक्ष. प्रत्येक वेलीवर एकसारख्या ३० ते ३२ काड्या ठेवून गर्दी कमी.
  वाफसा स्थिती व बाष्पीभवनाचा वेग तपासून सिंचन.   पाणी उतरण्याच्या अवस्थेत ३५ ते ४० पर्यंत घड ठेवण्याचा प्रयत्न 
  राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या शिफारशीनुसार कीडनाशकांचा वापर 
  पान देठ तपासणी हंगामात दोन ते तीन वेळा.
  मृद्‍परीक्षणाचे अहवाल तपासून खतांचा वापर 
  हवामानासंबंधी मोबाईलवर अपडेट्स मिळवून नियोजन  
  एकरी उत्पादन सरासरी १२ टन. पैकी ९० टक्के निर्यात.
  सध्या आंब्याच्या ११०० झाडांना फलधारणा होते. प्रतिझाड सरासरी १०० किलो उत्पादन.
  वर्षभर गाजर. दरांचा अंदाज घेऊन क्षेत्राचे नियोजन. 
  कुटुंब मोठे असल्याने भाजीपाला उत्पादनातून घरखर्च चालविण्यासाठी वर्षभर मदत.

आदर्श कुटुंब 
शेतीसह नव्या पिढीला दर्जेदार शिक्षण देण्यावरही डावरे कुटुंबाचा भर आहे. औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी, जैवतंत्रज्ञान आदी शिक्षण क्षेत्रात नवी पिढी आहे. कुटुंबातील अरुण प्राध्यापकाची नोकरी सोडून पूर्णवेळ शेती करीत आहेत. मागील वर्षी पाच भाऊ वेगळे झाले. मात्र शेती व सर्व व्यवहार नियोजन एकत्रच आहे. नफा समान वाटला जातो. घरातील महिला सदस्यही हिरिरीने कामांत सहभागी होतात.

मजुरांना बोनस 
द्राक्षशेतीत ३० कुशल मजुरांचे कायमस्वरूपी मनुष्यबळ राबते. त्यांना निवास, आरोग्य या सुविधा पुरविल्या जातात. यासह शेतीत एकरी ठरावीक अधिक उत्पन्न हाती आले तर मजुरांना २५ रुपये प्रति दिवस अशी अतिरिक्त रक्कम बोनस स्वरूपात दिली जाते.

मधुकर सांगतात, की हवामान बदलांमुळे द्राक्ष शेतीत धोके वाढले आहेत. त्यामुळे हवामानात टिकाव धरणाऱ्या वाणांची लागवड, शेततळ्यात मस्त्यशेती, नैसर्गिक अनुकूलता ओळखून पर्यटन केंद्र उभारणे व युवकांसाठी रोजगारनिर्मिती ही पुढील उद्दिष्टे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com