शेवया उद्योगामुळे आली अार्थिक सुबत्ता

गोपाल हागे
रविवार, 29 जानेवारी 2017

गाव परिसरातही लहान उद्योगातून कुटुंबाला अार्थिक बळकटी मिळू शकते, हे चांदूर (जि. अकोला) येथील लक्ष्मी विनायक डाबेराव यांनी दाखवून दिले आहे. परिसरातील बाजारपेठेची गरज अोळखून पंधरा वर्षांपूर्वी लक्ष्मी डाबेराव यांनी शेवयानिर्मिती उद्योगास सुरवात केली. अाज त्यांना या व्यवसायाने स्वतंत्र अोळख दिली आहे.

गाव परिसरातही लहान उद्योगातून कुटुंबाला अार्थिक बळकटी मिळू शकते, हे चांदूर (जि. अकोला) येथील लक्ष्मी विनायक डाबेराव यांनी दाखवून दिले आहे. परिसरातील बाजारपेठेची गरज अोळखून पंधरा वर्षांपूर्वी लक्ष्मी डाबेराव यांनी शेवयानिर्मिती उद्योगास सुरवात केली. अाज त्यांना या व्यवसायाने स्वतंत्र अोळख दिली आहे.

अाज बदलत्या काळात घरच्या घरी अनेकांना शेवयासारखा पारंपरिक खाद्यपदार्थ बनविणे शक्य होत नाही. नेमकी हीच बाब चांदूर (जि. अकोला) येथील लक्ष्मी डाबेराव यांनी पंधरा वर्षांपूर्वी अाेळखली. घरगुती स्तरावर व्यवसाय सुरू करण्याच्या हेतूने त्यांनी सन २००० मध्ये शेवयानिर्मिती यंत्र खरेदी केले. त्या वेळी ग्रामीण भागात यंत्राच्या साह्याने शेवया तयार होऊ शकतात हे अनेकांसाठी वेगळेपण होते.
शेवयानिर्मिती हे घरगुती स्वरूपाचे काम. लक्ष्मीताईंनी सन २००० मध्ये शेवयानिर्मितीसाठी यंत्र खरेदी केले. शेवयानिर्मितीबाबत कुठलेही प्रशिक्षण घेतले नसले तरी अनुभवाने त्यांनी शेवयानिर्मितीचे काम सुरू ठेवले. सुरवातीला शेवया विक्रीसाठी असंख्य अडचणी उभ्या राहल्या. मात्र कुटुंबीयांच्या मदतीतून त्यांनी मार्ग काढला. हळूहळू गावातील लोकांकडून शेवयांना मागणी वाढू लागली. पहिले शेवयानिर्मिती यंत्र प्रतिदिन ५० किलो क्षमतेचे होते. काही महिन्यांमध्येच अाजूबाजूच्या अाठ ते दहा गावांत लक्ष्मीताईंच्या शेवयानिर्मिती उद्योगाबाबत माहिती पोचली, तसतसे ग्राहक वाढू लागले. शेवया मिळण्यासाठी ग्राहकांना दोन दिवस वाट पाहावी लागत होती. मागणी वाढल्याने चार वर्षांपूर्वी त्यांनी दिवसाला दीड क्विंटल क्षमता असलेले शेवयानिर्मिती यंत्र तयार करून घेतले.

दर्जेदार उत्पादनावर भर ः
लक्ष्मीताईंकडे पीठगिरणीसुद्धा अाहे. ग्राहक या गिरणीवर गहू दळून घेतात. लक्ष्मीताई गहू पिठाची चाळणी करून शेवयासाठी लागणारे पीठ मळतात. यानंतर यंत्राच्या माध्यमातून दर्जेदार व चविष्ठ शेवया तयार करतात. ग्रामीण भागात लग्नसोहळ्यात रुखवतासाठी रंगीबेरंगी शेवयांची मागणी असते. अशा शेवया कलात्मक पद्धतीने लक्ष्मीताई बनवून देतात. शेवया तयार करण्याचे काम वर्षभर सुरू असते. परंतु मार्च ते जून अखेरपर्यंत शेवयानिर्मिती अधिक गती पकडते. सध्या मागणी वाढल्याने नवीन यंत्राची क्षमतादेखील अपुरी पडू लागली आहे. लक्ष्मीताई एक किलो शेवया बनविण्यासाठी दहा रुपये मोबदला घेतात. दरमहा सरासरी ३० क्विंटल शेवयांची निर्मिती केली जाते.

शेवया तयार करण्यासाठी चांगल्या दर्जेदार गव्हाची निवड केली जाते. एक किलो गव्हापासून साधारणतः पाऊण किलो पीठ मिळते. चवीसाठी पिठात मीठ मिसळले जाते. यानंतर हे पीठ भिजवून यंत्राच्या माध्यमातून शेवया बनविल्या जातात. ग्रामीण भागात अक्षयतृतीयेला घरोघरी शेवया बनविल्या जातात. त्यामुळे या काळात शेवया तयार करण्यासाठी लक्ष्मीताईंकडे सर्वाधिक मागणी असते.

प्रदर्शन, धान्य महोत्सवात सहभाग ः
गावातील माँ दुर्गा महिला स्वयंसाह्यता गटाच्या लक्ष्मीताई सभासद अाहेत. बचत गटामध्ये प्रक्रिया उद्योगाबाबत चर्चा होते. त्याचा फायदा होतो. जिल्हा परिसरात आयोजित धान्य महोत्सव, कृषी प्रदर्शनामध्ये शेवया पॅकिंग करून त्या विकतात. ग्राहकांच्या मागणीनुसार एक किलो पॅकिंग केले जाते. या कामात मुलगा आणि सुनेची चांगली मदत होते.

अलीकडे शहरी भागाच्या बरोबरीने ग्रामीण भागातही यंत्रावर बनविलेल्या शेवयांची मागणी वाढत आहे. लक्ष्मीताईंचा शेवयानिर्मिती उद्योगाची प्रसिद्धी पंचक्रोशीतील अाठ ते दहा गावांमध्ये झाली अाहे. त्यामुळे दर वर्षी लक्ष्मीताईंकडे शेवयाची मागणी वाढत आहे. या उद्योगाची उलाढाल आता सुमारे लाखांवर पोचली अाहे.

शेतीमध्ये केली सुधारणा
लक्ष्मी डाबेराव यांची आठ एकर बागायती शेती आहे. शेतीमध्ये विहीर असल्याने वर्षभर पाणी पुरते. खरिपात बीटी कपाशी, ज्वारी, सोयाबीनची लागवड असते. रब्बी हंगामात गहू, हरभरा, कांदा लागवड असते. मुलगा मयूर हा बी.एससी.(कृषी) पदवीधर आहे. त्यामुळे पीक लागवड आणि व्यवस्थापनामध्ये बदल करत सुधारित पद्धतीने पीक व्यवस्थापनावर त्यांचा भर आहे. मुलगा अमरदीप याने गावामध्ये डाळमिल सुरू केली आहे. त्यामुळे शेती बरोबरीने प्रक्रिया उद्योगावर डाबेराव कुटुंबीयांनी लक्ष केंद्रित केले आहे. शेतातील उत्पादित गहू व्यापाऱ्याला न विकता तीस किलो पॅकिंग करून थेट ग्राहकांना विक्री केली जाते. त्यामुळे शेतीतूनही त्यांना किफायतशीर उत्पन्न मिळते. शेतीतील उत्पन्नासोबतच या कुटुंबाला पीठगिरणी व शेवया उद्योगातून येणाऱ्या पैशाने चांगला हातभार दिला अाहे.

 

संपर्क ः लक्ष्मी डाबेराव ः ९९२११२४८४७

 

Web Title: womens success story in agro